आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अवकाळीचा जोरदार तडाखा: शहर जलमय, घरांवरील पत्रे उडाले, झाडे कोसळली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बुधवारी दुपारी शहराला वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला. दुपारी तीननंतर वातावरण अचानक बदलले. सोसाट्याचा वारा सुटला. रस्ते धुळीने माखून गेले. वादळाचे रौद्र रूप पाहून रस्त्यावरची वाहतूक थांबली. बाजारपेठा आणि इतर ठिकाणच्या दुकानांतील व्यवहार थांबले. वादळ सुरू असतानाच जोरदार पावसाला सुरुवात झाली.

 

तासाभरातच दोन इंच पावसाची नोंद झाली. आडव्या तिडव्या पद्धतीने झोडपलेल्या या अवकाळी पावसाने शहरातील जनजीवन विस्कळीत झाले. नाही म्हणायला शहरवासीयांची उकाड्यापासून सुटका मात्र झाली. संध्याकाळनंतर वातावरणात गारवा जाणवला. 


वादळी पावसाच्या तडाख्यात ५० हून अधिक झाडे पडले. ३०० हून अधिक झाडांच्या फांद्या तुटल्या. विडी घरकुल, शुक्रवार पेठेतील अनेक घरांचे पत्रे उडाले. बुधवार पेठ परिसरात अनेक घरांत पाणी साचले. जुना अक्कलकोट नाका येथील पालांत पाणी शिरल्याने भटक्या कुटुंबांची दैना झाली. भवानी पेठ परिसरात एका बालिकेचा घराचा सज्जा व भिंत कोसळून मृत्यू झाला. 


पडली झाडे, तुटल्या फांद्या 
वालचंद महाविद्यालयाजवळ, सात रस्ता शर्मा स्वीटजवळ, कामत हॉटेलजवळ, डॉ. निर्मलकुमार फडकुले सभागृह तसेच शहराच्या विविध भागात झाडे उन्मळून पडली. शांती चौक पाणी टाकीजवळ व वालचंद इंजिनिअरिंग कॉलेज समोर झाड पडून वाहतूक काही काळ बंद झाली. मातंग वस्ती, पाथरूट चौक येथेही मोठे झाड पडले. सोलापूर न्यायालय परिसर येथे मोठे झाड रस्त्यावर आडवे पडले. नागरिकांनीच ते बाजूला केले. चार पुतळा परिसरातही एक गुलमोहोराचे झाड पडले. 


पत्रे उडाले अनेकांचे संसार आले उघड्यावर 
बाळे अंबिका नगर, विडी घरकुल, घोंगडे वस्ती, मिलिंद नगर, बुधवार पेठ, माणिक चौक, शुक्रवार पेठ, मुल्लाबाबा टेकडी आदी ठिकाणी घरावरचे पत्रे उडाल्याच्या घटना घडल्या. अनेकांचे संसार उघड्यावर आले. 

 
तहसीलदारांना पंचनामा करण्याचे आदेश 
शहरात दुपारी झालेल्या पावसामुळे ज्या भागात नुकसान झाले आहे, त्याची पाहणी करून तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत. शिवाय ज्या ठिकाणी घरांचे नुकसान झाले आहे, पत्रे उडून गेले आहेत त्याचीही पाहणी करण्याचे आदेश तहसीलदारांना दिले आहेत. तहसीलदारांचा अहवाल येताच मदतीसाठी शासनाकडे प्रस्ताव सादर केला जाईल. 
- संजय तेली, निवासी उपजिल्हाधिकारी 

 

जि.प. आवारात डबके साचले. कर्मचाऱ्यांच्या वाहनतळात गुडघाभर पाणी साचल्याने अनेकांच्या मोटारसायकली बंद पडल्या. त्या साचलेल्या पाण्यातून वाट काढत नागरिकांना ये-जा करावी लागली. काही वर्षांपूर्वी परिसरातील सांडपाणी निचऱ्यासाठी काँक्रिटीकरणाची कामे करण्यात आली. पण, ती व्यवस्थित झाली नसल्याने पाणी साचले. 


