आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

57 हजार शेतकऱ्यांची कर्जमाफी लटकली, आता पडताळणी सुरू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शेतकरी कर्जमाफीच्या रकमा पाठवण्यातील प्रक्रियेत सुमारे ५७ हजार लाभार्थी लटकलेल्या अवस्थेत आहेत. त्यांचे अर्ज आणि बँकेकडील उपलब्ध रेकॉर्ड जुळत नसल्याने त्याची पुन्हा पडताळणी सुरू झाली. चार दिवसांपूर्वी आलेल्या १० हजार शेतकऱ्यांच्या यादीत त्रुटी होत्या. त्यानंतर आलेल्या ४७ हजार ११ शेतकऱ्यांच्या यादीतही अशाच त्रुटी राहिल्या. बँकेतील माहितीशी आकडेवारी जुळत नाही. त्यामुळे पुन्हा पडताळणी करून त्याबाबत निर्णय घेण्याचे ठरले, अशी माहिती जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष राजन पाटील यांनी दिली. 


दीड लाख रुपयांपर्यंतच्या थकबाकीदार शेतकऱ्यांसाठी राज्य सरकारने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजना दिली. त्यानुसार पात्र शेतकऱ्यांचा सात बारा उतारा कोरा करण्याचे काम सुरू झाले. शेतकऱ्यांनी केलेले अर्ज अन् जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील रेकॉर्ड सरकारने पाठविलेल्या यादीशी जुळलेले नाही. त्यानुसार पडताळणीचे काम सध्या सुरू आहे, ज्यांची कर्जमाफी शासनाच्या निकषात बसत नाही. आधार क्रमांक, खाते क्रमांक, जन्मतारीख, बँकेचे खाते आदी बाबींमध्ये मोठ्या प्रमाणात चुका आढळल्या आहेत. त्यामुळे एकूण ५७ हजार ११ शेतकऱ्यांची शासनाकडून आलेली यादी, शेतकऱ्यांनी केलेले अर्ज आणि बँकेकडील रेकॉर्ड जुळत नसल्याने सरकारी यंत्रणेबरोबरच जिल्हा बँकेला नवे काम लागले आहे. 


सरकारच्या कर्जमाफीत जिल्हा मध्यवर्ती बँकेकडील ९५ हजार १७९ शेतकऱ्यांना ३५९ कोटी ३४ हजार १२७ रुपये मिळणे अपेक्षित होते. परंतु तेवढी रक्कम सरकारकडून प्राप्त झालेली नाही. ५१ हजार १८१ शेतकऱ्यांच्या खात्यावर २६५ कोटी जमा केले. 


शेतकऱ्यांची यादी सरकारकडे दिली 
जिल्हा मध्यवर्ती बंॅकेचे अध्यक्ष राजन पाटील म्हणाले, सरकारकडून २८ हजार ३७० शेतकऱ्यांची यादी जिल्हा बँकेत यापूर्वी आली होती. या यादीत पूर्णपणे त्रुटी असल्याचे आढळून आले. त्यानुसार जिल्हा बँकेच्या शाखास्तरावरून ही यादी दुरुस्त करण्यात आली. त्यानंतर पुन्हा ती शासनाकडे पाठविण्यात आली. त्यापाठोपाठ आलेल्या १० हजार १४० शेतकऱ्यांच्या यादीतही त्रुटी आढळल्या. त्यामुळे ही यादी पुन्हा शाखांकडे पाठविण्यात आली. आता शासनाने ठरवून दिलेल्या १ ते ६६ कॉलमच्या अहवालात या शेतकऱ्यांची माहिती भरून ती पुन्हा शासनाकडे पाठविण्यात येईल. 


८ कोटी परत पाठवले 
जिल्हा बँकेकडे कर्जमाफीसाठी सरकारकडून आलेल्या एकूण रकमेपैकी १० कोटी रुपये शिल्लक होते. त्यापैकी ८ कोटी रुपये शासनाच्या सूचनेनुसार परत पाठविले. उर्वरित २ कोटी रुपये एकरकमी परतफेड योजनेसाठी राखीव ठेवले आहेत. 
- किसन मोटे, सरव्यवस्थापक जिल्हा बँक 

बातम्या आणखी आहेत...