आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर चोरीसाठी अडते, व्यापारी बिलात फेरफार करताना कारवाई का नव्हती? देशमुखांची विरोधकांवर टीका

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रचाराचा सिद्धरामेश्वर पॅनेलने शुक्रवारी हत्तूर येथे धडाक्यात शुभारंभ केला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी अाक्रमक भाषण करीत गेली ५० वर्षे बाजार समिती ताब्यात असताना विकास का केला नाही?, व्यापारी, अडते कर चोरी करण्यासाठी चार प्रकारची बिले करताहेत, यावर बाजार समितीने काय कारवाई केली? असा सवाल उपस्थित केला. दरम्यान पॅनलचे एक नेते डाॅ. चनगोंडा हाविनाळे यांनी पत्रकारांवर विकले गेल्याचा अारोप केल्यानंतर शहाजी पवार, अशोक निंबर्गी, शिवशरण पाटील या नेत्यांवर पत्रकारांची माफी मागण्याची वेळ अाली. तर दुसरीकडे विरोधी पॅनलमधील प्रमुख दिलीप माने, बाळासाहेब शेळके, इंदुमती अलगोंडा यांच्यासह काहींचे जामीन अर्ज फेटाळले गेल्याचा मोठा धक्का सिद्धेश्वर पॅनलला बसला. 


शुक्रवारी हत्तूर (ता. दक्षिण सोलापूर) येथील सोमेश्वर मंदिरात सहकारमंत्री प्रणीत सिद्धरामेश्वर बाजार समिती परिकेंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांच्या श्रीफळ वाढवून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी सहकारमंत्री सुभाष देशमुख बोलत होते. व्यासपीठावर महापौर शोभा बनशेट्टी, भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शहराध्यक्ष अशोक निंबर्गी, सभापती ताराबाई पाटील, सचिन कल्याणशेट्टी यांच्यासह १५ गणातील उमेदवार, तालुकाध्यक्ष आदी उपस्थित होते. 


पत्ते ओपन कराच, देशमुखांचे मानेंना आव्हान... 
सहकारमंत्री देशमुख यांनी विरोधकांचा समाचार घेताना चांगलेच आक्रमक दिसले. भाषणात तब्बल औलाद या शब्दाचा १७ वेळा पुनरूच्चार करीत त्यांनी दिलीप माने यांना अाव्हान देत माझे पत्ते ओपन कराच, स्वत: सुडाचे राजकारण करणाऱ्यांनी मला शिकवू नये, असे सांगत दुधनी येथील कार्यक्रमात आमदार सिद्धाराम म्हेत्रे यांच्या साक्षीने शिवदारे आणि हसापुरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्याकडे तक्रार केली, त्यावरून चौकशी झाली आहे. त्यावरून कारवाई सुरू आहे. गेल्या चार वर्षात शेतकऱ्यांच्या भल्यासाठी जे काही करता येईल ते सर्व निर्णय घेतले आहेत. शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार मिळू नये, यासाठीच हे सर्वजण जुन्या पद्धतीने मतदान घ्यावे, या मागणीसाठी न्यायालयात गेले. बाजार समितीमध्ये अनेक योजना कागदोपत्री राबवून शेतकऱ्यांना नागवल्याचे उदाहरणाद्वारे सांगितले. आम्ही चार वर्षात शेतकऱ्यांना मताचा अधिकार दिला, राज्यात १३५ आठवडी बाजार सुरू केले, शेतमालास चांगला भाव मिळण्यासाठी ४० लाखापेक्षा अधिक उलाढाल असलेल्या १९० बाजार समित्या ई नाम पोर्टलशी जोडल्या. इतके करून विरोधक म्हणतात, आम्ही सुडाचे राजकारण करतोय. 


हाविनाळेंचा पत्रकारांवरच अारोप, नेत्यांकडून माफी 
हत्तूर येथील प्रचार शुभारंभात डॉ. चनगोंडा हाविनाळे प्रसारमाध्यमावर चांगलेच घसरले. भाषण करताना पत्रकारांकडे बोट करीत सोलापुरातील सर्व प्रसारमाध्यमे विकली असल्याचा आरोप करीत सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या घराबाबत सातत्याने बातम्या दिल्या तर दुसरीकडे सोलापूर बाजार समितीमधील ३९ कोटी रुपयांच्या अपहाराबाबत मात्र मौन ठेवले, असा अारोप केला. यावर तेथे उपस्थित असलेल्या पत्रकारांनी हाविनाळेंचा निषेध करीत िनघून जाऊ लागले तेव्हा व्यासपीठावरील नेतेमंडळींनी पत्रकारांची माफी मागितली. भाजप जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, अशोक निंबर्गी, शिवशरण पाटील यांनी स्वत: पत्रकारांची जाहीर माफी मागत चनगोंडा हविनाळे यांनाही माफी मागण्यास भाग पाडले. पाशा पटेल यांनी तर हाविनाळेंना निवडणूक लढवायची नाही, त्यांनी यापुढे जाहीर बोलत जाऊ नये, असा सल्ला दिला. 


सिध्देश्वर पॅनलला मोठा धक्का 
सिध्देश्वर पॅनलचे प्रमुख नेते िदलीप माने, बाळासाहेब शेळके, इंदुमती अलगोंडा अादींचे अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने अाज फेटाळल्याने पॅनलला मोठा धक्का मिळाला अाहे. पॅनलचा प्रचार शुभारंभ अजून झालेला नाही. त्यातच पॅनलसोबत असलेले पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांनी स्वतंत्र प्रचार सुरू केल्याने वेगळीच चर्चा रंगली अाहे. जामीन मंजूर झाला नाही तर प्रचारात कार्यकर्त्यांनाच उतरावे लागेल असे चित्र अाहे. 


यावेळी बोलताना महापौर शोभा बनशेट्टी यांनी मी एक शेतकऱ्यांची मुलगी असून शेतकऱ्यांचे दु:ख काय आहे? हे जाणून घेत आल्याचे सांगितले. त्यांनी कन्नडमधून भाषण करून उपस्थितांची टाळ्या वाजवून दाद मिळविली. तर पालकमंत्री आज कर्णाच्या भूमिकेत आहेत. पण त्यांनी कौरवाची बाजू घेतली आहे. पालकमंत्री जिल्ह्याचे, आमचे सर्वांचे नेते आहेत. त्यांनी एक हुकूम केला असता तर आम्ही त्यांचा निर्णय सर्वजण मान्य केलो असतो असे शहाजी पवार म्हणाले. बापाने सत्ता भोगली, पोरांनी सत्ता भोगली, बाजार समितीमध्ये ओरबाडून खाल्ले. यामुळे आता परिवर्तन निश्चित असल्याचे शिवशरण पाटील म्हणाले. यानंतर हणमंत कुलकर्णी, बाळासाहेब आवताडे, शिवानंद दरेकर, डॉ. चनगोंडा हविनाळे यांनीही मनोगत व्यक्त केले. यतीन शहा यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी दक्षिण सोलापूर व उत्तर सोलापूर तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...