आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्ह्यात ३१ हजार शेतकरी अद्याप कर्जमाफीच्या प्रतीक्षेत; वंचित शेतकऱ्यांची वाढली धाकधूक

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- 'छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना' अर्थात कर्जमाफीसाठी जिल्ह्यात अद्यापही ३१ हजार शेतकरी प्रतीक्षेत आहे. ही योजना हाताळणारी यंत्रणा गेल्या दीड महिन्यापासून ठप्प झाली. त्यामुळे या शेतकऱ्यांची धाकधूक वाढली. 


कर्जाच्या खाईत अडकलेल्या शेतकऱ्यांना मदतीचा हात देण्यासाठी ही योजना सुरू झाली. गेल्या वर्षी जुलैमध्ये त्याचा अध्यादेश निघाला. दीड लाखापर्यंतची कर्जमर्यादा ठेवून त्याच्या अंमलाला सुरुवात झाली. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत त्याचे सर्वाधिक लाभार्थी ठरले. 


या बँकेच्या माध्यमातून १ लाख २४ हजार ९२५ कर्जदार शेतकऱ्यांनी कर्जमाफी योजनेसाठी ऑनलाइन माहिती भरली. आतापर्यंत ८३ हजार ८२८ शेतकऱ्यांनाच त्याचा लाभ मिळाला. शासनाने जिल्हा बँकेकडे पाठविलेल्या यादीत ९३ हजार १११ शेतकरी कर्जमाफीस पात्र आहेत. त्यातील ८३ हजार ८२८ शेतकऱ्यांना प्रत्यक्षात कर्जमाफीचा लाभ मिळाला आहे. अद्यापही ३१ हजार ८३१ शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. एकरकमी परतफेड योजनेसाठी १७ हजार शेतकरी पात्र आहेत. पण, त्या योजनेत केवळ ६ हजार ७१४ शेतकऱ्यांनीच सहभाग घेतला आहे. 


आता उपाय काय? 
जिल्हा बँकेचे कर्जदार असलेले ३१ हजार ८३४ शेतकरी आजही कर्जमाफी योजनेपासून वंचित आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील विविध कार्यकारी सोसायट्यांनी किती शेतकऱ्यांना लाभ मिळाला आणि किती शेतकरी वंचित आहेत, याची यादी तयार करावी. ती यादी सहायक निबंधक कार्यालयाला द्यावी. उर्वरित शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्याबाबतचा ठराव करून तो शासनाकडे पाठवायला हवा. यावर हाच उपाय आहे. परंतु सोसायट्यांनी याबाबत रेटा ठेवला पाहिजे. 


सरकारने शेतकऱ्यांवर अविश्वास दाखवला 
राज्यातील भाजप सरकारने शेतकरी व बँकांवर अविश्वास दाखवला आहे. कर्जमाफी योजना राबविताना वेळकाढू धोरण अवलंबिले. शेतकऱ्यांचे बुद्धिभेद करण्यात तरबेज असलेले हे सरकार आहे. दिलेल्या आश्वासनाप्रमाणे सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ सरकारने द्यावा.
- राजन पाटील, माजी अध्यक्ष, जिल्हा बँक 

बातम्या आणखी आहेत...