आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा आंदोलनात सत्ताधाऱ्यांकडून हिंसा..मराठ्यांना इतरांपासून तोडण्याचे षडयंत्र; श्रीमंत कोकाटेंचा आरोप

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकलूज- मुख्यमंत्री ब्राह्मण असल्याने मराठा समाज उठाव करत आहे, असे मुळीच नाही. त्यांनीच पदावर राहावे, राज्यकर्ता म्हणून जबाबदारी पार पाडावी. तसेच मराठ्यांना आरक्षण द्यावे, अशी मागणी संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते श्रीमंत कोकाटे यांनी केली. मुख्यमंत्री मराठा समाजाला इतर समाजापासून तोडण्याचे षडयंत्र रचत आहेत. मराठा आंदोलनात सत्ताधारीच हिंसा घडवून आणत आहेत. मुख्यमंत्र्यांची मेगाभरती फसवी असल्याचा आरोपही कोकाटे यांनी केला.

 
मंगळवारी (दि. ७) माळशिरस येथे आरक्षणासाठी सुरू असलेल्या मराठा समाजाच्या ठिय्या आंदोलनाला ते मार्गदर्शन करत होते. मराठा आरक्षणास सत्ताधारी भाजप-सेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आदी पक्ष पाठिंबा जाहीर करत आहेत. मात्र, अद्याप आरक्षण मिळाले नाही, अशी खंत व्यक्त करत कोकाटे यांनी राज्य सरकार मराठा आरक्षणाची बाजू न्यायालयात मांडण्याचे टाळत असल्याचा आरोप केला. खत्री, बाबर, सराफ आणि राणे या चार आयोगाने अहवाल देऊनही आरक्षण मिळाले नाही. राणे आयोग राज्य सरकारने प्रमाणित केला नाही. त्यामुळे त्यांच्या शिफारशी न्यायालयाने स्थगित ठेवल्या. मागील काळात मुख्यमंत्री मराठा असताना आरक्षण का घेतले नाही? मुख्यमंत्री फडणवीस व महसूलमंत्री पाटील यांच्या या विधानाचा समाचार घेत कोकाटे म्हणाले, मागील सरकारने आरक्षण दिले होते. त्याची बाजू न्यायालयात मांडण्यात भाजप सरकार निष्क्रिय ठरले. न्यायालयाने त्याला स्थगिती दिली. मुस्लिम आरक्षणास स्थगिती दिलेली नाही. त्यांचे आरक्षण का थांबवले? असा सवालही त्यांनी केला. यापुढे आत्महत्या करू नये, असे अावाहनही कोकाटे यांनी केले. 


आंदोलनात फत्तेसिंह माने, सभापती वैष्णवीदेवी मोहिते, स्वरूपाराणी मोहिते, अर्जुनसिंह मोहिते, उपसभापती किशोर सूळ, काँग्रेसचे प्रकाश पाटील, श्रीलेखा पाटील, उत्तम माने, सुरेश पाटील, प्रताप पाटील, गणपत वाघमोडे, शंकर देशमुख, संदीप घाडगे, संग्रामसिंह रणवरे सतीश पालकर, अण्णा इनामदार, माणिक मिसाळ आदी सहभागी होते. 


आर्थिक निकषावर आरक्षण क्लिष्ट 
धार्मिकदृष्ट्या हक्क नाकारलेला समाज गरीब राहतो. त्यामुळे जाती-धर्मांवर आधारित आरक्षणच योग्य असल्याचे कोकाटे यांनी सांगितले. आर्थिक निकषावर आधारित आरक्षण अमलात आणणे खूप क्लिष्ट होईल. आम्ही मराठा समाजाबरोबरच धनगर व मुस्लिमांना आरक्षणासाठी आग्रही असल्याचे कोकाटे म्हणाले. 


पंढरपुरात रॅली, चंद्रभागेत आंदोलन 
पंढरपूर : आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाजाच्या तरुणांनी मंगळवारी मोटारसायकल रॅली काढली. तसेच चंद्रभागेत आंदोलन केले. यात तरुणांचा मोठा सहभाग होता. दरम्यान, तहसील कार्यालयाजवळ ठिय्या आंदोलनाला प्रतिसाद मिळाल्याने गर्दी होती. 


लहानग्यांनी घातले विठुरायाला साकडे 
मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी अनोखे आंदोलन केले. शहरातील विविध शाळांमधील मुलांनी सकाळी मंदिरात विठ्ठलाला साकडे घातले. बा विठ्ठला राज्य सरकारला मराठा आरक्षण देण्याची सुबुध्दी दे असे साकडे घातले. विद्यार्थ्यांनी शिस्तीने रांगेत विठ्ठलाचे दर्शन घेतले. मुलांच्या गळ्यात टाळ होते. मुले टाळ वाजवत, विठ्ठल नामाचा जयघोष करत मंदिरात आली होती. मंदिराबाहेर या मुलांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत निषेध केला. 

 

बातम्या आणखी आहेत...