आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नियोजनशून्य कारभारामुळे \'एएमटी\' बंद, तोडगा काढण्याच्या जोरदार हालचाली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नगर- सुमारे तीन वर्षांपूर्वी सुरू झालेली शहर बससेवा (एएमटी) महापालिकेच्या नियोजनशून्य कारभारामुळे सोमवारी बंद झाली. महापालिकेने ८० लाख रुपये थकवल्याने ही सेवा चालवण्यास यशवंत ऑटो या ठेकेदार संस्थेने असमर्थता दर्शवली. 

 

विद्यार्थ्यांसह नागरिकांना आता बसभाड्याच्या तिप्पट प्रवासभाडे देऊन रिक्षाने प्रवास करावा लागणार आहे. महापौर सुरेखा कदम यांच्या उपस्थितीत ठेकेदार संस्थेसमवेत झालेली बैठक वांझोटी ठरल्याने तोडगा निघाला नाही. ही सेवा पुन्हा सुरू करण्यासाठी पहिल्या टप्प्यात किमान तीस लाख रुपये ठेकेदाराला द्यावे लागतील; अन्यथा शहर बससेवेचे चाक फिरणार नाही. दरम्यान, सोमवारी रात्री उिशरापर्यंत तोडगा काढण्याबाबत बैठक सुरु होती. त्यात तोडगा निघाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे मंगळवारी सेवा सुरु होण्याची शक्यता आहे. 

तत्कालीन महापौर संग्राम जगताप यांच्या कार्यकाळात १४ ऑगस्ट २०१४ पासून नगरकरांच्या सोयीसाठी शहर बससेवा दुसऱ्यांदा सुरू करण्यात आली होती. महापालिकेने १० वर्षांचा करार करताना अटी व शर्ती घातल्या होत्या. करारातील अट क्रमांक १२ नुसार वाहनतळ, वर्कशॉप, ऑफिस, तसेच मध्यवर्ती बस्थानकासाठी खुली जागा मनपातर्फे उपलब्ध करून देण्याचे ठरले होते. तीन वर्षांत मनपाने जागा उपलब्ध करून दिली नाही. अट क्रमांक १४ नुसार बससेवेसाठी महापालिकेने दरमहा पाच लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याचे मान्य केले होते. पण या अटीचाही महापालिकेला २०१६ पासून विसर पडला आहे. आर्थिक मदतीचे दरमहा ५ लाख याप्रमाणे १६ महिन्यांचे ८० लाख रुपये थकले आहेत. 

 

डिझेलचे वाढते भाव, दुरुस्ती देखभाल, कर्मचाऱ्यांचा पगार आदींचा खर्च भागवणे ठेकेदार संस्थेला अशक्य झाले आहे. यासंदर्भात महापालिकेला वारंवार नोटिसा देऊनही त्याची दखल सत्ताधाऱ्यांनी, तसेच प्रशासनानेही घेतली नाही. त्यामुळे ठेकेदार संस्थेने सोमवारपासून शहर बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला. ही सेवा बंद झाल्याने शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे हाल होणार आहेत. त्यातच सध्या परीक्षांचा हंगाम असल्याने विद्यार्थी वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. स्थायी समितीने यापूर्वीच ठेकेदार संस्थेची शहर बससेवा खंडित करण्याचे निर्देश दिले होते. त्यानंतर अभिकर्ता संस्थेलाही पैसे दिले नाहीत. 


दरम्यान, दुपारी महापौर सुरेखा कदम यांच्या उपस्थितीत ठेकेदारासमवेत बैठक झाली. यावेळी आयुक्त घनशाम मंगळे, सभागृहनेता उमेश कवडे, विरोधी पक्षनेता बाळासाहेब बोराटे, नगरसेवक अनिल शिंदे आदी उपस्थित होते. पण कोणताही तोडगा न निघाल्याने बैठक वांझोटी ठरली. त्यामुळे वाहन नसलेल्या नगरकरांना चढ्या दराने रिक्षातून प्रवास करावा लागणार आहे.शहर बससेवा बंद केल्याने सोमवारी सर्व बस कल्याण रस्त्यावरील डेपोत लावण्यात आल्या आहेत. 

