आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर- पोलिस अधिकारी यांनी पकडलेला वाळू ट्रक पसार होण्यास वाहतूक पोलिस कर्मचाऱ्याने मदत केली होती. तो ट्रक सापडला आहे. वाहतूक पाेलिस विनोद पुजारी यांचे काॅल डिटेल्स घेण्याऐवजी केवळ जबाबावरच तपास उरकण्याची चिन्हे दिसत आहेत.
या प्रकरणाच्या तपासासाठी आणखीन पाच दिवस लागतील, अशी माहिती तपास अधिकारी, सहायक पोलिस आयुक्त महावीर सकळे यांनी 'दिव्य मराठी'शी बोलताना दिली. बोलेरोमधून येऊन सहायक पोलिस निरीक्षक मोटे यांना अडवणारे, ट्रकमालक यांच्यासह पोलिस अधिकारी मोटे आणि वाहतूक पोलिस विनोद पुजारी या सर्वांचा जबाब घेण्यात आला आहे. ट्रकही सापडला असून ट्रक मालक बरूर येथील आहे. पोलिस आयुक्त महादेव तांबडे यांनी सात दिवसात अहवाल सादर करण्याचे आदेश रविवारी दिले होते. त्यानुसार शनिवारी सात दिवस होतात. पण तपास अपूर्णच आहे.
कॉल डिटेल्सवरून सापडेल या प्रकरणातील मुख्य सूत्रधार
भल्या पहाटे विनोद पुजारी हा वाहतूक पोलिस कर्मचारी सिव्हिल ड्रेसवर घटनास्थळी एका व्यक्तीस सोबत घेऊन येतो. कारवाई करू नका, ट्रक सोडून द्या म्हणून वरिष्ठांशी हुज्जत घालतो. दरम्यान, ट्रक पळून जातो. या पाठीमागे मोठा सूत्रधार असण्याची दाट शक्यता आहे. त्यासाठी पुजारी यांच्या मोबाइलचे कॉल डिटेल्स पोलिसांनी घेतले तर तेवढ्या पहाटे त्यांना कोणाचा फोन आला होता किंवा त्यांनी कोणा- कोणाला फोन केला होता हे स्पष्ट होईल. यावरून मोठे मासे हाती लागण्याची शक्यता आहे. कॉल डिटेल्स घेण्याकरिता वरिष्ठांची मान्यता घ्यावी लागेल, असा नियम आहे. तरी पुजारी यांच्या अर्जावर एक मिनिटात त्यांच्याच मोबाइलचे कॉल डिटेल्स उपलब्ध होतील. यावरून पारदर्शी तपास होईल.
मागवणार अहवाल
शहरातील पोलिसांनी विनापरवाना वाळू वाहतूकीवर कारवाई केल्यानंतर तहसीलदारांना अहवाल देणे किंवा तसे तोंडी कळवणे अपेक्षित आहे. पोलिसांनी काय कारवाई केली? वाळू कोठून उपसा केला? याबाबत तहसीलदारांकडून अहवाल मागवण्यात येईल. शिवाजी जगताप, प्रांताधिकारी
विनोद पुजारीची बदली नियंत्रण कक्षात
वरिष्ठांशी हुज्जत घालून पकडलेला वाळूचा ट्रक जाऊ दिलेले वाहतूक पोलिस कर्मचारी विनोद पुजारी याची पोलिस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. अजून तपास अहवाल सादर होणे बाकी आहे.
या प्रकरणाशी संबंधित असलेल्या पाच जणांचा जबाब घेतला आहे. न्यायालयीन कामासाठी मी सोलापूर बाहेर जात असून सोमवारी येत आहे. तपासाचे थोडे काम शिल्लक आहे. पाच दिवसांत तपास अहवाल सादर होईल. नंतर आयुक्त कारवाई करतील. महावीर सकळे, सहायक पोलिस आयुक्त
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.