आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुळे हल्ल्यातील मृतांवर झाले अंत्यसंस्कार; जिल्हाधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर अंत्यसंस्कार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवेढा- धुळे जिल्ह्यात चोर समजून झालेल्या हल्ल्यात मृत पावलेल्या मंगळवेढा तालुक्यातील चार जणांपैकी दादाराव शंकर भोसले, भारत शंकर माळवे, भारत शंकर भोसले यांच्यावर खवे येथे तर आगणूक श्रीमंत इंगोले यांच्यावर मानेवाडी येथे पोलिस बंदोबस्तात अंत्यसंस्कार करण्यात आले. हल्ल्यातील पाचवी मृत व्यक्ती राजू श्रीमंत भोसले यांच्यावर कर्नाटकातील गोंदवन गावी अंत्यसंस्कार करण्यात आले. 


सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास शववाहिका मानेवाडी येथे दाखल झाली. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी मारहाणीची घटना दुर्दैवी असल्याचे सांगत स्वतःच्या हस्ताक्षरात न्याय देण्याचे लेखी आश्वासन दिल्याने डवरी गोसावी समाजाने अंत्यसंस्कार करण्याचा निर्णय घेतला. या वेळी आमदार भारत भालके म्हणाले, हिवाळी अधिवेशनात स्थगन प्रस्ताव मांडून मृतांच्या नातेवाइकांना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवू. या हल्ल्यासंदर्भात मानवी हक्क आयोगाकडे पाठपुरावाही केला जाईल. या वेळी प्रांताधिकारी प्रमोद गायकवाड, पंचायत समितीचे सभापती प्रदीप खांडेकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सोमनाथ आवताडे, शिवसेना तालुका प्रमुख येताळा भगत, डवरी गोसावी समाजाचे नेते मच्छिंद्र भोसले, समाजाचे मुंबई येथील रेल्वेचे सहायक पोलिस आयुक्त मच्छिंद्र चव्हाण, भरतकुमार तांबिले, गोरख इंगोले, सरपंच पंडित पाटील, मारुती भोसले, देवानंद बाबर आदी उपस्थित होते. 


सर्वपक्षीय कडकडीत बंद 
तालुक्यातील नाथपंथी डवरी समाजातील ५ जणांची धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे हत्या करण्यात आली होती. त्या घटनेचा निषेध म्हणून मंगळवेढ्यात सर्वपक्षीयांनी कडकडीत शहर बंद पाळण्यात आला. या वेळी आमदार भारत भालके, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळेे, रतनचंद शहा बँकेचे चेअरमन राहुल शहा, नगराध्यक्षा अरुणा माळी, नगरसेविका अनिता नागणे, नारायण गोवे, अॅड. भारत पवार, अविनाश शिंदे यांनी आदरांजली वाहिली. बाजारपेठ बंद असल्याने सर्वत्र शुकशुकाट होता. 

बातम्या आणखी आहेत...