आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संशय घेणाऱ्या पत्नीला ठेचून मारले, 2 चिमुकल्या मुलींचा गळा घाेटला; पतीची आत्महत्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज- पतीच्या चारित्र्यावर संशय घेऊन पत्नी सतत वाद घालायची. या नेहमीच्या वादाला कंटाळून युवकाने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला व अापल्या मुलींना फासावर लटकावले. ही घटना माळशिरस तालुक्यातील पिलीव येथे घडली. पत्नी स्वाती अनुसे (२५), प्रणाली (१०) आणि ऋतुजा (७) अशी मृतांची नावे अाहेत. त्यांचे मृतदेह सुळेवाडी हद्दीतील घाटात फेकून दिल्यानंतर अाराेपी  सुभाष अनुसे (२८) यानेही अात्महत्या केली. मंगळवारी सकाळी हा प्रकार उघडकीस अाला.  ‘आपण आपली पत्नी व मुलींना संपवून आत्महत्या करत अाहाेत,’ असे अाराेपीने मृत्युपूर्व लिहिलेल्या चिठ्ठीत नमूद केले आहे.   


उंबरे (वे.) हद्दीत चंडकाईवाडी येथे अनुसे कुटुंब शेतातच वास्तव्यास हाेते. सुभाष अनुसे याचे सन २००६ मध्ये स्वाती हिच्याशी लग्न झाले होते. मात्र गेल्या काही महिन्यांपासून स्वाती पतीच्या चारित्र्यावर सतत संशय घ्यायची, त्यामुळे दाेघांमध्ये नेहमीच वाद व्हायचे. यातूनच सुभाषने हे अघाेरी कृत्य केले. सोमवारी दवाखान्यात जाण्याचे निमित्त करून सुभाषने पत्नी स्वातीला साेबत घेऊन घर साेडले. तसेच शाळेत जाऊन मुलगी प्रणाली व ऋतुजा यांनाही बराेबर घेतले. त्यानंतर रात्री उशिरापर्यंत हे चाैघेही घरी परतले नाहीत. इतर नातेवाइकांनी रात्री उशिरापर्यंत शाेधाशाेध करून नंतर अकलूज पाेलिसात तक्रार दाखल केली. पाेलिसांनी शाेध घेतला असता मंगळवारी चाैघांचेही मृतदेह  पिलीव घाटात सापडले. सुभाष, प्रणाली व ऋतुजा हे गळफास घेतलेल्या अवस्थेत तर स्वाती रक्ताच्या थारोळ्यात पडलेली दिसून आली.  


वडिलांच्या रूपाने प्रणाली व ऋतुजाचा काळच अाला  
आईवडील घ्यायला आल्याने अाम्ही प्रणाली व ऋतुजा यांना त्यांच्यासाेबत पाठवले, असे  शाळेच्या मुख्याध्यापिका जाधव यांनी सांगितले. वडील घ्यायला आल्याने मोठ्या आनंदाने त्यांच्यासाेबत गेलेल्या प्रणाली व ऋतुजा यांचे मृतदेह शाळेच्या गणवेशात लटकलेल्या अवस्थेत दिसून आले. वडिलांच्या रूपात जणू काळच त्या निरागस मुलींना नेण्यासाठी आला होता. सुभाषच्या मृतदेहाजवळ गुन्हा कबूल केल्याची चिठ्ठी अाढळून अाली असून, त्या दृष्टीने अधिक तपास सुरू असल्याचे अकलूजचे पाेलिस उपअधीक्षक मंगेश चव्हाण यांनी सांगितले.

 

सधन कुटुंब संशयापायी संपले

सुभाषचे वडील शामराव यांची २२ एकर बागायती जमीन असून थोरला मुलगा तानाजीला ८ आणि सुभाषला ८ एकर जमीन देऊन त्यांनी उर्वरित जमीन स्वत:कडेच ठेवली अाहे. सुभाषने डाळिंब, केळी, ऊस अशी पिके लावली आहेत. सधन कुटुंबातील सुभाष अतिशय संयमी व सज्जन असल्याचे गावकरी सांगतात. या पती-पत्नीत सतत वाद व्हायचे. स्वाती हिचे माहेर पंढरपूर तालुक्यातील सांगवी येथील आहे. सासुरवाडीच्या लोकांनी येथे येऊन सुभाषला मारहाण केल्याच्या घटनाही घडल्या आहेत. यासंदर्भात अकलूज पोलिस ठाण्यात तक्रारही दाखल अाहे. मात्र एवढ्या शांत स्वभावाच्या सुभाषने असे क्रूर कृत्य केल्याचा विश्वासच बसत नसल्याचे गावकरी सांगतात.

बातम्या आणखी आहेत...