आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सिद्धेश्वर वनविहारातील चंदनाची सुमारे २५ झाडे चोरांनी तोडली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- विजापूर रस्त्यावरील सिद्धेश्वर वनविहारातील चंदनाची सुमारे २५ झाडे अज्ञात चोरांनी रविवारी मध्यरात्री तोडली. निसर्गप्रेमींच्या सजगतेमुळे तोडलेली झाडे टाकून चोरांना पळ काढावा लागला. पोलिस, वनविभाग व निसर्ग मित्रांच्या गस्त मोहिमेत चोरट्यांची मोटारसायकल सापडली. श्वान पथकामार्फत तपासाचा प्रयत्न झाला. पण, यश मिळाले नाही. 


शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी १८६ हेक्टर क्षेत्रावर सिद्धेश्वर वनविहार आहे. या राखीव वनक्षेत्रातील चंदन झाड तोडण्याचे प्रकार सुरू होते. येथील नेचर कॉन्झर्व्हेशन सर्केलच्या सदस्यांनी चोरट्यांवर पाळत ठेवली. रविवारी रात्री झाडे तोडण्याचे प्रकार सुरू असल्याची माहिती खबऱ्यामार्फत समाजताच निसर्गप्रेमींचे पथक घटनास्थळी पोहोचले. उपवनसंरक्षक संजय माळी हे स्वत: साडेबारा वाजता वनविहारात दाखल झाले. रात्री गस्त घालणाऱ्या पोलिसांचे पथक मदतीसाठी आले. सायरनचा आवाज, बॅटरीचा उजेड दिसताच चोरट्यांनी पळ काढला. गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सूर्यकांत पाटील, सहायक निरीक्षक श्री. भोसले यांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या वेळी नेचर कॉन्झर्व्हेशनचे पप्पू जमादार, भरत छेडा, तरुण जोशी, अमोल मिस्कीन उपस्थित होते. 


वनविभागाचे दुर्लक्ष 
वनविहारात गेल्या अनेक महिन्यांपासून चंदनाच्या झाडांच्या चोरीचे प्रकार सर्रास सुरू आहेत. गेल्या चार महिन्यांपासून वनविभागाने वनविहारच्या सुरक्षितेतसाठी खासगी सुरक्षा रक्षकांची नियुक्ती केलीय. सर्वसामान्यांना वनविहारात ये-जा करण्यावर ठरावीक वेळ निर्धारित केली असून, इतरवेळी ये-जा करण्यावर निर्बंध घातले आहेत. रोजंदारी व कंत्राटी वनमजुरांची नियुक्ती त्या ठिकाणी आहे. वनविभागाच्या जिल्हास्तरीय कार्यालय व अधिकाऱ्यांच्या निवासस्थापासून जवळच असलेल्या या परिसरातील अवैध झाडं तोडीवर निर्बंध ठेवण्यात वनविभागास यश आले नाही. वनविभागाकडे गस्तीसाठी स्वतंत्र वाहनाची असूनही नियमित गस्त घालण्याबाबतचा वनअधिकाऱ्यांच्या निरुस्ताहाचा फायदा चंदन चोरट्यांनी उठवला. वनोपज नाका, लाकूड बाजार यासह सोईस्कर नियुक्तीसाठी प्रयत्नशील असणाऱ्या वनकर्मचाऱ्यांचे अवैध वृक्षतोडीकडे दुर्लक्ष आहे. 

 

लवकरच चोरट्यांना ताब्यात घेऊ : संजय माळी 
विहारातील चंदन चोरट्यांना पकडण्यासाठी गेल्या पंधरा दिवसांपासून आमचे प्रयत्न सुरू आहेत. नेचर कॉन्झर्व्हेशन सर्कलच्या सतर्कतेमुळे रविवारचा प्रकार उघडकीस आला. तोडलेली झाडे परिपक्व नसून, चोरटे सराईत नाहीत. पण, काही दिवसांपूर्वी सांगोला तालुक्यात चंदन चोरट्यांना आम्ही पकडले. जिल्ह्यात चंदन तस्करांची टोळी सक्रीय असून, पोलिसांच्या मदतीने लवकरच त्याचा छडा लावू, असे उपवनसंरक्षक संजय माळी यांनी सांगितले. 


श्वानपथक परिसरात घुटमळले 
पोलिस व वनकर्मचाऱ्यांनी सकाळी पुन्हा त्या परिसरात शोध घेतला. त्यावेळी झाडे तोडण्यासाठी वापरलेली कुऱ्हाड, करवत, चंदनाचे आेंडके भरलेली पिशवी आढळली. चोरट्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी श्वान पथक मागवले. ते साहित्य, पिशवी हुंगल्यानंतर श्वान पथक चोरट्यांचा माग घेत निघाले. पण, वनविहाराच्या हद्दीलगतच्या कुष्ठरुग्ण वसाहत परिसरातील तारेच्या कुंपणाजवळ घुटमळत राहिले. त्या ठिकाणी एक मोटारसायकल (एमएच १३ एके ७९९२) आढळली. त्याच्या मालकाचा शोध घेण्यासाठी उपप्रादेशिक परिवहन विभागाकडे पत्र दिले. पण, त्या मोटारसायकलचा चेसी व इंजिन नंबरची खाडाखोड केलेली तीही चोरीच्या उद्देशाने तयार केलेली असावी, अशी शक्यता पोलिसांनी व्यक्त केली. 

 

पुढील स्लाइडवर पाहा संबंधीत फोटोज्...

बातम्या आणखी आहेत...