आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

किडनीच्या आजाराने वडिलांचे निधन, मृतदेहावर संस्कार करण्यापूर्वी तिने दिला दहावीचा पेपर

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उमरगा - घरची परिस्थिती हलाखीची. काबाडकष्ट करून मुलांच्या शिक्षण व कुटुंबाचा गाडा चालविणाऱ्या वडिलांचे कष्ट पाहून मोठ्या जिद्दीने अभ्यास करून दहावीची परीक्षा देत असलेल्या लक्ष्मीला मंगळवारी (दि १३) मोठा धक्का बसला. किडनीच्या आजाराने वडिलाचे निधन झाले.या परिस्थितीत मन खंबीर करीत वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लक्ष्मीने वडिलांचा मृतदेह घरी ठेवून बुधवारी (दि.१४) विज्ञानाचा पेपर दिला.

 

तालुक्यातील त्रिकोळी येथील लक्ष्मी दिगंबर दुधभाते ही गावातील श्री. स्वामी विवेकानंद विद्यालयात शिक्षण घेणारी लक्ष्मी अभ्यासात हुशार, मात्र कौटुंबिक परिस्थिती हलाखीची. आई-वडील, दोन भाऊ असे कुटुंब. वडील दिगंबर दुधभाते यांच्याकडे वडिलोपार्जित शेत जमीन असून, त्यात कुटुंबाचा उदरनिर्वाह चालणे जिकिरीचे होत असल्याने जोडधंदा म्हणून शेळीपालन केले. कोरडवाहू जमिनीत येणारे उत्पन्न व शेळ्यापालनातून मुलांचे शिक्षण सुरू ठेवले होते. मोठा मुलगा महाविद्यालयीन शिक्षण घेत आहे.

 

मुलगी लक्ष्मी दहावीला तर लहान मुलगा नववीच्या वर्गात शिक्षण घेत आहे. दिगंबर दुधभाते यांच्यावरच कुटुंबाचा भार त्यात काही महिन्यापूर्वी दिगंबर दुधभाते किडनीच्या आजाराने त्रस्त होते.लातूर, सोलापूर यासह अन्य ठिकाणी उपचारासाठी प्रयत्न सुरू होते. अखेर मंगळवारी(दि.१३) सायंकाळी त्यांचे निधन झाले. उद्या विज्ञान विषयाचा पेपर असल्याने अभ्यासात असलेल्या लक्ष्मीवर दु:खाचा डोंगर कोसळला. बुधवारी अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याने कुटुंब, नातेवाईक दु:खात होते तेंव्हा शाळेतील शिक्षकांनी नातेवाईकांची भेट घेवून मुलगी हुशार असून परिक्षेला पाठवून द्यावे, अन्यथा तिचे वर्ष वाया जाईल, असे सांगत लक्ष्मीला विचारणा केली.तीने मोठ्या धैर्याने परिक्षा देण्याचा निर्णय घेत परीक्षा झाल्यावरच वडिलांचे अंत्यसंस्कार करण्यात यावे, असे सांगितले.

 

बुधवारी सकाळी दहा वाजता उमरगा शहरातील महात्मा बसवेश्वर विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर नातेवाईकांसह दाखल झाली. केंद्र संचालक मुख्याध्यापक नेताजी गायकवाड, पर्यवेक्षक रघुवीर आरणे यांना घटनेची सत्यता माहित झाल्यावर त्यांनीही लक्ष्मी दुधभाते हिस धीर देवून विज्ञान भाग एकचा पेपर सोडविण्याची हिंमत दिली. परीक्षा संपल्यानंतर लक्ष्मी व नातेवाईक पाणावलेल्या डोळ्यांनी गावाकडे निघाली. दुपारी लक्ष्मी आल्यानंतर वडिलांच्या पार्थिवावर शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दहावीचे उर्वरित पेपर अभ्यास करून परिक्षा देण्याचा मानस व्यक्त करून वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्याची जिद्द आधुनिक काळातील सावित्रीच्या लेकीने उराशी बाळगली आहे.

बातम्या आणखी आहेत...