आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विस्थापित शिक्षकांची आंदोलनाची तयारी; काहींनी खोटी माहिती देऊन सवलतीचा लाभ घेतल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदली प्रक्रियेत संवर्ग एक व दोनच्या बदली प्रक्रियेत काही शिक्षकांनी बनावट कागदपत्रे, खोट्या माहितीच्या आधारे बदलीचा लाभ घेणाऱ्यांची सखोल चौकशी करून वंचित, गरजूंना न्याय न मिळाल्यास बदली प्रक्रियेच्या विरोधात न्यायालयात लढा देण्याचा निर्णय विस्थापित शिक्षक संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 


  /> जिल्हा परिषदेच्या परिसरात दक्षिण व उत्तर सोलापूर तालुक्यातील विस्थापित शिक्षकांची बैठक झाली. त्यामध्ये संवर्ग एक व दोन मध्ये चुकीच्या पद्धतीने झालेल्या बदली प्रक्रियेच्या विरोधात संताप व्यक्त केला. संवर्ग दोनमध्ये पती-पत्नी एकत्रिकरणाचे अंतर प्रत्यक्षात ३० किलोमीटर नसताना खोटे दाखले जोडून त्याचा लाभ उठविला. या सर्व बाबींची खातरजमा गटशिक्षणाधिकाऱ्यांनी करणे अपेक्षित होते. पण, त्याकडे दुर्लक्ष झाले. त्यामुळे गैरप्रकारास वाव मिळाल्याची भावना शिक्षकांनी बैठकीत व्यक्त केली. त्या संदर्भातील निवेदन तयार करून मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्याकडे देण्यात आले. प्रशासनाने त्याची दखल न घेतल्यास बदल्यांची यादी माहितीच्या अधिकारात मागवून न्यायालयात लढा देण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी अनिल कुलकर्णी, माधुरी भोसले, श्रीशैल कोरे, जयश्री मेलगे-पाटील, आशिष मसरे आदी उपस्थित होते. 


समिती ३१ मे रोजी आंदोलन करणार 
ऑनलाइन भरती प्रक्रिया सुरवातीला खूप चांगली वाटली. पण, प्रत्यक्षात त्यामध्ये भरलेली माहिती चुकीची असल्याचे अनेक प्रकारातून समोर आली. बोगस माहिती सादर करणाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, या मागणीसाठी गुरुवारी सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याचे विस्थापित शिक्षक संघर्ष समितीने पत्रकाद्वारे कळविले. 


बोगस माहितीबाबत चौकशी करू : डॉ. भारूड 
संवर्ग एक व दोनच्या बदलीसाठी काहींनी चुकीची माहिती भरल्याच्या तक्रारी आहेत. त्याबाबतच्या बार्शी तालुक्यातील चौकशीसाठी स्वतंत्र समिती नियुक्त करण्यात येईल. विस्थापित शिक्षकांनी त्रस्त न होता बदली फॉर्म भरण्यासाठी स्वतंत्र लॉगीन उपलब्ध केले आहे. त्यावर जिल्ह्यातील रिक्त पदांची माहिती उपलब्ध असून सोईस्कर शाळा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करू, असे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड यांच्या कार्यालयाने प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले. 

बातम्या आणखी आहेत...