आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेलुगु फुलांच्या मराठी सुगंधाची 'मैफल' मुकी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- कवी, साहित्यिक, नाट्य लेखक, अनुवादक आणि तेलुगु-मराठी साहित्याचा सेतू म्हणून उभ्या महाराष्ट्राला परिचित असणारे डॉ. लक्ष्मीनारायण इरय्या बोल्ली (वय ७४) यांचे शुक्रवारी सायंकाळी राहत्या घरी निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा शनिवारी सकाळी ११ वाजता अक्कलकोट रस्ता एमआयडीसीतील घरापासून निघेल. शांती चौकातील पद्मशाली स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येतील. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, तीन मुली, नातवंडे असा परिवार अाहे. 


डॉ. बोल्ली यांना गेल्या दोन महिन्यांपासून हृदयाचा त्रास होता. सातत्याने उपचार सुरूच होते. गेल्याच आठवड्यात बरे वाटल्यानंतर बाहेर पडले. शुक्रवारी सायंकाळी लिखाणाचे काम हाती घेतले. कोऱ्या पानावर रेष मारताना पट्टी खाली पडली. ते घेण्यासाठी वाकले अन् टेबलवर तसेच पडले. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. मार्कंडेय सहकारी रुग्णालयात डॉक्टरांनी त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांचे ज्येष्ठ चिरंजीव शरद बोल्ली यांच्या घरी त्यांचा पार्थिव देह दर्शनासाठी ठेवण्यात आला. 


बोल्ली कुटुंब मूळचे तेलंगणच्या गुंडारम (वरंगल)चे. विणकाम व्यवसायासाठी सोलापुरात स्थायिक झाले. १५ एप्रिल १९४४ रोजी डॉ. बोल्ली यांचा सोलापुरात जन्म झाला. त्यांचे वडील सहकार आणि राजकारणात होते. परंतु डॉ. बोल्ली यांना तेलुगु-मराठी साहित्याचा लळा लागला. 'तेलुगु गळा पण, मराठीचा लळा' असे ते सातत्याने सांगत. याच अनुबंधातून अनेक कथा, कविता, आत्मचरित्रांचा अनुवाद केला. 


त्यांच्या साहित्याची दखल घेऊन हैदराबादच्या पोट्टी श्रीरामुलू विश्व विद्यालयाने मानद डी. लिट् ही पदवी बहाल केली. तत्कालीन राज्यपाल आणि सोलापूरचे सुपुत्र सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते ही मानद पदवी त्यांना प्रदान करण्यात आली. छत्रपती राजर्षी शाहू महाराजांचे चरित्र त्यांनी तेलुगुतून लिहिले. 'क्षण एक पुरे प्रेमाचा : राम गणेश गडकरी' हे ललित चरित्र पूर्णत्वास आले. त्याचे प्रकाशन करण्याचे ठरले होते. तत्पूर्वीच डॉ. बोल्ली यांनी जगाचा निरोप घेतला. 

 

लिहित-लिहित जाईन मी... 
लेखन हाच माझा श्वास, लेखन हाच माझा ध्यास, लिहित-लिहितच मरण यावे त्याहून अधिक आनंद कशात असावा, हे वाक्य डॉ. बोल्ली नेहमी उच्चारत. शुक्रवारी सायंकाळी असेच घडले. लिहिता-लिहिताच त्यांनी जगाचा निरोप घेतला आणि तेलुगु-मराठी रसिकांच्या काळजाचा जणू ठोकाच चुकला. तेलुगुु, मराठी भाषेचा हा सेतू कोसळला. 

बातम्या आणखी आहेत...