आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांची पालिका बरखास्तीची तंबी, दोन्ही देशमुखांच्या गटांचे शेपूट वाकडेच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - महापालिकेच्या सभेत सभागृहनेत्यावरून पुन्हा गटबाजीचे दर्शन घडले. नोव्हेंबर महिन्याची तहकूब सभा सुरू होताच पालकमंत्री गटाचे नगरसेवक श्रीनिवास रिकमल्ले यांच्या पाठोपाठ सहकारमंत्री गटाचे नागेश वल्याळ उठून सूचना वाचू लागले. महापौर शोभा बनशेट्टी यांनी वल्याळ सूचना वाचतील, असे म्हणताच पालकमंत्री गटाच्या ३३ नगरसेवकांनी सभागृहातून काढता पाय घेतला. महापौर बनशेट्टी यांनी विरोधी पक्षांना सोबत घेऊन सभा चालवली. अवघ्या दहा मिनिटात सभा गुंडाळली गेली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गटबाजी थांबवा अन्यथा महापालिकाच बरखास्त करू, अशी तंबी देऊनही मंत्री देशमुखांच्या गटांचे शेपूट वाकडे ते वाकडेच दिसते अाहे.

 

महानगरपालिकेत भाजपची सत्ता येऊन वर्ष होत आले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालकमंत्री विजयकुमार देशमुख व सहकारमंत्री सुभाष देशमुख यांना गटबाजी रोखण्याची तंबी महिन्यापूर्वीच दिली होती. सोमवारी नोव्हेंबर महिन्याची तहकूब सभा महापौर शोभा बनशेट्टी यांच्या अध्यक्षतेखाली सुरू झाली. मंत्र्यांच्या अंतर्गत वादामुळे सभेपूर्वी सूचना कोण वाचणार हे ठरले नाही. सभागृहात रिकमल्ले आणि वल्याळ हे एकाचवेळी सूचना वाचू लागले. त्यावेळी बसपचेे आनंद चंदनशिवे यांनी हरकत घेतली. वल्याळ यांना सूचना वाचण्याचा आदेश महापौरांनी दिला. त्यामुळे नाराज झालेल्या पालकमंत्री गटाच्या नगरसेवकांनी सभात्याग करून स्थायी समिती सभापती संजय कोळी यांच्या कक्षात येऊन ठाण मांडले. मनपा अायुक्त डाॅ. अविनाश ढाकणे हे नगरसेवकांच्या गटबाजीचा पोरखेळ पाहत बसून होते.


सांगावा, खासदारांचा कांगावा
खासदार अॅड. शरद बनसोडेंच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांनी सांगावा दिला होता. तसेच दुसऱ्यावेळी मुंबईत झालेल्या नगरसेवकांच्या बैठकीत गट तट विसरा, पक्षात कोणी मालक नाहीत, अशी तंबी मुख्यमंत्र्यांनी दिली होती.

 

पक्षाचे आदेश पाळत नाहीत
पालकमंत्र्यांच्या नेतृत्त्वाखाली पालिकेचे कामकाज करा, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. रिकमल्ले यांनी सूचना वाचावी, असे पक्षाकडून पालकमंत्र्यांमार्फत निरोप होता. पण तो पाळला नाही, म्हणून सभात्याग केल्याचे सभापती संजय कोळी म्हणाले.

 

नगरोत्थान रस्ते, सिटीबस तिकीट दरवाढीस मान्यता
नगरोत्थान रस्ते अंतर्गत अवंतीनगरच्या भुयारी मार्गासाठी ५.६१ कोटी रुपयांची शासनाकडे मागणी करणे. शहरात तीन ठिकाणी पे अॅन्ड पार्क तत्वावर पार्किंग जागा देणे, सिटीबस तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय महापालिका सभागृहात घेण्यात आला. यावेळी नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी टायर खरेदीत गैरव्यवहार झाल्याचा आरोप केला. परिवहन व्यवस्थापक अभिजित हरळे यांनी मागील महिन्यात खरेदी झाल्याचे सांगितले. टायर खरेदीचा अहवाल सभागृहात पाठवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डाॅ. ढाकणे यांनी हराळे यांना दिले. याशिवाय इतर विषय सभागृहाच्या पटलावर होते, पण चर्चा न करता मान्यता दिली. जामगुंडे हे सभागृहात गुटखा खाऊन आल्याचा आरोप चंदनशिवे यांनी केला. तपासणी करा, असे म्हणत मी चंदनशिवे यांच्यावर हक्कभंग आणू शकतो, असे म्हणत जामगुंडे यांनी प्रतिकार केला.

 

तीनवेळा वाद विकोपाला
१- आॅक्टोबरमध्ये गाळे प्रश्नावरून सहकारमंत्री गटाच्या १६ नगरसेवकांचा सभात्याग
२- जानेवारीत पालकमंत्री गटाच्या ३५ नगरसेवकांचा बहिष्कार
३- फेब्रुवारीत सभागृह नेता पदावरून पालकमंत्री गटाच्या ३३ नगरसेवकांचा सभात्याग

 

बातम्या आणखी आहेत...