आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साेलापूरच्या अभियंत्याने बनवले कचरा शोषणारे यंत्र; अर्धा लिटर पेट्रोलवर 300 मीटर परिसर साफ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सर्व प्रकारचा कचरा, मग कागदाचे तुकडे असो, प्लास्टिक पिशव्या असो, दुभाजकाला लागून राहिलेली धूळ असे सर्व घटक शोषून घेणारे यंत्र सोलापूरच्या अभियंत्याने तयार केले आहे. फक्त ७० हजार रुपयांत विकसित झालेले हे यंत्र पेट्रोलवर चालते. अर्धा लिटर पेट्रोलमध्ये ते ३०० मीटरचा परिसर साफ करते.  स्वच्छ भारत अभियानात सारेच झाडू घेऊन रस्त्यावर उतरले. झाडू हाती घेणे काही लोकांना कमीपणाचे वाटते, अशांना प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी या यंत्राची कल्पना सुचली, असे या मशीनचे निर्माते मेकॅनिकल इंजिनिअर जयंत येमूल यांनी सांगितले.  

‘गोवर्धन स्वच्छ मशीन’ असे या यंत्राचे नाव आहे. यातील एक इंजिन वगळता, सर्व सुटे भाग देशी बनावटीचे आहेत. एकच व्यक्ती हाताळू शकेल, अशी त्याची रचना आहे. त्यामुळे अडचणीच्या जागेतील कचरा सहज साफ करता येतो. अोला आणि सुका अशा दोन्ही प्रकारचा कचरा या मशीनने संकलित करणे सोपे आहे. यंत्रमागांना बॉबिन बनवून देणारे कुटुंब म्हणून येमूल यांची ओळख आहे. यातील दोन संशोधनांचे पेटंट त्यांच्याकडे आहे. जयंत येमूल सातत्याने प्रयोग करत असतात.  


येमूल म्हणाले, ख्यातनाम धर्मादाय संस्था पूनावाला ट्रस्टने दोन वर्षांपूर्वी पुणे महापालिकेला अशा प्रकारचे २५० मशीन दिल्या होत्या. त्या तैवानच्या तंत्राच्या होत्या. त्यांची साधारण किंमत अडीच लाख रुपयांपर्यंत असावी. त्याचे तंत्र पाहिले. ते इम्पोर्टेड होते. त्याच धर्तीवर मशीन बनवण्याचा विचार सुरू झाला. देशी सुटे भाग घेऊन त्यावर प्रयोग सुरू केले. तीन-चार प्रयोगांतच ते यशस्वी झाले.

 

अशी आहे रचना  

> २०० व १०० लिटर क्षमतेच्या दोन टाक्या या यंत्रणेत अाहेत.
> कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी प्लास्टिक पिशवी त्यात आहे.
एका लोखंडी स्टँडवर ती ठेवण्यात येते.
> त्याला हलक्या वजनाचे पाइप असून, त्याद्वारे कचरा शोषला जातो. 
> टाकीवर एक इंजिन असून, त्याला पेट्रोलची टाकी जोडलेली आहे.
तिथेच एक मशीन सुरू करण्यासाठी बटण.
> पाइप धरून रस्त्यावर फिरवले की कचरा शोषला जातो.

 

मशीनची वैशिष्ट्ये  

 

- अडचणीतील कचरा सहजगत्या अोढून घेते  
- कचरा पुढे ढकलत नाही, त्यामुळे धूळ उडत नाही. 

- तासाला अर्धा लिटर पेट्रोल घातले की ३०० मीटर परिसर साफ होतो.

- कमी खर्चात जलद स्वच्छता  
- कमी श्रमात अधिक कचरा काढू शकतो

बातम्या आणखी आहेत...