आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा
आयआरसीटीसीने ओला कॅबशी प्रायोगिक तत्त्वावर सहा महिन्यांसाठी करार केला आहे. या अंतर्गत प्रवासी ऑनलाइन तिकीट काढत असतानाच त्याला ओला कॅब अथवा ओला रिक्षा बुक करण्याची सुविधा वेबसाइटवर तसेच आयआरसीटीसी रेल कनेक्ट या अॅप वर उपलब्ध केली आहे. त्यामुळे प्रवासी रेल्वे स्थानकावर उतरल्यानंतर त्यांची ओला कॅब बरोबर सेवा सुरू होईल. त्यामुळे प्रवाशांना स्थानक बाहेर आल्यानंतर रिक्षा अथवा टॅक्सी शोधण्याच्या कटकटीला तोंड द्यावे लागणार नाही. प्रवाशांच्या सोयीसाठी आपल्या प्रवासाच्या ७ दिवस आधी ते आपली गाडी स्थानकावर पोहाेचेपर्यंत प्रवासी ओला कॅब बुक करता येणार आहे. ओला कॅब बरोबरच प्रवासी ओला मायक्रो, ओला मिनी, ओला अॅटो व ओला शेअर या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत.
स्थानक परिसरातच ओला साठी जागा
रेल्वे प्रशासन व ओला यांच्यात देशातील काही स्थानकावर करार झाला आहे. त्यानुसार रेल्वे स्थानकाच्या परिसरातील जागा ओला कॅब साठी राखीव ठेवण्यात आली आहे. सोलापूर रेल्वे स्थानकावर मात्र हा करार होऊ शकला नाही. सोलापूर रेल्वे प्रशासनाने स्थानकाच्या परिसरातील दुचाकी पार्किंगच्या जागा ओला कॅबला भाडेतत्त्वावर देण्याचा प्रस्ताव दिला. या बदल्यात आेलाने वर्षासाठी रेल्वेला दहा लाख रुपयांचे भाडे द्यावे असे रेल्वेने सांगितले. ओलाने शक्य नसल्याचे सांगितल्यानंतर सोलापुरात रेल्वे व ओला यांच्यात करार झालेला नाही. मात्र आयआरसीटीसीच्या सेवेचा याच्याशी संबंध नाही.
कसे कराल बुक
आयआरसीटीसीच्या वेबसाइटवरून अथवा अॅपवरून आपण या सुविधेचा लाभ घेऊ शकाल. आयआरसीटीसीला लॉगिन झाल्यानंतर बुक अथवा कॅन्सल कॅब हा पर्याय येईल. या पर्यायाला ओके केल्यानंतर आपल्याला प्रवासाचा तपशील द्यावा लागेल. प्रवासाचा तपशील दिल्यानंतर ओला कॅब बुक झाल्याचा संदेश प्राप्त होईल.
प्रवाशांच्या सेवेसाठी सेवा
प्रवाशांनी घराबाहेर पडल्यापासून ते त्यांना आपल्या गंतव्य स्थानापर्यंत पाेहोचविण्याच्या उद्देशाने ही सुविधा सुरू करण्यात आली. ज्या शहरात ओला कॅब सुरू आहे. त्याच ठिकाणी ही सेवा कार्यरत राहील. प्रायोगिक तत्त्वावर ही सेवा सुरू करण्यात आली असून याला मिळणाऱ्या प्रतिसादावरून ही सेवा कायम ठेवावी का नको हा निर्णय घेतला जाईल.
- सिद्धार्थ सिंग, जनसंपर्क अधिकारी, आयआरसीटीसी , नवी दिल्ली.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.