आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विश्लेषण : बाजार समितीचा निकाल; काँग्रेसला संजीवनी देणारा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- लोकसभा, विधानसभा निवडणुकीतील दारूण पराभवानंतर बॅकफूटवर गेलेल्या काँग्रेस पक्षाला व नेत्यांना बाजार समितीचा निकाल नवसंजीवनी देणारा ठरला आहे. आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निकालाने आत्मविश्वास वाढणारा ठरला आहे. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी नाराज काँग्रेसजनांना सोबत घेऊन बाजार समिती ताब्यात घेण्याची व्यूहरचना आखली होती, पण माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे सर्व काँग्रेसजनांना एकत्र आणून सहकारमंत्री सुभाष देशमुखांना बाजार समितीच्या प्रवेशद्वारावरच रोखले. 


बाजार समिती निवडणुकीत काँग्रेसची सत्ता कायम राहिली असली तरी दक्षिणमधील काँग्रेसच्या नाराज नेत्यांना अद्याप सभापती पदाची प्रतिक्षाच राहिली आहे. सुशीलकुमार शिंदे यांनी सभापती व उपसभापती पदाचा निर्णय घेतल्याने त्यावर एकाही नाराज नेत्यांनी प्रतिक्रिया दिली नाही. पण सर्वांना संधी दिली जाणार या सूचक वक्तव्यावरून निवडीचा कालावधी एक वर्षापुरता असावा, या शंकेस वाव मिळतो. 


निवडणूकपूर्वी सभापती पदासाठी बाळासाहेब शेळके तर उपसभापती पदासाठी जितेंद्र साठे यांची नावे चर्चेत होती. पण आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून निवड केल्याचे दिसते. या निर्णयप्रक्रियेत श्रीशैल नरोळे यांना उपसभापतीची संधी देत आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांनी मतदारसंघाला झुकते माप दिले आहे. निवडणुकीच्या पूर्वी ३९ कोटी अपहाराच्या आरोपाखाली दिलीप मानेंसह माजी संचालकांवर गुन्हे दाखल केले. उमेदवार निवड करताना राष्ट्रवादी, शिवसेना व पालकमंत्री यांना पॅनलमध्ये संधी देत सर्वसमावेशक पॅनल तयार केले. याच ठिकाणी निम्मी लढाई माने यांनी जिंकली होती. पण प्रचार काळात अटकपूर्व जामीन नामंजूर झाल्यानंतर काही दिवस फरार व्हावे लागले. नेमका हाच मुद्दा प्रचाराच्या शेवटच्या दोन दिवसांत मतदारांसमोर मांडला आणि मोठा विजय झाला. 


ती बैठक ठरली निर्णायक... 
सभापती दिलीप माने यांच्या कार्यशैलीवर नाराज असलेले राजशेखर शिवदारे, बाळासाहेब शेळके, सुरेश हसापुरे यांच्यासह आदी कार्यकर्ते सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्यासोबत बाजार समिती निवडणूक लढविणार असल्याची चर्चा होती. याची कुणकुण लागताच सुशीलकुमार शिंदे यांनी मकरसंक्रांतीच्या पूर्वसंध्येला जनवात्सल्यवर बैठक बोलाविली. तुम्ही तुमच्यापुरता विचार न करता पक्षाचा विचार करा. सर्वांनी मतभेद विसरून एकत्र येणे किती गरजेचे आहे हे सुशीलकुमार शिंदे यांनी त्यांच्या भाषेत सांगितले. त्यानंतर पुढील सर्व नियोजन झाले आणि बाजार समितीवर काँग्रेसचा झेंडा फडकला. सर्व काँग्रेस नेत्यांची शिंदे यांनी बैठक घेतली नसती तर कदाचित चित्र वेगळे राहिले असते.

बातम्या आणखी आहेत...