आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राईनपाड्यात अफवांचे बळी ठरलेल्या ५ कुटुंबांतील मुलांच्या शिक्षणाची, मुलींच्या विवाहाची 'जमियत'ने घेतली जबाबदारी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- पाेरधरी असल्याच्या संशयावरून राईनपाडा (जि. धुळे) येथील गावकऱ्यांनी नाथपंथी डवरी या भटक्या समाजातील पाच जणांची क्रूर हत्या केली. माणुसकीला काळिमा फासणाऱ्या या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला. साेलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा येथील चार व कर्नाटक सीमेवरील एक अशा पाच मृतांचे कुटुंबीयही उघड्यावर अाले. या पाच कुटुंबांना मदतीचा हात देऊन पुन्हा स्वाभिमानाने जगण्याचे बळ देण्यासाठी जमियत उलेमा-ए-हिंद या संस्थेने पुढाकार घेतला. या पाचही कुटुंबांतील सहा मुली व ३ मुलांच्या शिक्षणाची व मुलींच्या विवाहाची जबाबदारी या संघटनेने घेतली अाहे. 


मुळे पळवणारी टोळी असल्याच्या संशयावरून १ जुलै रोजी दुपारी साक्री तालुक्यातील राईनपाड्यात जमावाने पाच भिक्षेकऱ्यांची काठी, विटा, दगडाने ठेचून अमानुष हत्या केली. हे सर्व सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा, खवे गावातील आहेत. या घटनेमुळे मृतांचे कुटुंबीय काेलमडले. घराचा आधारस्तंभ गेल्यामुळे त्यांच्या प्रपंचाचा डोलारा कोसळला. सरकारने दहा-पाच लाखांची मदत जाहीर केली, मात्र हा पैसा तरी किती दिवस पुरणार? दरम्यान, पोटाची खळगी भरण्यासाठी या कुटुंबातील मुलांनाही भिक्षा मागावी लागू नये, त्यांचे भविष्य उज्ज्वल व्हावे याकरिता जमियत उलेमा-ए-हिंद या संघटनेने त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी स्वीकारली. 


असेही दानशूर 
'जमियत'चे प्रदेशाध्यक्ष नदीम सिद्दिकी, शहराध्यक्ष मौलाना इब्राहिम जहूरकर, मुंबई उच्च न्यायालयातील विधिज्ञ तेव्हर खान पठाण अादींनी पाचही कुटुंबीयांची भेट घेतली आणि त्यांच्या नऊ मुलांना शिक्षणासाठी दत्तक घेत असल्याचे जाहीर केले. मुला-मुलींच्या इच्छेनुसार ते जे शिक्षण घेतील त्याचा संपूर्ण खर्च ही संघटना उचलणार अाहे. इतकेच नाही तर मुलींच्या शिक्षणानंतर त्यांच्या लग्नाच्या खर्चाची पूर्ण जबाबदारीही 'जमियत'ने उचलली अाहे. 


भाईचारा अबाधित राहावा 
देशात मानवता आणि भाईचारा अबाधित राहायला हवा. इस्लाम असाच शांततेचा आणि मानवतेचा संदेश देतो. त्यानुसार आम्ही मंगळवेढ्यातील त्या पाच मृतांच्या वारसांच्या शिक्षणाची तसेच मुलींच्या शिक्षणानंतर त्यांच्या लग्नाची जबाबदारीही स्वीकारली. हे लग्न त्यांच्या समाजाच्या रीतिरिवाजानुसार थाटात होईल. 
- मौलाना इब्राहिम जहूरकर, शहराध्यक्ष, जमियत उलेमा-ए-हिंद, साेलापूर

बातम्या आणखी आहेत...