आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाबासाहेबांचा संदेश विसरल्यानेच मार्क्सवादी आपल्या घरात घुसले..! - अॅड. चिमणकर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - माणसं मरून जातात, विचार मरत नाहीत, या सिद्धांताची फेरमांडणी करताना डॉ. आंबेडकर म्हणाले होते, लायक अनुयायी नाही मिळाले तर विचार मरून जातात. आजन्म विद्यार्थी आणि आजन्म अभ्यास करेन, असा बाबासाहेबांनी दिलेला संदेश विसरल्यानेच मार्क्सवादी आपल्या घरात घुसले आहेत.

 

कॉँग्रेसने आपल्या नेत्यांना कुरवाळल्याने चळवळीचे तर साध्यच हरवले. तेव्हा भीमसैनिकांनो आंबेडकरी विचार जिवंत ठेवा, असे आवाहन करत, गांधी - मार्क्सवाद्यांची निर्भर्त्सना करणारी ही ऐतिहासिक परिषद असल्याचे समता सैनिक दलाचे राष्ट्रीय संघटक अॅड. विमलसूर्य चिमणकर (नागपूर) यांनी सांगितले.

 

हुतात्मा स्मृती मंदिरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर विचार संमेलन आयोजित केले होते. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून ते बोलत होते. या संमेलनाचे उद््घाटन सफाई कर्मचारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष चरणसिंग टाक (मुंबई) यांनी केले. महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण केला. यावेळी मंचावर दादाराव लहानेे, प्रा. एम. आर. कांबळे, दत्ता गायकवाड, बाळासाहेब वाघमारे, सुबोध वाघमोडे, डॉ. औदुंबर मस्के आदी उपस्थित होते. राजाभाऊ सरवदे, राजाभाऊ इंगळे यांची भाषणे झाली. गोरख शिवशरण यांना आदरांजली अर्पण केली.

 

श्री. चिमणकर पुढे म्हणाले, कार्ल मार्क्सचा सोशाॅलिझम फेल ठरला आहे. बाबासाहेबांनी स्टेट सोशॉलिझमची संकल्पना मांडली होती. कॉँग्रेसच्या नेत्यांनी आंबेडकरांचे नेतृत्व मान्य नसल्याने हिंदू कोड बिलाच्या निमित्ताने त्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले. उद्योगपतींचे हस्तक असलेल्या गोविंदपंत यांच्या दबावामुळे गांधीही बाबासाहेबांच्या राजीनाम्याची वाट पाहात होते. राज्यसभा या सभागृहाचा जगात पहिला प्रयोग बाबासाहेबांनी मांडला.

 

दीक्षा भूमीवर धम्मक्रांतीच्या दुसऱ्याच वर्षी राजकीय नेत्यांना बोलावून आंबेडकरांच्या विचारांची वाताहत करण्याचे काम आंबेडकरी अनुयायांनीच केले. कधी सुशीलकुमार शिंदे, शरद पवार तर अलीकडे देवेंद्र फडणवीस, नितीन गडकरी अशा नेत्यांना बोलावले गेले. केवळ भाषणे झाली, टाळ्या वाजवल्या गेल्या, पण चळवळ पुढे रेटण्यासाठी कृती झालीच नाही. यापुढे दीक्षाभूमीवर इतर पक्षीय नेत्यांना, हिंदूंना बोलावल्यास विरोध करू, असा इशारा त्यांनी दिला.

 

गटा-तटात विभागलेले नेते आणि ३३ कोटी देव तुमचा उद्धार करू शकत नाहीत. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करा, तेच तुमचा उद्धार करू शकतात. आपल्यातील बरेच नेतेमंडळी गटा-तटात विभागले गेले आहेत. त्यांचा फायदा समाजाला होत नाही, असे श्री. टाक म्हणाले.

 

आम्ही ढोबळमानाने बुद्धिस्ट
बुद्धांना वाताहत झालेल्या लोकांना गावात आणता आले नाही. त्यामुळे गावातील क्षत्रिय, वैश्य व इतरांना वगळून गावाबाहेरच्या लोकांवर पेशवे काळात अस्पृश्यता लादली गेली. अडीच हजार वर्षानंतर बाबासाहेबांनी वाताहत झालेल्या गावाबाहेरील दलितांना वस्तीत आणले. आपण जरी धम्माचा मार्ग स्वीकारला असला तरी ढोबळमानाने बुद्धिस्ट आहोत, असे चिमणकर म्हणाले.

 

चिमणकर म्हणाले
१) धर्मांतर लढाईत १९८४ व १९९२ मध्ये जोगेंद्र कवाडेंवर जोरदार लाठी हल्ला केला. तरीही ते शरद पवारांसोबत कसे गेले हा प्रश्नच आहे.
२) शरद पवारांच्या 'लोक माझे सांगाती' पुस्तकात नामांतरावर आठ पाने खर्ची, पण दलित आंदोलनाचा व नेत्यांचा उल्लेखच नाही.
३) पुण्यात एल्गार परिषद घेणारे प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, पी. बी. सावंत, जोगेंद्र कवाडे एक जानेवारीला कोठे होते?
४) सोनिया गांधी, मोदी, सुशीलकुमार शिंदे आले तर त्यांच्या सभांना आपणच जाऊन टाळ्या वाजवतो, हे बंद कधी करणार?
५) सिद्धार्थ गौतम बुद्ध लिहिणारे आ. ह. साळुंखे यांनी बुद्ध, तुकाराम व प्रभू श्रीराम एकाच वेळी वंदनीय कसे ठरवले?
६) काॅम्रेड प्रकाश करातांपासून बर्धन, तेलतुंबडे या कम्युनिस्ट नेत्यांना आमच्या प्रश्नांची उत्तरे देता आली नाही.

बातम्या आणखी आहेत...