आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
सोलापूर- महापालिका परिवहन कर्मचाऱ्यांचा ९ एप्रिलपासून संप सुरू असून, त्यावर तोडगा काढावा, कर्मचाऱ्यांचे ९ महिन्यांचे वेतन अदा करावे आदी मागण्या घेऊन माजी आमदार नरसय्या आडम यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले. परिवहन सभापती तुकाराम मस्के, शिवसेना शहरप्रमुख प्रताप चव्हाण यांनी निवेदन देऊन तोडगा काढण्याची मागणी केली. कामगार सेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. परिवहन प्रश्नी शासनपातळीवर बैठक घेऊन त्यात निर्णय घेऊ, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी आडम मास्तर यांना सांगितले.
परिवहनसंबंधी शुक्रवारी सकाळी शिवसेनेचे शहरप्रमुख प्रताप चव्हाण, नगरसेवक देवेंद्र कोठे, गुरुशांत धुत्तरगावकर, सभापती तुकाराम मस्के यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विमानतळावर भेटून निवेदन दिले. त्वरित तोडगा काढावा, अशी मागणी केली. दुपारी कामगार सेनेचे विष्णु कारमपुरी यांनी याबाबत निवेदन दिले. माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी मुख्यमंत्र्यांना भेटीची वेळ मागितली. दुपारी वेळ दिली. त्यानुसार आडम मास्तर सिद्धप्पा कलशेट्टी, व्यंकटेश कोंगारी यांच्यासोबत विमानतळावर आले. त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना निवेदन दिले. परिवहन कर्मचाऱ्यांचे ९ महिन्याचे वेतन अदा करावे, महापालिका आयुक्त परिवहनला मदत करण्यास नकार देत आहेत. निवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शन नसल्याने त्यांच्या औषधाचा प्रश्न निर्माण झाला आहे. १४० बसचे चेसी क्रॅक झाले. त्यामुळे याप्रकरणी अशोक लेलँडचे हिंदूजा यांच्यासाेबत बैठक लावा. यात सर्व अधिकाऱ्यांना बोलावून परिवहनचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढा, अशी विनंती केली. याप्रकरणी शासन पातळीवर स्वतंत्र बैठक लावू. त्यात योग्य ते निर्णय घेऊ. बैठक लावण्याची जबाबदारी पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्याकडे सोपवली. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, पालिका आयुक्त डाॅ. अविनाश ढाकणे आदी उपस्थित होते.
परिवहनची चाके खासगीकरणाकडे
परिवहनचा कायमस्वरूपी तोडगा काढू, असे मुख्यमंत्री म्हणाले असले तरी, याबाबत अंतिम निर्णय शासनपातळीवर होणार आहे. महापालिका आयुक्तांना बोलावून परिस्थितीची माहिती थोडक्यात करून घेतली. पैसे देण्याची महापालिकेची परिस्थिती नसल्याचे सांगण्यात आले. त्यामुळे परिवहन चालवू पण खासगीकरण करू, असे संकेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्याचे सांगण्यात आले.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.