आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उजनीवर 1000 मेगावॅटचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प, 2 महिन्‍यांत अहवाल

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - उजनी धरणावर एक हजार मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प उभारण्याचा निर्णय शासनाच्या विचाराधीन आहे. त्याची अंमलबजावणी निश्चित करण्यासाठी महावितरणचे संचालक सतीश चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीने सर्व बाबींची पडताळणी करून दोन महिन्यांत अहवाल द्यायचा आहे. राज्याच्या उद्योग, ऊर्जा विभागाने याबाबतचे शासन निर्णय जाहीर केला.

 

राज्यातील ऊर्जेची वाढती मागणी लक्षात घेता, नवीन अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा विकास करणे अपरिहार्य असल्याचे मत नोंदवत ऊर्जा विभागाने हा प्रकल्प हाती घेण्याचे ठरवले. जमिनीवर उपलब्ध असलेल्या नैसर्गिक स्रोतांच्या वापरावर काही प्रमाणात मर्यादा येत असल्याने नदी, सागरे, धरणांच्या पृष्ठभागांवर लक्ष वेधले गेले.

 

उजनीवर १ हजार मेगावॅट क्षमतेचा तरंगता सौरऊर्जा प्रकल्प राबवण्यासाठी महावितरण कंपनीची अंमलबजावणी संस्था म्हणून नियुक्ती करण्यात आली. कंपनीनेही त्याचा प्राथमिक आराखडा सादर केला. त्याला व्यापक स्वरूप देण्यासाठी समिती स्थापन झाली.
या समितीमध्ये स्टेट ट्रान्समिशन युनिटचे मुख्य अभियंता, पुण्याच्या जलसंपदा विभागाचे मुख्य अभियंता, पर्यावरण विभागाचे संचालक, महाऊर्जाचे अतिरिक्त संचालक सदस्य आहेत. महावितरणचे अधीक्षक अभियंता सदस्य सचिव म्हणून काम पाहणार आहेत.

 

समितीचे कार्य
१. या प्रकल्पामुळे पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करणे.
२. सामाजिक घटकांकडून आवश्यक त्या परवानग्या प्राप्त करणे.
३. पाण्याच्या पातळीत होणारा बदल याचा महिनानिहाय आलेख घेणे.
४. प्रकल्पाची कार्यपद्धती आणि त्याची अंमलबजावणी निश्चित करणे.

 

टाकाऊपासून वीजनिर्मितीचे स्रोत
वीजनिर्मितीबाबत बहुपर्याय शोधण्यात येत आहेत. त्यात प्रामुख्याने टाकाऊ पदार्थांचा वापर करण्याचे ठरत आहे. त्याने पर्यावरणाचा समतोल राखता येतो. शिवाय टाकाऊ पदार्थांची विल्हेवाट हा महत्त्वाचा मुद्दा साध्य होतो. उसाची चिपाडे, कृषिजन्य टाकाऊ पदार्थ, सेंद्रीय, वैद्यकीय, खनिजजन्य टाकाऊ पदार्थांपासून वीजनिर्मिती शक्य आहे. साखर कारखान्यांमधून सहवीजनिर्मिती प्रकल्प सुरू झाले. त्याशिवाय समुद्राच्या लाटांपासूनही वीजनिर्मिती करता येते का, याचाही विचार सुरू असल्याचे ऊर्जा खात्याचे उपसचिव पी. पी. बडगेरी यांनी शासन आदेशात नमूद केले.

 

बातम्या आणखी आहेत...