आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- महापालिका पाणीपुरवठा विभागात टँकर लाॅबी सक्रिय असल्याचे समोर आले आहे. बिल कोणाला किती आणि कसे दिले यांचा ताळमेळ लागू नये, त्याप्रमाणे बिलाची आकारणी व तपासणी करण्यात येत आहे. विभागीय कार्यालयांकडून आलेल्या बिलांची खात्री न करता, टँकरच्या खेपांची शहानिशा न करता मुख्य लेखापरीक्षक कार्यालयाने बिले 'तपासली.' त्या आधारे बिलांवर सर्वांची स्वाक्षरी झाल्या.. त्यावर आमचे नियंत्रण नाही म्हणत मुख्य लेखापाल कार्यालयाने बिले अदा केली. ही सर्व व्यवस्था पाहता साखळी पद्धतीने टँकर लाॅबी काम करत असल्याचे स्पष्ट होते. बिलांची तपासणी न करता बिले दिलीच कशी? याबाबत मुख्य लेखापरीक्षक कार्यालयावरच संशयाची सुई सरकतेय.
शहरात टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी ५० लाखांची तरतूद असताना एका झोनला त्यापेक्षा जास्त टँकरचे बिल अदा केले जात आहेत. पाण्यासारखा संवेदनशील विषय पुढे करून साखळी पद्धतीने महापालिकेची आर्थिक लूट केली जात असल्याचे समोर येत आहे. कोणत्या झोनकडून किती टँकर पाणीपुरवठा झाला यांची नोंद रजिस्टरमध्ये असते. त्यानुसार बिले झोन कार्यालयाकडून केले की नाही, याची शहानिशा मुख्य लेखापरीक्षक कार्यालयाकडून हाेणे अपेक्षित आहे. ते न तपासता, झोन कार्यालयाकडून आलेल्या बिलावर जुजबी तपासणी करून लाखो रुपयांचे बिले एकाचवेळी पास केली जात आहेत.
मनपा झोन क्रमांक चारमध्ये सन २०१७-१८ मध्ये ८९.०४ लाख रुपयांची बिले अदा करण्यात आली. त्या झोनला टँकरने पाणी पुरवठा करण्यास तितकी तरतूद नसताना, अदा केले कसे, कमी बजेट असेल तर मनपा बजेटसभेत तरतूद जास्त का नाही? आदी प्रश्न उपस्थितीत होत आहेत. एकच बिल क्रमांक सलग दोन महिने सादर केले. एकच बिल दोनवेळा सादर केले जात असेल तर ते मुख्यलेखापरीक्षकांना तपसणी करताना सापडले कसे नाही? असा प्रश्न निर्माण होत आहे.
क्राॅस तपासणी होत नाही
टँकरने पाणीपुरवठा केल्यावर रजिस्टरमध्ये नोंद होते. त्यानुसार झोन कार्यालयाकडून बिल येत असेल तर उलट तपासणी मुख्य लेखापरीक्षक कार्यालयाकडून होणे अपेक्षित असताना का होत नाही? आदी प्रश्न निर्माण होत आहेत. कमी टँकर खेपा करणे आणि जास्तीचे बिल काढत असल्याचा संशय निर्माण होत आहे.
चौकशीचा फार्स
महापालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे यांना टँकरबाबत एका व्यक्तीने एसएमएस करून तक्रार केली. ते आयुक्तांनी मनपा सभागृहात सांगितले. पण चौकशी मात्र संथगतीने बचावात्मक पद्धतीने होत असल्याचे दिसून येते. आयुक्तांनी आदेश दिल्यानंतर झोन कार्यालयाकडून मुख्य लेखापरीक्षक कार्यालयाने माहिती मागवली. पण झोन कार्यालयांनी अद्याप माहिती दिली नाही. सोयीनुसार, बचावात्मक पद्धतीने काम होत असल्याचे दिसून येते.
झोन कार्यालयाकडून माहिती मागवली
महापालिका आयुक्तांनी चौकशीचे आदेश मोबाइलवरून दिल्यानंतर आम्ही झोन कार्यालयाकडून टँकरची माहिती मागवली आहे. त्याबाबत झोन कार्यालयास पत्र पाठवून चार दिवसांत माहिती सादर करा असे कळवले. अद्याप एकाही झोन कार्यालयाकडून माहिती आली नाही. माहिती आल्यावर चौकशी करू.
- अजयसिंह चौहान, मनपा मुख्य लेखापरीक्षक
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.