आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समाजोद्धारक राजर्षी छत्रपती शाहू महाराज

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एकविसाव्या शतकातही महाराष्ट्रात फुले, शाहू, आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हणून ओळखले जाते. समता, न्याय, बंधुता या तत्त्वांचे विचार राज्यभर रुजवण्याचे कार्य अनेक महापुरुषांनी केले. महात्मा फुले यांच्यापासून सामाजिक चळवळ जोर धरू लागली होती. त्या काळात राजा राममोहन रॉय, राजर्षी शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आदी या विचारवंतांनी अस्पृश्य निवारणाचा, समाजोद्धाराचा व महाराष्ट्राला पुरोगामी बनवण्याचा यशस्वी प्रयत्न केला. संस्थानिक, छत्रपती असतानाही समाजोद्धाराचे, अस्पृश्योद्धाराचे अतुलनीय कार्य राजर्षी शाहू महाराजांनी केले. आज त्यांची जयंती त्या निमित्ताने... 


कोल्हापुरात जयसिंगराव घाटगे व राधाबाई यांच्या पोटी यशवंतरावांचा २६ जून १८७४ रोजी जन्म झाला. पुढे राणी आनंदीबाई यांनी यशवंतरावांना १८८४ मध्ये दत्तक घेतले. अन्् यशवंतराव कोल्हापूरच्या गादीवर शाहू छत्रपती म्हणून विराजमान झाले. राजकोट, धारवाड येथे शिक्षण झाले. शिक्षणाबरोबरच नेमबाजी, कुस्ती, अश्वारोहण याचेही शिक्षण त्यांनी घेतले. १८९३ पासून राज्यकारभारात व सार्वजनिक कार्यक्रमात ते भाग घेऊ लागले. न्यायदानही करू लागले. तेव्हा प्रजेच्या समस्यांचे, परिस्थितीचे जवळून अवलोकन करू लागले. प्रजेच्या हितासाठी समाजोपयोगी कार्य करू लागले. स्वस्त धान्याची दुकाने आपल्या राज्यात त्यांनी सुरू केली. लोकांकडे पैसा यावा म्हणून रस्ते, विहिरी, तलाव, रोजगार हमीची कामे त्यांनी सुरू केली. सरकारची जंगले आणि कुरणे जनतेच्या जनावरांसाठी खुली केली. दुष्काळ निवारणाच्या अनेक योजना त्यांनी सुरू केल्या. प्रजेच्या हिताचे रक्षण करणारा राजा म्हणून शाहू महाराजांकडे जनता पाहू लागली. 


दीन, दलित, दुबळ्यांच्या उद्धारासाठी शिक्षण गरजेचे असल्याने त्यांनी सर्वांसाठी शिक्षणाचे द्वार खुले केले. महात्मा फुले यांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अाधार घेऊन शैक्षणिक कार्य सुरू केले. अस्पृश्यांसाठी स्वतंत्र शाळा सुरू केल्या. प्रत्येक जातीसाठी स्वतंत्र वसतिगृहे काढली. अस्पृश्यांना दारिद्र्याच्या आणि दु:खाच्या चिखलातून बाहेर काढणे हे माझे पवित्र कार्य आहे, असे ते म्हणत. यासाठी कृतिशील कार्य सुरू केले. जिथे शक्य असेल तेथे अस्पृश्य लोकांची नेमणूक केली. लष्करी फड, तलाठी, म्युनिसिपालिटीचा चेअरमन, माहूत, कोचमन, चालक, शिकारखान्याचे कामगार आदी ठिकाणी महार लोकांची नेमणूक केली. स्त्रियांच्या शिक्षणासाठी त्यांनी शिष्यवृत्तीही देऊ केल्या. आपल्या घराण्यातील राणी इंदुमती या अकाली विधवा झाल्यानंतर त्यांना उच्च शिक्षण देण्याचा निर्णय राजांनी घेतला. असा स्त्रियांच्या, अस्पृश्यांच्या हिताचे कार्य करणारा राजा म्हणून ते लोकमान्य झाले. 


राजांनी संगीत, नाट्य, चित्रकला या कलांनाही आश्रय दिला. गानमहर्षी अल्लादियाखा, गायक अब्दुल करीमखाँ, गोविंदराव टेंबे, बालगंधर्व, केशवराव भोसले अशा अनेक कलावंतांच्या कलेची कदर राजांनी केली. कला क्षेत्राला न्याय देत त्यांनी कोल्हापूरला चित्रपटसृष्टीचे माहेरघर बनवले. असे मानवतावादाचा पुरस्कार करणारे, सामान्यांच्या न्याय्यहक्कासाठी आपल्या पदाचा उपयोग करणाऱ्या राजर्षींनी अनेक लोकोपयोगी कामे केली. 

 

- प्रा. जवाहर मोरे, संतोष भीमराव पाटील महाविद्यालय, मंद्रूप 

बातम्या आणखी आहेत...