आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षण घेऊन पकोडे तळणे हे माझ्या बापाचे स्वप्न नाही, विद्यार्थी नेत्यांचा एल्गार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सोलापूर - "शिक्षण व रोजगार या आमच्या मूलभूत गरजा आहेत. उच्च शिक्षण घेऊनही पकोडे तळणे हे माझ्या बापाचे स्वप्न नाही. सरकार चालवता येत नसेल तर खुर्च्या सोडा अन् निवांत भजी तळा..." हे खडे बोल आहेत, विद्यार्थी नेत्यांचे. 'शिक्षणाची संधी आणि नोकरीचे काय? जाहिरातबाज सरकारला जाब विचारा!' हे ब्रीद घेऊन राज्यातून आलेल्या जत्थ्यांचे रविवारी सोलापुरात आगमन झाले. त्यानंतर चार हुतात्मा पुतळ्यासमोर सभा झाली.

 

डेमोक्रॅटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडिया आणि स्टुडंट्स फेडरेशन ऑफ इंडियाच्या वतीने हा जत्था निघाला होता. नंदूरबार ते सोलापूर आणि आैरंगाबाद ते नांदेडपासून निघालेला जत्था ३० जिल्ह्यांमधून फिरला. रविवारी सायंकाळी सोलापुरात त्यांची सांगता झाली. दोन्ही संघटनांचे राष्ट्रीय अध्यक्ष, सचिव आणि कार्यकर्ते त्यात सहभागी होते. ज्येष्ठ कामगार नेते नरसय्या आडम, नगरसेविका कामिनी आडम यांनी त्यांचे स्वागत केले. डीवायएफआयचे राष्ट्रीय अध्यक्ष मोहंमद रियाज, सुनील धानवा, बालाजी कलेटवाड, अशोक बल्ला, प्रशांत म्याकल, मीरा कांबळे, मल्लेशम कारमपुरी आदी मंचावर होते. अनिल वासम यांनी सूत्रसंचालन केले.


पिळवणूक दिसत नाही
केंद्र आणि राज्याच्या नेत्यांकडून आज कसल्या गप्पा आहेत? गाय, शेण आणि बुलेट ट्रेन. शिक्षण अन् रोजगाराविषयी ब्र शब्द काढता नाहीत. सरकारी खात्यांमध्ये आज साडेतीन लाख जागा रिक्त आहेत. कंत्राटी पद्धत वाढली. त्याने पिळवणूक वाढली. या बाबी शासनाला दिसत नाहीत?
- प्रीती शेखर, राज्य सचिव, डीवायएफआय

 

केवळ मंदिर-मशिदीची चर्चा, बेरोजगारीवर नाही
मंदिर, मशीद कुठे बनवायचे या चर्चा सध्या रंगलेल्या दिसतात. बेरोजगारीवर कोणीच बोलत नाही. एक जवान सीमेवर शहीद होतोय तर दुसरा शेतातल्या झाडाला लटकतोय. हे विदारक चित्र बदलण्याची कुठलीच योजना नाही. युवकांनाच त्यासाठी पुढाकार घ्यावा लागेल. त्यासाठी विद्यार्थी शक्ती एकवटली पाहिजे.
- डॉ. विक्रम सिंग, राष्ट्रीय सचिव, एसएफआय

 

शाळा बंदचा निर्णय?
मागास विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती कमी केली. पुरोगामी महाराष्ट्रात शाळा बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या विरोधात लढा पुकारला तर पुण्यात आम्ही नक्षलवादी असल्याचा ठपका ठेवला. भगतसिंगांचा वारसा घेऊन निघालो. नथुराम समर्थकांनी आम्हाला डिवचू नये.
- मोहन जाधव, राज्य अध्यक्ष, एसएफआय

 

बातम्या आणखी आहेत...