आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाजपेयी-अडवाणींवर आडम यांची स्तुतिसुमने; कोठे यांनी स्वार्थासाठी पद्मशाली समाजाचा वापर केल्याचा आरोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या गदारोळात शुक्रवारी माकपचे माजी आमदार नरसय्या आडम यांनी पत्रकार परिषद घेऊन फोडणी दिली. पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी स्वहितासाठी भाजपला मातीत घातल्याचे सांगत माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी आणि लालकृष्ण आडवाणी यांच्यावर स्तुतिसुमने उधळली. तर, पद्मशाली समाजासाठी महेश कोठे नव्हे तर वेळोवेळी आपणच धावून गेल्याचा दावा करत समाजाला चुचकारण्याचा प्रयत्न माकप नेते आडम यांनी केला. 


भाजपचे दोन मंत्री परस्पर विरोधात उभे आहेत. इतकेच नाही तर दोघेही एकमेकांवर आरोप करत आहेत. बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही मंत्र्यांनी भाजपच्या तत्वाला तिलांजली दिली. सुडाचे राजकारण केले जात आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वप्न दाखवतात आणि त्यांचे शिलेदार देशाला लुटतात, असा आरोप आडम यांनी केला. 


आडम म्हणाले, या निवडणुकीत माकपचा एक उमेदवार आहे. कॉँग्रेस आणि भाजप या दोन लुटारू टोळ्या समोर आहेत. ज्येष्ठांनी चांगल्या विचाराने बाजार समिती उभी केली. आज ही समिती लुटारूंचे केंद्र बनले आहे. येथे काही तरी मलिदा मिळत असेल म्हणूनच विधानसभेपेक्षा जास्त चुरस या बाजार समिती निवडणुकीत दिसून येत आहे. भाजप आणि कॉँग्रेसच्या ताेंडून शेतकरी हिताच्या गोष्टी योग्य वाटत नाही. 


पद्मशाली समाजासाठी वारंवार धावून गेलो 
पद्मशाली समाजाला जेव्हा जेव्हा गरज पडली तेव्हा तेव्हा आम्ही मदतीला धावून गेलो. अख्ख्या आयुष्यात महेश कोठे यांनी समाजाचा एक टक्काही फायदा केला नाही. उलट आपल्या राजकीय स्वार्थासाठी समाजाचा वापर केला. येत्या विधानसभा निवडणुकीसाठी त्यांनी पुन्हा पद्मशाली ज्ञाती संस्थेत उडी घेतली आहे. मात्र, संपूर्ण समाज सुरेश फलमारी यांच्या पाठीशी उभा आहे. कोठे यांना समाज धडा शिकवेल, असा दावा आडम यांनी केला.

बातम्या आणखी आहेत...