आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- महापालिकेतील गटबाजीचे टोक सोमवारी झालेल्या सभेत पाहायला मिळाले. त्याच्या दुसऱ्याच दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूरला आले. यापूर्वीच्या घटनांची दखल घेत महापालिकाच बरखास्त करू म्हणणारे फडणवीस यूटर्न घेत पत्रकारांनाच म्हणाले, 'सर्व काही आलबेल' सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घरी महाशिवरात्रीचा पाहुणचार घेण्यासाठी आल्यानंतर ते बोलत होते. त्यांच्यासमवेत पालकमंत्री विजयकुमार देशमुख हेही येणे अपेक्षितच होते. परंतु ते विमानतळावर मुख्यमंत्र्यांची वाट पाहात होते. मुख्यमंत्र्यांदेखत दोन देशमुखांतील हा दुरावा साऱ्यांनाच जाणवला. परंतु मुख्यमंत्र्यांना हा सारा प्रकार आलबेलच वाटला.
उस्मानाबाद दौऱ्यावरून मुंबईकडे जाताना मुख्यमंत्री सुभाष देशमुख यांच्या होटगी रस्त्यावरील निवासस्थानी गेले. त्यांच्या समवेत केंद्रीय परिवहनमंत्री नितीन गडकरी होते. पाहुणचार संपवून निघताना पत्रकारांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यांचा पहिला प्रश्न होता, महापालिकेतील गटबाजीचा. त्यावर मुख्यमंत्री म्हणाले, "गटबाजी नाही. सर्व काही ठीक चालले आहे. बातमीच पाहिजे असेल तर सोलापूर शहरासाठी दुहेरी जलवाहिनी योजनेस मंजुरी देतोय. त्यामुळे शहरातील पाण्याचा प्रश्न मिटेल."
काही मिनिटे...
- काही मिनिटांच्या भेटीत गडकरी यांनी राष्ट्रीय महामार्ग अधिकारी यांच्याकडून जिल्ह्यात सुरू असलेल्या कामांची माहिती घेतली.
- मुख्यमंत्री फडणवीस सकाळी ७.४० वाजता आले. जिल्हा प्रशासनाकडून सत्कार स्वीकारून पालकमंत्री देशमुख यांना सोबत पुढे निघाले.
- ८ वाजून ३० मिनिटांनी गडकरी आले. लगेच गाडीत बसले. सहकारमंत्री देशमुख यांच्या विनंतीवरून अल्पोपाहार घेतला. पुढे दोघे रवाना झाले.
नागपूर गटही दिसले
मंगळवारी सकाळी पावणेअाठच्या सुमारास पहिल्यांदा मुख्यमंत्र्यांचे सोलापुरात आगमन झाले. त्यानंतर गडकरी यांचे विमान उतरले. फडणवीस त्यांची वाट न पाहता, पालकमंत्र्यांना घेऊन यमगरवाडी (उस्मानाबाद)कडे रवाना झाले. त्यानंतर गडकरी सहकारमंत्र्यांना घेऊन गेले. नागपूरच्या या नेत्यांची गटबाजी सोलापुरात प्रकर्षाने जाणवली. त्यामुळे सोलापूरच्या गटबाजीवर कोण बोलणार? असेच दोघांना वाटले असावे. गडकरी म्हणाले, "बोला बापू काय काय कामे आहेत?'
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.