आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या माघी रिंगण सोहळ्यात प्रथमच धावणार माऊलींचे दोन्ही अश्व

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उत्तर सोलापूर- यंदा सोलापुरातील माघीवारीतील गोल रिंगण सोहळ्याला आळंदीच्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील अश्व सहभागी होणार आहेत. या अश्वांच्या रिंगणामुळे माऊलीच्या दर्शनाची सोलापूरकरांना अनुभूती मिळणार आहे. सोलापूरच्या माघीवारीच्या २५० वर्षांच्या परंपरेत पहिल्यांदाच माऊलींचे अश्व सहभागी होणार आहेत. त्यामुळे सुमारे दोन लाख भाविक यात सहभागी होणार अाहेत. अखिल भारतीय वारकरी मंडळाकडून या सोहळ्याची जय्यत तयारी सुरू आहे. 


पंढरीत आषाढी, कार्तिकीप्रमाणेच माघ महिन्यातील एकादशीला भरणाऱ्या यात्रेलाही महत्त्व आहे. सोलापुरातील कष्टकरी समाजाची वारी म्हणून ही वारी ओळखली जाते. शहरातील वडार समाज, पद्मशाली समाजासह इतर समाजातील लोक विठ्ठलाच्या दर्शनासाठी पायी पंढरपूरला जातात. वारीला चालत जाताना येणारा थकवा दूर व्हावा म्हणून रिंगण सोहळा आयोजित केला जातो. या रिंगण सोहळ्यात धावणाऱ्या अश्वामुळे साक्षात ज्ञानेश्वर माऊली धावत असल्याची श्रद्धा वारकरी संप्रदायात आहे. अश्व रिंगण सोहळ्यात धावल्यानंतर त्याच्या टापाखालील माती आपल्या कपाळी लावण्यात वारकरी धन्य मानतात. त्यातून वारकऱ्यांना ऊर्जा मिळते. 


सोलापुरातील सोहळ्यासाठी सोशल माध्यमांद्वारे प्रचार, प्रसाराची मोहीम राबवली जात आहे. शहरासह जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतही या रिंगण सोहळ्यासाठी तयारी सुरू आहे. अंदाजे दोन लाख भाविक उपस्थित राहण्याची शक्यता आहे. 


हा सोहळा यशस्वी होण्यासाठी सुधाकर इंगळे महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली किसन कापसे, महेश चोरमुले, गणेश वारे, बळीराम जांभळे, बब्रुवाहन कांबळे, ज्योतिराम चांगभले, संजय पवार, मोहन शेळके, संजय केसरे, चंद्रकांत जांभळे प्रयत्नशील आहेत.

 
२३ जानेवारीला सोहळा 
गेल्यासात वर्षांपासून अखिल भारतीय वारकरी मंडळाकडून पार्क मैदानावर गोल रिंगण सोहळा होतो. यंदा २३ जानेवारी रोजी दुपारी साडेचार वाजता रिंगण सोहळा होणार आहे. या वेळी प्रथमच आळंदी येथील ज्ञानेश्वर माऊली पालखी सोहळ्यातील दोन अश्व सहभागी होणार आहेत. या सोहळ्यात शहरातील ४३ तर परिसरातील ५५ दिंड्या सहभागी होणार आहेत. युवक, महिला, विद्यार्थी, सामाजिक संघटनांना यात सहभागी होण्याचे आवाहन वारकरी मंडळाने केले आहे. 

बातम्या आणखी आहेत...