आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पोलिस म्हणतात, मटका बंदच पण, टपऱ्यांवर पाट्या खुलेआम

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- शहरातील अवैध व्यवसायाने पुन्हा जोर धरला असल्याचे चित्र आहे. बंद असलेल्या टपऱ्या पुन्हा सुरू होत असून, आकडेमोड करणाऱ्या पाट्या खुलेआम झळकू लागल्या आहेत. पाथरुट चौकात तर काहीनी विद्या देवता गणरायाच्या मूर्तीसमोरच मटक्याच्या पाट्या लावून अवैध व्यवसाय केले जात आहेत. तर दुसरीकडे शहरातील मटका तसेच सर्वच प्रकारचे अवैध व्यवसाय बंद असल्याचा दावा पोलिस विभागाकडून केला जात आहे. 


पोलिस आयुक्तपदी जेव्हा रासकर होते तेव्हापासून दिव्य मराठीने मटकामुक्त सोलापूरकरिता मालिका सुरू केली होती. यानंतर रासकर आणि नंतर सेनगावकर यांनी हा मटका व्यवसाय पूर्णपणे बंद केला. खुलेआम चालणारा मटका बंद झाला. मात्र मोबाइलवर मटका घेणे सुरू झाले. तोही बंद करण्याचा प्रयत्न झाला. मात्र पोलिसांना यश आले नाही. 


अवैध व्यवसाय जोरात 
सध्या सर्व अवैध व्यवसाय सुुरू असल्याचे दिसून येत आहे. पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. मात्र अवैध व्यवसाय करणाऱ्यावर धाक बसेना. सध्या तर बंद झालेल्या मटका टपऱ्या पुन्हा सुरू झाल्या असून, प्रत्येक ठिकाणी मटक्याच्या आकड्यांच्या पाट्या लावल्या जात आहेत. यांच्यावर पोलिस का कारवाई करत नाहीत? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. 


या परिसरात मटका जोरात 
काही पोलिस ठाणे हद्दीत किरकोळ तर काही पोलिस ठाणे हद्दीत मोठ्या प्रमाणात मटका सुरू अाहे. पाथरुट चौक, अशोक चौक, नीलमनगर, अक्कलकोट रोड एमआयडीसी, विडी घरकुल, रेल्वे स्टेशन, फॉरेस्ट, शास्त्रीनगर, भय्या चौक, नवी पेठ, पांजरापोळ चौक, कन्ना चौक, बाळीवेस, बाळे आदी ठिकाणी मटका जोरात सुरू आहे. पाथरुट चौकात भाजीपाल्याचे स्टॉल असल्यासारखे मटक्याचे खोके आहेत. एका पत्राशेडमध्ये तर गणपतीची मोठी मूर्ती आहे येथेच मटका सुरू आहे. 


बुकी चालक बदलले, वसूलदार तेच 
पूर्वी मटका बुकी चालवणारे लोक सध्या या व्यवसायातून बाजूला बसल्याचे बोलले जात आहे. सध्या चालणारा मटका हा नवीन बुकीचालकांकडून चालवला जात आहे. या नवीन बुकीचालकांची हिंमत वाढणारे वसूलदारच आहेत. कारण यांच्या मदतीशिवाय हे अवैध व्यवसाय चालवणे शक्यच नसते. हिंमत द्यायची, मटका सुरू करायला लावायचा, नंतर हप्ते वसूल करायचे, अशा प्रकारातून तेरी भी चूप और मेरी भी चूप असा स्थिती झाली आहे. 


जिथे जिथे मटका जुगार सुरू असल्याचे निदर्शनास येईल तेथे निश्चित कारवाई होईलच. कुठेही मटका सुरू होई नये, जर झाला तर त्यांच्यावर कडक कारवाई करावी, असे निर्देश मी सर्व पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांना देते.
- अपर्णा गीते, पोलिस उपायुक्त 

बातम्या आणखी आहेत...