आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विद्यापीठ व्यवस्थापन परिषदेसाठी रोंगे व मोहिते यांच्यात होणार चुरस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची निवडणूक १७ जुलै रोजी होणार आहे. सिनेट सभागृहातून आठ सदस्य व्यवस्थापन परिषदेसाठी निवडून द्यायचे आहेत. मात्र, राखीव संवर्गाच्या चार जागा बिनविरोध होऊ शकल्या. उर्वरित खुल्या जागांसाठी मतदानानेच फैसला होणार आहे. १० जुलै रोजी अर्ज माघारीचा दिवस होता. चार जागांसाठी अकरा अर्ज दाखल होते. दोघांनी अर्ज माघार घेतला. ९ उमेदवार निवडणूक रिंगणात उभे आहेत. १७ जुलै रोजी अधिसभा सदस्यांची बैठक आयोजिली आहे. त्यात प्रत्यक्ष मतदान होईल व चार सिनेट सदस्य व्यवस्थापन परिषदेवर निवडून जातील. 


७० सिनेटर या निवडणुकीत मतदान करतील. मात्र हे सदस्य विद्यापीठ अधिकारी, पदसिद्ध सदस्य, राज्यपाल नियुक्त सदस्य, कुलगुरू नियुक्त सदस्य, संस्थाचालक, प्राचार्य, पदवीधर सदस्य, कलावंत, पत्रकार असे ख्यातनाम मतदाते असल्याने या निवडणुकीला वलय असते. संस्था प्रतिनिधी गटात सर्वाधिक चुरस असेल. पंढरपूर अभियांत्रिकीचे अध्यक्ष डॉ. पी. बी. रोंगे यांना संस्था अध्यक्ष स्वरूपाराणी माेहिते यांचे आव्हान पेलावे लागेल. तसेच प्राचार्य, पदवीधर व शिक्षक मतदार संघातही जास्तीत जास्त सिनेटरांची पसंती मिळवावी लागेल. यासाठी सुटा संघटना, अभाविप यांच्याबरोबरच इतर संघटनांनीही आपापले बळ लावले आहे. अर्ज माघार घेण्याचा मंगळवार अंतिम दिवस होता. त्यानुसार शिक्षक प्रवर्गात तीन पैकी डॉ. चंद्रकांत चव्हाण यांनी तर पदवीधर मतदार संघातून नागणसुरे यांनी आपले अर्ज माघार घेतले. 


राखीव संवर्गातील चौघे बिनविरोध 
राखीव संवर्गातून शाहू शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अब्राहम आवळे, प्राचार्य बाळू शिंगाडे, भारत महाविद्यालय जेऊर, प्रा. भगवानराव आदटराव, भीमराव पाटील महाविद्यालय मंद्रूप , अॅड. नीला मंकणी असे चौघे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले. 


खुल्या संवर्गासाठी असणार चुरस 
> संस्था प्रतिनिधी - स्वेरीज अभियांत्रिकीचे डाॅ. पी. बी. रोंगे तसेच स्वरूपाराणी मोहिते यांनी अर्ज भरले आहेत. यातील एकाला निवडावे लागेल. निवडणूक असल्याने सिनेटर मतदारांच्या प्रत्यक्ष भेटीद्वारे प्रचार सुरू करण्यात आला आहे. 
> प्राचार्य प्रतिनिधी - प्राचार्य डाॅ. डॉ. बी. एम. भांजे, मंद्रूप महाविद्यालय, प्राचार्य डॉ. संतोष कोटी, हिराचंद नेमचंद , प्राचार्य आर. आर. पाटील यांनी अर्ज भरले आहेत. यासाठी सुटा, अभाविप व इतर आघाडी असा सामना रंगणार आहे. 
> शिक्षक प्रतिनिधी - डॉ. अनिल बारबोले, डॉ. आवताडे यांच्यात चुरस असेल. 
> पदवीधर प्रतिनिधी - अश्विनी चव्हाण, सचिन गायकवाड यांच्या दोघांत चुरस असेल.

बातम्या आणखी आहेत...