आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलगाडी दिंडीने पश्चिम विदर्भातील कृषी महोत्सवाला खामगावात प्रारंभ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
खामगाव - पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या कृषी महोत्सवाला स्थानिक पॉलिटेक्निक मैदानावर प्रारंभ झाला आहे. या महोत्सवाच्या प्रचारार्थ आ. अॅड. आकाश फुंडकर यांच्या नेतृत्वात आज १६ फेब्रुवारी रोजी खामगाव शहरातील आंबेडकर मैदानावरून सुमारे ४ किमी लांबीची बैलगाडी दिंडी मिरवणूक काढण्यात आली. या दिंडीला कृषी व फलोत्पादन मंत्री तथा पालकमंत्री भाऊसाहेब फुंडकर यांनी हिरवी झेंडी दाखवली. दिंडी शहरातील मुख्य मार्गावरून काढण्यात आली.

 

शेतकरी बांधवांचे शेतीचे उत्पादन दुप्पट व्हावे यासाठी राज्य सरकारने संपूर्ण राज्यात जिल्हा कृषी महोत्सवाचे आयोजन केले. त्यानुसार आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित शेतीची माहिती आणि शासकीय योजनांचा प्रचार-प्रसार शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी शहरात आजपासून चार दिवसीय भव्य कृषी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात पाणलोट, सेंद्रिय शेती, शेततळे, सौर ऊर्जा, यांचे जिवंत देखावे ठेवण्यात आले आहेत. तसेच पशू पालन, फळबाग, शेतीसाठी बहुपयोगी यंत्र सामग्री, नवीन तंत्रज्ञान, यासह जवळपास ४०० हून अधिक स्टॉल आहेत. या महोत्सवाचे जनजागरण करण्यासाठी बैलगाडी दिंडी काढण्यात आली. बैलगाडी दिंडीत सुमारे २५० बैलगाडी व शेती उपयोगी यंत्रसामुग्रीसह सुमारे १०० च्यावर ट्रॅक्टरांचाही या दिंडीत सहभाग होता. ही दिंडी नगर पालिका मैदानावरून निघून बसस्थानक टर्निंग, नगर पालिका समोरून, टिळक पुतळा, मेन रोड, महावीर चौक, शहर पोलिस स्टेशन समोरून, टॉवर चौक, नांदुरा रोड, जलंब नाका वरुन थेट पॉलिटेक्निक मैदानावरील कृषी महोत्सवाच्या ठिकाणी या दिंडीचा समारोप करण्यात आला. हा कृषी महोत्सव २० फेब्रुवारीपर्यंत चालणार असल्याने खामगाव शहर शेतकऱ्यांनी गजबजले आहे.

 

बैलांसाठी चारा-पाण्याची व्यवस्था : कृषी महोत्सवाच्या जन जागरणासाठी आयोजित बैलगाडी दिंडीसाठी आणलेल्या बैलांचीही काळजी घेण्यात आली. दिंडीत बैलगाडीला जुंपलेल्या बैलांसाठी ढेप आणि चारा-पाण्याची व्यवस्था करण्यात आली होती.


विविध सांस्कृतिक कार्यक्रम
आजपासून सुरु झालेल्या कृषी महोत्सवात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये १७ फेब्रुवारीला सायंकाळी ६ ते १० वाजेपर्यंत सुप्रसिद्ध गायिका वैशाली सामंत यांचा गीत गायनाचा कार्यक्रम होणार आहे. तर १८ फेब्रुवारीला लावणीचा कार्यक्रम चैताली राजे सादर करतील. त्याचप्रमाणे १९ फेब्रुवारीला शिवजयंतीला विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

 

मुख्यमंत्री आज खामगावात
पश्चिम विदर्भातील सर्वात मोठा कृषी महोत्सव शहरात आयोजित करण्यात आला आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १७ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता शहरात येणार आहे. याचबरोबर कृषी मंत्री भाऊसाहेब फुंडकर यांचेसह मंत्रीगण व खासदार, आमदारांची उपस्थिती राहणार आहे, असे भाजपकडून कळवण्यात आले आहे.

 

कृषी महोत्सवास अवश्य भेट द्या
या कृषी महोत्सवास पश्चिम विदर्भातील शेतकरी बांधवांनी आपल्या कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचा प्रयत्न करण्याचे दृष्टीने नवीन तंत्रज्ञान व शेती पुरक व्यवसाय करण्यासाठी एकदा अवश्य भेट द्यावी.
- ॲड. आकाश फुंडकर, आमदार, खामगाव.

बातम्या आणखी आहेत...