आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पंढरपुरात पर्यावरणपूरक भक्त निवास, १२०३ वारकऱ्यांची सोय; आषाढी यात्रेला होणार उद््घाटन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- श्री विठ्ठल- रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीने पंढरपुरात सुमारे ७० कोटी रुपये खर्च करून पर्यावरणपूरक असे भक्त निवास बांधण्यात आले आहे. सुमारे साडेआठ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या या भक्त निवासामध्ये अग्निशमन यंत्रणा, घनकचरा व्यवस्थापनाद्वारे सेंद्रिय खतनिर्मिती, मैला शुद्धीकरण, रेनवॉटर हार्वेस्टिंग, विजेसाठी सोलार यंत्रणेचा अवलंब करण्यात आलेला आहे. 


येत्या आषाढी एकादशीवेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते या निवासाचे उद्््घाटन करण्यासाठी प्रयत्नशील असल्याची माहिती, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले यांनी दिली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची निवासाची उत्तम सोय व्हावी यासाठी मंदिर समितीच्या वतीने २६ डिसेंबर २०१४ रोजी या इमारतीच्या बांधकामाचा शुभारंभ झाला. सुरुवातीला ५० कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. मात्र, इमारत पूर्ण होईपर्यंत केवळ बांधकामासाठी (५६ कोटी), फर्निचर (५ कोटी ३४ लाख), फायर ब्रिगेडसाठी (१ कोटी), इलेक्ट्रिकसाठी (४ कोटी १४ लाख), दिशादर्शकांसाठी (४८ लाख) या बरोबरच मलशुद्धीकरण, रेनवॉटर हार्वेस्टिंग, सोलार यंत्रणा, सीसीटीव्ही असा सुमारे सत्तर कोटी रुपये इतका या इको फ्रेंडली इमारतीच्या उभारणीसाठी खर्च आला आहे. 


- तळमजल्यावर १ लाख चौ. फुटांची पार्किंग व्यवस्था. 
- भक्त निवासाच्या मध्यभागी लग्न किंवा कोणत्याही धार्मिक समारंभासाठी चाळीस हजार स्क्वेअर फुटांवर लॉन्स. 
- भव्य स्टेज, सनई चौघड्यांसाठी (बँडस्टँड) खास मेघडंबरीची रचना, रंगीबेरंगी आकर्षक विद्युत रोषणाई. 
- संपूर्ण इमारतीचे वायरिंग हे कन्सिल्ड पद्धतीने करण्यात आले आहे. तुळशीसह विविध तेरा प्रकारच्या देशी झाडांचे रोपण. 
- इमारतीत विविध धर्मांतील प्रसिद्ध संतांची साडेसहा फूट लांबी व रुंदी असलेली भव्य अशी भित्तिचित्रे लावली जाणार. 
- भक्त निवासाच्या बाहेरील बाजूस एकूण ३८ व्यापारी गाळे बांधण्यात आलेले आहेत. 


सात भागांमध्ये भक्त निवासाची विभागणी 
पंढरपुरामध्ये उभारलेली भक्त निवासाची इमारत सात भागांमध्ये विभागली असून त्यात एकूण २७३ खोल्या बांधण्यात आलेल्या आहेत. यात ४ व्हीव्हीआयपी सूट, ६ फॅमिली रुम्स, दोन बेडच्या (१३२), डॉरमेटरी प्रकारात पाच बेडच्या (६३) आणि आठ बेडच्या (७८) तसेच वन बीएचके १० फ्लॅट बांधण्यात आलेले आहेत. या इमारतीत एकाच वेळी १ हजार २०३ वारकरी राहू शकतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. 

बातम्या आणखी आहेत...