आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संपूर्ण कर भरणाऱ्या गावकऱ्यांना मोफत दळण, स्मार्ट कुटुंब कार्ड,‘आरआे’चे पाणी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - ग्रामपंचायतीचा संपूर्ण कर भरणाऱ्या गावकऱ्यांना वर्षभर मोफत दळण, स्मार्ट कुटुंब कार्ड, ‘आरआे’चे मोफत पाणी, कापडी पिशवी अन् झाडाचं रोपटं. तावशी (ता. पंढरपूर) ग्रामपंचायतीने हा अभिनव उपक्रम राबवला आहे. डिसेंबर २०१७ पासून या संकल्पनेस गावकऱ्यांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. १ एप्रिल २०१८ पासून नवीन कर आकारणी सुरू झाली. आतापर्यंत ३०० पेक्षा जास्त गावकऱ्यांनी शंभर टक्के कर भरला असून ती संख्या आणखी वाढेल, असा विश्वास ग्रामसेविका ज्योती पाटील यांनी व्यक्त केला.   

 

तावशी हे साडेचार हजार लोकवस्तीचं गाव. लोकसहभागातून संपूर्ण गाव निर्मल ग्राम करणाऱ्या ग्रामपंचायतीने अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम व योजना राबवल्या आहेत. नियमित कर भरणाऱ्या गावकऱ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी त्यांना वर्षभर गहू व ज्वारी मोफत दळून देण्यासाठी ग्रामपंचायतीने स्वतंत्र पिठाची गिरणी उभी केली. त्यासाठी लोकनिधीतून इमारत बांधली.

 

ग्रामपंचायतीचा कर्मचारी गिरणी सांभाळणे अन् करवसुलीची कामे करतो. ग्रामीण भागात दळणासाठी दूरवर जावे लागते. अनेकदा, वाड्यावस्त्यांवर राहणाऱ्यांना गिरणीचालकांच्या सोईनुसार दळण आणावे लागते. प्रामुख्याने महिलांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सरपंच सोनाली यादव व ग्रामसेविका पाटील यांनी ही कल्पना राबवली. वर्षभर दळणासाठी द्यावे लागणारे पैसे एकत्रितपणे ग्रामपंचायतीच्या करापोटी भरण्याची मुभा गावकऱ्यांना दिली. 

 

मोफत दळणाबरोबर संपूर्ण कर भरणाऱ्या कुटुंबीयांना मोफत आरआेचे पाणी, स्मार्ट कुटुंब कार्ड, बाजारासाठी चांगली कापडी पिशवी मोफत देण्यात आली. प्लास्टिक बंदीबाबत गावकरी जागरूक असून दुकानातून साहित्य आणण्यासाठी घरातून बाहेर पडतानाच कापडी पिशवी सोबत ठेवतात. घरावर कुटुंब प्रमुख म्हणून दारावर महिलेच्या नावाची पाट्या लावण्यात आल्याचे सरपंच यादव यांनी सांगितले.

 

तावशी ग्रामपंचायतीने राबवलेले असे काही अभिनव उपक्रम
* गावचा संपूर्ण कारभार ऑनलाइन
* ग्रामपंचायतीचे मोबाइल अॅप
* प्लास्टिकमुक्त, स्वच्छतागृह युक्त गाव
* एक कुटुंब एक झाड, रोपांची वाढ चांगली
* गावातील कचऱ्यापासून खतनिर्मिती
*  शाळा, अंगणवाडी आयएसआे प्रमाणित

 

गावाचा सकारात्मक पाठिंबा
ग्रामीण भागात कर भरण्याबाबत उदासीनता असते. वर्षभर दळणासाठीचे पैसे एकदम करापोटी भरल्यास त्यांना दळण मोफत देण्याची संकल्पना राबवली. त्यास गावकऱ्यांनी प्रतिसाद दिला. सरपंच सोनाली यादव,  गावकऱ्यांच्या पाठबळामुळे अभिनव उपक्रम राबवणारी तावशी ही जिल्ह्यातील ग्रामपंचायत ठरली. 
ज्योती पाटील, ग्रामसेविका

बातम्या आणखी आहेत...