 

आयुक्तांशी चर्चा करून मार्ग काढू 
आम्ही बससेवा बंद केली नाही. ठेकेदाराने ही सेवा बंद केली आहे. बससेवा सुरू ठेवण्याबाबत आम्ही सांगितले आहे. महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. त्यामुळे एवढी रक्कम लगेच देता येणार नाही. आम्ही ठेकेदार संस्थेच्या संपर्कात आहोत. आयुक्तांशी चर्चा करून बससेवा सुरु ठेवण्यासाठी मार्ग काढला जाईल.'' सुरेखा कदम, महापौर. 

 

शहर बससेवा माळीवाडा ते निंबळक १३ रुपये, विखे काॅलेज १५, पाइपलाइन रोड १३, माळीवाडा ते न्यू आर्टस्् ५ , सारडा कॉलेज ७, नागापूर १० रुपये असे भाडे आकारत असे. आता ही सेवा बंद झाल्याने रिक्षाचालक पन्नास रुपये आकारू लागले आहेत. त्यामुळे ही सेवा परवडत नाही. रिक्षाचालक आधीपासूनच मुजोरी करत असल्याने प्रवासी वैतागतील. 

 

तोडगा निघालाच नाही 
बससेवा बंद केल्यानंतर दुपारी महापालिकेत महापौरांसमवेत बैठक झाली. त्यात कोणताही तोडगा निघाला नाही. आम्ही किमान तीस लाख रुपये पहिल्या टप्प्यात भरण्याची मागणी करत होतो. उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत अधिकारी नसल्याचे कारण देऊन सेवा सुरु करण्यास सांगितले पण आम्हाला लेखी िकंवा रक्कम द्यावी.'' धनंजय गाडे, संचालक, यशवंत ऑटो. 

 

नाकर्त्या सत्ताधाऱ्यांमुळे सेवा बंद 

शहर बससेवा बंद झाल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नगर शहरात ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. नगरकरांना सुविधा देण्यासाठी आमच्या काळात बससेवा सुरू करण्यात आली. नाकर्त्या शिवसेनेने बससेवा बंद करून नगरकरांना वेठीस धरले आहे. केंद्रात, राज्यात व मनपात भाजप व शिवसेनेची सत्ता असताना त्यांनी केवळ राजकारणासाठी सत्तेचा वापर केला. नगरकर त्यांना धडा शिकवतील, अशी टीका आमदार संग्राम जगताप यांनी केली. शहर बससेवा बंद झाल्याच्या निषेधार्थ आमदार जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने माळीवाडा बसस्थानक चौक, दिल्ली दरवाजा, भिस्तबाग चाैक आदी ठिकाणी आंदोलन करण्यात आले. काळ्या फिती लावून मनपा सत्ताधारी व प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी जगताप म्हणाले, नाकर्त्या शिवसेनेने बससेवा बंद करून नगरकरांना वेठीस धरले आहे. पाणीपुरवठ्याची वीज वारंवार खंडित होते. पथदिव्यांचाही वीजपुरवठा खंडित होऊन ते बंद पडत आहेत. नियोजनशून्य कारभारामुळे नगरकरांना हाल सोसावे लागत आहेत. शिवसेनेला विकासाची व्याख्याच माहिती नाही. केंद्रात, राज्यात व महापालिकेत शिवसेना व भाजपची सत्ता आहे. या सत्तेचा उपयोग ते स्वत:च्या राजकारणासाठी करत आहेत. आम्ही ज्या सुविधा नगरकरांना देत होतो, त्या यांना सुरू ठेवता येत नाही. पुढील निवडणुकीत नगरकर त्यांना धडा शिकवतील. शिवसेनेच्या काळात मनपात भ्रष्टाचाराने उच्चांक गाठला आहे. ४० लाखांच्या पथदिवे भ्रष्टाचारातही शिवसेनेचे हात आहेत. बससेवेमुळे महिला सुरक्षित प्रवास करत होत्या. बससेवा बंद झाल्याने त्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. बससेवा सुरू न केल्यास शिवसेनेला धडा शिकवू, असे त्यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...