वीज गुल, रात्री उशिरापर्यंत दुरुस्तीकामे 
वादळी वाऱ्यामुळे महावितरणचे मोठे नुकसान झाले. काही ठिकाणी विजेच्या तारा तर काही ठिकाणी विद्युत खांब पडले. याच्या दुरुस्तीचे काम रात्रीपर्यंत सुरू होते. यामुळे काही भागांत विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला होता. अनेक ठिकाणी रात्रभर वीज गुल झाली होती. 


सिव्हिल परिसर आणि अशोक चौक परिसरात लघुदाबाच्या विजेच्या तारा तुटल्या. काही ठिकाणी झाडांच्या फांद्या पडून तारा तुटल्या. गुरुनानक चौक परिसरात झाडाची फांडी पडून तार तुटली. जुळे सोलापूर, सोरेगाव, समाधान नगर आदी परिसरात विजेचे खांब वाकले. यामुळे या परिसरातील विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला. काही ठिकाणी किरकोळ दुरुस्तीचे काम लवकर झाले आणि विद्युत पुरवठा सुरळीत झाला. मात्र, ज्या ठिकाणी विद्युत तारा तुटल्या तेथे दुरुस्तीला वेळ लागला. मोठ्या दुरुस्तीची कामे गुरुवारी सकाळी करण्यात येतील. 


आजीच्या घरी आली होती दिव्या... 

घरात तीन तीन मुली. त्यातील सर्वात लहान आणि सर्वांची लाडकी दिव्या. अभ्यासात हुशार. केवळ शालेय अभ्यासक्रमच नाही तर इतर गोष्टीतही अव्वल असणारी ही छकुली. परंतु आम्ही काय पाप केले? आमच्या काळजाचा तुकडा हिरावून घेतला, असे म्हणत दिव्याच्या आजोबांनी हंबरडा फोडला. बुधवारी सोलापुरात झालेल्या अवकाळी पावसाने चारच दिवसांपूर्वी आजीकडे राहायला आलेल्या दिव्या गजानन गजेली या नऊ वर्षांच्या मुलीचा करुण मृत्यू झाला. 


सम्राट चाैक परिसरातील श्राविका शाळेमध्ये नुकताच चौथीमध्ये प्रवेश घेतलेल्या दिव्याची कहाणी सांगताना तिच्या आजोबांचे डोळे पाणावले. दिव्याची मोठी बहीण नम्रता ही बी. कॉम तर श्रुती दहावी पास आहे. नुकत्याच लागलेल्या शालांत परीक्षेत दिव्याने तिसरी इयत्ता उत्तीर्ण होत चौथीमध्ये प्रवेश मिळवला होता. 


आई सुमित्रा या घरकाम करीत असून वडील गजानन हे सात रस्ता परिसरातील वडगबाळकर कुटुंबीयांकडे कामाला आहेत. दिव्या हे तिसरे अपत्य. ती इतकी गोड होती की तिला प्रत्येक पाहुणा, चल बेटा आमच्या घरी राहायला असे म्हणत. यंदा उन्हाळ्यात साखर पेठ परिसरातील आजोळी चारच दिवसांपूर्वी राहावयास गेली आणि बुधवारी झालेल्या अवकाळी पावसाचे एक निमित्त झाले आणि आजीच्या घराची भिंत तिच्या अंगावर पडून जागीच तिचा करुण अंत झाला. दिव्याच्या निधनाने नातेवाईक व परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. 


आजीकडे आलेल्या नातीचा मृत्यू 
मूळची घोंगडे वस्ती येथील रहिवासी असणारी दिव्य गजानन गजेली (वय १०) ही मागील दोन दिवसांपासून भवानी पेठ येथे आजीकडे आलेली होती. परंतु या पावसाच्या तडाख्यात घराची भिंत व सज्ज्याचा काही भाग तिच्या अंगावर पडल्याने तिचा मृत्यू झाला. 

बातम्या आणखी आहेत...