आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रासंगिक : पणनमंत्री अन् कोल्ह्यांचं भांडण

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर जिल्ह्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नुकत्याच झालेल्या दोन निवडणुका त्यातील राजकीय उलथापालथीमुळे खूप गाजल्या. बुजुर्ग नेते कै. ब्रह्मदेवदादा माने नेहमी म्हणायचे, 'माळ्याची मका अन् कोल्ह्यांचं भांडण' म्हणजे बाजार समितीची निवडणूक. तसं कोल्ह्यांचं भांडण सोलापूर जिल्ह्यात दोन बाजार समित्यांसाठी लागलं होतं. दोन्ही भांडणं लई रंगली. त्यातल्या सोलापूर बाजार समितीच्या भांडणात दस्तुरखुद्द पणन व सहकारमंत्री सुभाष देशमुख उतरल्याने ते खूप वाजले आणि गाजलेही. योगायोगाचा भाग असा की, या भांडणात ब्रह्मदेवदादांचे चिरंजीव आणि माजी आमदार दिलीप माने यांनी पणनमंत्र्यांना धक्का दिला.

 

सुभाष देशमुखांच्या पुढाकारातून उभा राहिलेल्या पॅनेलचा पराभव झाला. आणखी एका कारणामुळे ही निवडणूक गाजली. सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख पणनमंत्र्यांच्या विरोधात उतरले होते. ते सर्वाधिक मतांनी विजयी झाले. दुसरं भांडण लागलं होतं ते बार्शी बाजार समितीसाठी. तेथे माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या पॅनेलने माजी मंत्री व आमदार दिलीप सोपल पॅनेलचा पराभव केला. बाजार समित्यांच्या निवडणुकांचा एवढा प्रचंड गाजावाजा पूर्वी व्हायचा नाही जेवढा यंदा झाला. त्याचे मुख्य कारण म्हणजे तेथे सहज जमा होणारा पैसा. जेवढी समिती व तिथला व्यवहार मोठा तेवढी तिथे होणारी काळ्या‑पांढऱ्या पैशाची आवक मोठी. सत्ताकेंद्र म्हणून साखर कारखान्याच्या उभारणीसाठी शेतातून ऊस आणून गाळावा लागतो. साखर तयार करावी लागते, ती विकावी लागते. या सागळ्यासाठी बराच खटाटोप करावा लागतो. बाजार समितीसाठी तसे फार करावे लागत नाही. शेतकरी 'मका' आणतो. व्यापारी तो खरेदी करतो आणि विकतो. त्या व्यवहारातील टक्केवारी समितीकडे अापोआप जमा होते. कोल्ह्यांना फार काही करावे लागत नाही. जेवढे साखर कारखान्यांना करावे लागते. त्यामुळेच सोलापूरसारख्या मोठ्या समित्यांमध्ये कोल्ह्यांचं भांडण पुढच्या काळात अधिक वाढणार. 


सोलापूर बाजार समिती स्थापना काळात सगळ्या खर्चानंतर तीन लाख रुपये (वाढावा) समितीकडे राहायचे. ५५ वर्षांनंतर आता समितीकडे वर्षाकाठी सात‑आठ कोटी रुपये शिल्लक राहू लागले. याला जोडून येणारी 'माया' वेगळीच. त्यातून निर्माण होणाऱ्या राजकीय धनदांडगाईच्या शक्तीमुळेच पणनमंत्री व दिलीप माने एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. त्यात पुन्हा शेती क्षेत्राशी निगडीत ग्रामीण आर्थिक सत्ताकेंद्रांवरचे नियंत्रण भाजपकडे अजूनही नाही. त्यामुळेच पक्षाबरोबरच स्वत:च्या राजकीय स्वार्थासाठीही समितीवर ताबा मिळवावा, या उद्देशाने पणनमंत्री देशमुख यात उतरले. असं उदाहरण महाराष्ट्राच्या राजकारणात विरळच.

 

सोलापूर बाजार समिती निवडणुकीच्या बाबतीत सुभाष देशमुख हे राज्याचे पणनमंत्रीपेक्षा स्थानिक मंत्री म्हणूनच जास्त डावपेच करत राहिले. विरोधकांना निवडणूकच लढवता येऊ नये, यासाठी क्लृप्त्या करत राहिले. समितीचे माजी सभापती दिलीप माने व त्यांच्या साथिदारांवर लेखा परीक्षणात घेतलेल्या आक्षेपांचा मुद्दा उच्च न्यायालयात प्रलंबित असताना अधिकाऱ्यांनी निवडणुकीच्या काही दिवस अगोदर गुन्हे दाखल केले. मातब्बरांचे उमेदवारी अर्ज नामंजूर झाले. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने याच्या विरोधात शेरा मारला आहे. विरोधकांना निवडणूक लढवता येऊ नये म्हणून हेतूपुरस्सर जुने प्रकरण खोदून काढून अर्जदारांना अपात्रतेची नोटीस दिली, असा स्पष्ट उल्लेख उच्च न्यायालयाने सरकारी कारवाईस स्थगिती देताना केला. पणन खात्याने, निवडणूक अधिकाऱ्यांनी अती केले. त्यांना करावे लागले. विरोधकांना पोलिस चौकी व न्यायालयात हेलपाटे मारत बसावे लागले. खालच्या कोर्टात जामीन ना मंजूर झाल्यानंतर परागंदा व्हावे लागले. नामोहरम झालेल्या विरोधकांना उच्च न्यायालयाचा सहारा मिळाला. यामुळे एरवी देशमुखांचे विरोधक विखुरलेले असायचे. लादलेल्या हैराणीमुळे निवडणुकीत ते एकत्र झाले. त्याचाच फटका पणनमंत्र्यांना बसला. असल्या कारवाईतच डोके जास्त अडकल्यामुळे शेतकऱ्यांसाठी केलेल्या बऱ्याच चांगल्या गोष्टी पणनमंत्री प्रचारात जास्त मांडू शकले नाहीत. 


एक गोष्ट स्पष्ट आहे. न्यायालयाचे आदेश आणि निवडणुकीचा निकाल ही लेखा परीक्षणात घेतलेल्या ३९ कोटींच्या गैरव्यवहारासंदर्भातील 'क्लीन चिट' नाही. तो मुद्दा पुढे चालूच राहणार. बाजार समितीच्या निवडणुकीत सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळाला. त्यामुळे मतदार संख्या, निवडणुकीचा प्रशासकीय खर्च भरमसाठ वाढला. बंधन नसल्यामुळे उमेदवारांनीही रग्गड पैसा ओतला. आता जिल्हा मध्यवर्ती बँकांच्या निवडणुकीतही सर्व शेतकऱ्यांना मतदानाचा हक्क देण्याबाबत सहकारमंत्री बोलतात. ते झाले तर जिल्हा बँकांची निवडणूकही गुंतागुंतीची व खर्चिक होईल.
‑ संजीव पिंपरकर, निवासी संपादक, सोलापूर 

बातम्या आणखी आहेत...