आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

३५ सशांची हत्या, मिरवणुकीला नेताना २३ जणांना घेतले ताब्यात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कारहुणवीच्या दुसऱ्या दिवशी, गुरुवारी अक्कलकोट तालुक्यातील वागदरी, कोन्हाळी आणि हंचगी शिवारात सामूहिकरीत्या ३५ सशांची हत्या करण्यात आली. मारलेल्या सशांना काठीस बांधून मिरवणुकीच्या तयारीत असताना वनविभाग आणि नेचर काॅन्झर्वेशन सर्कलच्या सदस्यांनी पोलिसांच्या मदतीने अशांची शिकार केल्याप्रकरणी २३ जणांना ताब्यात घेतले. 


सीमावर्ती भागातील शेतकऱ्यांचा मोठा सण कारहुणवी बुधवारी उत्साहात साजरा झाला. दुसरा दिवस 'कर' म्हणून पाळला जातो. शिकारीच्या घटना थांबवण्यासाठी वनविभागाने बुधवारी पाच विशेष पथकांची नियुक्ती केली होती. दक्षिण सोलापूर, अक्कलकोट, मंगळवेढा तालुक्यातील सीमावर्ती भागात पथकाची गस्त होती. गुरुवारी दुपारी कोन्हाळी, हंचगी शिवारात शिकार घडल्याची माहिती मिळताच, नेचर कॉन्झर्व्हेशन व वनविभागाचे पथक घटनास्थळी गेले. त्यावेळी आठ ते दहा सशांची शिकार करून ती काठीला बांधून निघाल्याचे दिसले. वनविभागाची गाडी दिसताच, ससे बांधलेली काठी, जाळे टाकून त्या शिकाऱ्यांनी पळ काढला.


काय आहे करीची प्रथा? 
नैसर्गिक आपत्ती, दुष्टचक्र यातून गावकऱ्यांचे रक्षण करण्यासाठी गावच्या वेशीत 'आळबळकव्वा' देवीला करीदिनी मांसाचा नैवेद्य दाखवण्याची प्रथा महाराष्ट्र-कर्नाटकच्या सीमावर्ती भागातील अनेक गावांत अजूनही सुरू आहे. करीदिवशी काही लोक शिकारीसाठी काठ्या, कुऱ्हाडी, कुत्रे घेऊन बाहेर पडतात. त्यांच्या जेवणाची व्यवस्था गावातील मानकरी, प्रतिष्ठित मंडळी करतात. शिकार मिळेपर्यंत ते गावात परत येत नाहीत. ससा, घोरपड, तीतर, काळवीट यासह इतर लहान मोठे पक्षी, प्राण्यांची शिकार होते. मिळालेली शिकार गावच्या वेशीजवळ आल्यानंतर दोन काठ्यांना बांधलेल्या दोरीवर लटकवून त्याची सवाद्य मिरवणूक काढण्यात येत. 'आळबळकव्वा' देवीला त्या शिकारीचे मुंडके, मांसाचा नैवेद्य दाखवून पुन्हा मातीने झाकण्यात येते. गावातील मानकरी, वतनदारांच्या कोठ्यात शिकारीचे कान, पायाचे तुकडे पुरण्यात येते. 

बातम्या आणखी आहेत...