आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समिती निवडणूक: ११ जणांच्या अपील अर्जावर सुनावणी पूर्ण; निर्णय राखीव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- बाजार समिती निवडणुकीत माजी सभापती दिलीप माने, इंदुमती अलगोंडा यांच्यासह ११ जणांच्या अपील अर्जावर आज जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांच्याकडे सुनावणी झाली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून निर्णय राखून ठेवला आहे. ११ अपिलांवर सुनावणी पूर्ण झाली आहे, शीघ्र गतीने निर्णय देऊ, असे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी सांगितले, पण शीघ्र गतीने म्हणजे कधी ? हे स्पष्ट केले नाही. यामुळे जिल्हाधिकारी काय निर्णय देणार, याकडे दोन्ही तालुक्याचे लक्ष लागले आहे. १९ जून उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम मुदत असून त्यापूर्वी जिल्हाधिकारी यांचा निर्णय होणे अपेक्षित आहे. लेखापरीक्षणात काढलेल्या येणेबाकी वसुली आदेशाला उच्च न्यायालयानेही स्थगिती दिली असल्याने जिल्हाधिकारी काय निर्णय घेणार ? हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे. 


बाजार समिती निवडणुकीत निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील यांनी माजी सभापती दिलीप माने, इंदुमती अलगोंडा, सिद्धाराम चाकोते, अविनाश मार्तंडे व अशोक देवकते यांचा उमेदवारी अर्ज बाजार समितीची थकबाकी असल्याने नामंजूर केला होता. मिलिंद मुळे यांनी बोरामणी मतदारसंघातील व्ही. एन. गायकवाड व राजकुमार वाघमारे यांच्या अर्जावर हरकत घेतली होती. निवडणूक अधिकारी यांनी मुळे यांचे म्हणणे फेटाळल्याने त्यांनी पुन्हा जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील केले होते. सतीश इसापुरे यांचा बाजार समितीमध्ये व्यापारी गाळा असल्याने अर्ज नामंजूर केला होता. त्यावर त्यांनीही जिल्हाधिकारी यांच्याकडे अपील दाखल केले आहे. 


गुरुवारी दुपारी ३ वाजता सुनावणीस सुरुवात झाली. दाखल अपिलांवर दोन्ही बाजूच्या वकिलांनी युक्तिवाद केला. सायंकाळी ६ वाजेपर्यंत युक्तिवाद पूर्ण झाला. अॅड. आय. बी. पाटील यांनी दिलीप मानेंसह पाच जणांकडून युक्तिवाद केला. श्रीमंत बंडगर यांच्याकडून अॅड. विनायक नागणे व बी. एस. लेंढवे यांनी बाजू मांडली. व्ही. एन. गायकवाड यांच्या वतीने शरद पाटील यांनी तर मिलिंद मुळे यांच्या वतीने अॅड. विजय शिंदे यांनी बाजू मांडली. 


जिल्हाधिकारी कक्षात वकिलांची गर्दी ... 
जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी गुरुवारी सोलापूर बाजार समिती अपिलावर सुनावणी घेतली. सुनावणीवेळी जिल्हाधिकारी यांचे कार्यालय वकिलांनी भरले होते. अपील अर्जावर जिल्हाधिकारी भोसले यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून वकिलांकडून प्रत्येक कायद्याची माहिती घेतली. तुमचे म्हणणे काेणत्या कायद्यानुसार, कोणत्या कलमानुसार बरोबर कसे ? असा प्रतिप्रश्नही केले. सुनावणीवेळी जिल्हाधिकारी यांचे कक्षात निवडणूक निर्णय अधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सतीश धुमाळ, विधी अधिकारी वर्धमान वसगडेकर, जिल्हा उपनिबंधक अविनाश देशमुख यांची उपस्थिती होती. 

बातम्या आणखी आहेत...