आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जगदंबा सूत गिरणी प्रकरण : आमदार बबनराव शिंदे, पुत्रासह माजी खासदार थोरातांवर गुन्हा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माढा- येथील जगदंबा अनुसूचित जाती जमाती सहकारी सूत गिरणी जमिनीच्या व्यवहारावरून पंढरपूर लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार संदीपान थोरात, माढ्याचे आमदार बबनराव शिंदे व त्यांचे पुत्र विद्यमान जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे या तिघांवर माढा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. सामाजिक कार्यकर्ते नागनाथ कदम (माढा कृषी बाजार समितीचे शासन नियुक्त संचालक) यांच्या फिर्यादीनंतर माढा न्यायालयाने आदेश दिले. शुक्रवारी रात्री गुन्हा दाखल झाला. 


माढ्यातील जगदंबा अनुसूचित जाती-जमाती सहकारी सूत गिरणीची जमीन बेकायदेशीररीत्या माजी खासदार संदीपान थोरात यांनी आमदार बबनराव शिंदे आणि जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह शिंदे यांना परवानगीविना विकली. याबाबत २२ डिसेंबर २०१७ रोजी माढा पोलिसांकडे कदम यांनी तक्रार केली होती. त्यांनी याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिकाही दाखल केली होती.

 
त्यावर २० जून रोजी माढा न्यायालयात सुनावणी झाली. माजी खासदार संदीपान थोरात, आमदार बबनराव शिंदे, जि. प. सदस्य रणजितसिंह शिंदे यांच्यावर फौजदारी गुन्हा नोंदवून याबाबतचा चौकशी अहवाल दोन-तीन महिन्यांत न्यायालयाकडे सादर करण्याचे आदेश माढ्याचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी मनीषा थोरात यांनी पोलिसांना दिले. माढा न्यायालयात अॅड. सागर कन्हेरे यांच्यामार्फत तक्रार दाखल झाली होती. 


सूत गिरणीची स्थापना मागासवर्गीय लोकांच्या विकासासाठी झाली. त्यासाठी माढ्यातील शेतकऱ्यांनी नाममात्र १६०० ते १७०० रुपये एकर प्रमाणे ८७ एकर जमीन सूत गिरणीकरिता संस्थापक माजी खासदार संदीपान थोरात यांना दिली होती. सूत गिरणी सुरळीत चालावी म्हणून आयडीबीआय, आयएफसीआय व आयसीआयसीआय व इतर वित्तीय संस्थांकडून मालमत्ता तारण कर्ज घेण्यात आले होते. सूत गिरणी सुरळीत चालू असताना संस्थापकांनी कर्मचाऱ्यांच्या भविष्य निर्वाह निधीची रक्कम कार्यालयाकडे जमा न केल्याने सहायक आयुक्त यांनी गिरणीला सिल ठोकले. त्यामुळे कामगारांनी राजीनामा दिल्याने सूत गिरणी बंद पडली गेली. त्यानंतर संस्थापक संदीपान थोरात यांनी कुठल्याही वित्तीय संस्थांची संमती न घेता सदरील जमीन व बांधलेली इमारत आमदार बबनराव शिंदे व रणजितसिंह शिंदे यांना बेकायदेशीररीत्या विकली. आमदार शिंदे यांनी उपळाई खुर्द येथील शेतकऱ्यांच्या नावावर खादी ग्रामोद्योग मंडळाकडून ५० टक्के सबसीडीने पाच कोटी रुपये रक्कम उचलून त्याची सबसीडी राष्ट्रीयीकृत बँकेत जमा न करता माढेश्वरी बँकेत जमा केली. याबाबत त्यांनी नियमांचे उल्लंघन केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. त्यांनी कारखाना उभारणीसाठी माढा तालुका व परिसरातील लोकांकडून २०० कोटी रुपये रक्कम जमा केले. मात्र शेअर्सधारकांना शेअर्स सर्टिफिकेट व व्याज दिले नाही. तपास माढा पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक दत्तात्रय निकम करत आहेत. 


न्यायालयाची मला कसलीही नोटीस आलेली नाही. तसेच या प्रकरणी प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही. मी माझा मुद्दा कागदपत्रे घेऊनच पत्रकार परिषदेत मांडणार आहे. 
-आमदार बबनराव शिंदे,आमदार, माढा 

बातम्या आणखी आहेत...