आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जबाजारीपणा, नापिकीला कंटाळून मोडनिंबमध्ये तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मोडनिंब- कर्जबाजारीपणा नापिकीला कंटाळून तरुण शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. शुक्रवारी (दि. ८) मध्यरात्री मोडनिंब (ता. माढा) येथील पालखी मार्गावरील शेतात ही घटना घडली. सचिन बबन गिड्डे (वय ३५, रा. मोडनिंब) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 


गिड्डे यांचे एकत्रित कुटुंब आहे. वडिलांच्या नावे ११ एकर शेतजमीन आहे. त्यांच्या नावे युनियन बँकेच्या मोडनिंब शाखेत ७५ हजार रुपयांचे कर्ज आहे. गेल्या पाच वर्षांत दुष्काळी स्थितीमुळे शेतीतून उत्पन्न मिळाले नाही. यंदा पाऊस झाला असला तरी खरिपातील उडदाला योग्य दर मिळाला नाही. त्यामुळे आर्थिक अडचणी वाढल्या होत्या. परिणामी ते वैतागले होते. दरम्यान, त्यांनी युनियन बँकेतील कर्जाचा भरणा करून नव्याने ७५ हजार रुपयांचे कर्ज काढले होते. उत्पन्नच नसल्याने हे कर्ज कसे फेडायचे, ही चिंता सतावत असल्याने ते तणावात होते, असे त्यांचे वडील बबन गिड्डे यांनी सांगितले. 

 

गिड्डे कुटुंबीय पालखी मार्गालगतच्या आपल्या शेतात राहण्यास आहेत. सचिन यांनी मध्यरात्री आपल्या शेजारचे तुकाराम भानुदास सुर्वे यांच्या शेतातील डाळिंबाच्या बागेतील लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली. शुक्रवारी सकाळी नऊ वाजता कुटुंबीयांना ही घटना समजली. सचिन यांच्या मृतदेहाचे मोडनिंबच्या आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले. दुपारी मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. चार वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.


सचिनयांच्या मागे आई, वडील, पत्नी, दोन मुले, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांचा मोठा मुलगा करण हा इयत्ता पाचवी तर लहान मुलगा विवेक हा दुसरी इयत्तेत शिकत आहे. सचिन यांचे चुलत भाऊ नीलेश पोपट गिड्डे यांनी टेंभुर्णी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. सहायक फौजदार दत्तात्रय आसबे यांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिस तपास करत आहेत. 


कर्जमाफीच्या नियमानुसार २५ टक्के लाभ 
गिड्डे हे थकबाकीदार नाहीत. त्यांनी भरणा करून नवे कर्ज काढले आहे. त्यांना सरकारच्या कर्जमाफीच्या निर्णयानुसार एकूण रकमेच्या २५ टक्के लाभ मिळेल. 
- महादेव सुर्वे, लिपीक, युनियन बँक, शाखा मोडनिंब 

बातम्या आणखी आहेत...