आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धावपळीच्या युगात ८० टक्के विद्यार्थी तणावाखाली : डॉ. मेतन

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अक्कलकोट- आयुष्य धकाधकीचे झाल्यामुळे तणाव अपरिहार्य आहे. शहरीकरणाने आधुनिक मानवाला दिलेली ही सगळ्यात वाईट भेट आहे. पण आयुष्य तणावाने व्यापणे योग्य नाही. त्याचा योग्यवेळी निचरा केलाच पाहिजे. धावपळीच्या युगात ८० टक्के विद्यार्थ्यांना ताणतणाव असल्याचे मत, समुपदेशक डॉ. व्यंकटेश मेतन (सोलापूर) यांनी व्यक्त केले. खेडगी महाविद्यालयात स्ट्रेस मॅनेजमेंट व विद्यार्थ्यांचे समुपदेशन विषयावर व्याख्यानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. एस. सी. अडवितोटे तर व्यासपीठावर प्रा. किसन झिपरे, प्रा. संध्या परांजपे उपस्थित होते. 

 

यावेळी डॉ. मेतन म्हणाले, धावपळीच्या युगात ८० टक्के विद्यार्थ्यांना ताणतणाव असून अशा परिस्थितीवर मात करण्यासाठी आई, वडील व प्राध्यापकांशी चर्चा करावी. शरीरातील स्ट्रेंथस विकनेसेस जाणून घ्यावेत. दिवसभरातील अभ्यासाचा प्राइम टाइम जाणून घ्यावा. प्रत्येक दिवसासह प्रत्येक महिन्याचे व वर्षभराचे कॅलेंडरप्रमाणे नियोजन करावे. यावरून अभ्यास उत्तमरीत्या होऊन ताणतणाव निश्चितच कमी होण्यास मदत होईल. ४५ मिनिटे अभ्यास केल्यानंतर १०, १५ मिनिटे विश्रांती घेणे महत्त्वाचे आहे. दिवसभरात कोणत्या गोष्टी करावयाच्या आहेत त्याची यादी करून त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन मेतन यांनी केले. 

 

प्रा. किसन झिपरे म्हणाले, तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. अभ्यासात अडचणी येतात. थकवा वाटू लागतो. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम सुरू होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा येतो. संताप वाढतो. आरोग्य बिघडते. याशिवाय मानसिक आजारही घेरतात. तणाव वाढल्यास लोक मद्य, ड्रग्ज, धूम्रपान सेवन सुरू करतात. त्यामुळे तात्पुरते बरे वाटत असले तरी तणाव कायमस्वरूपी दूर होत नाहीत व आरोग्याच्या इतर समस्या सुरू होतात. त्यामुळे तणाव दूर करण्यासाठी जीवनपद्धती बदलण्याची गरज आहे.एम. ए. तांबोळी यांनी युथ हॉस्टेस संबंधी सविस्तरपणे माहिती यावेळी सांगितली. प्रमुख अतिथींचा परिचय डॉ. आय. एम. खैरदी यांनी केला. सूत्रसंचालन प्रा. जयश्री बिराजदार यांनी तर प्रा. आबाराव सुरवसे यांनी आभार मानले. 

बातम्या आणखी आहेत...