आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करासोलापूर - सोलापुरातील पोलिस पेट्रोल पंपावर झालेल्या पाच लाख रुपयांच्या चोरी प्रकरणाने आता नवे वळण घेतले आहे. या प्रकरणाची तक्रार देणाऱ्या सहायक फौजदारानेच गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मारुती लक्ष्मण राजमाने (५६, विद्यानगर, शेळगी) असे या फौजदाराचे नाव असून ते संबंधित पोलिस पेट्रोल पंपावर सुपरवायझर म्हणून काम पाहत होते. पेट्रोल पंपावर जमा झालेले पैसे मुख्यालयात भरण्यासाठी घेऊन जात असताना राजमाने यांच्याकडून काही जणांनी ही रक्कम लांबवल्याची फिर्याद त्यांनीच रविवारी रात्री दाखल केली होती.
बुधवारी पहाटे हैदराबाद-पुणे महामार्गावरील उड्डाणपुलाच्या अँगलला एका व्यक्ती लटकलेल्या अवस्थेत नागरिकांना दिसली. नागरिकांनी पोलिसांना त्याबाबत कळवले. ती व्यक्ती फौजदार राजमाने असल्याची ओळख पोलिसांना पटली. पोलिसांनी तातडीने त्यांना रुग्णालयात नेले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. राजमाने हे पोलिस पेट्रोल पंपावर सुपरवायझर म्हणून कामाला होते. मागील शनिवारी आणि रविवारी पेट्रोलच्या विक्रीतून पंपावर ५ लाख रुपयांची रोकड जमा झाली होती. ही रक्कम पोलिस मुख्यालयात घेऊन जात असताना मार्कंडेय जलतरण तलावाजवळ राजमाने यांना काही तरुणांनी अडवून रोकड लांबवण्याचा प्रयत्न केला. त्यांना चकवा देऊन ते व्हिवको प्रोसेस ते शांती चौकाकडे गेले. तिथे अाल्यानंतर मिरची पूड टाकून आपल्याकडील रक्कम पळवून नेल्याची तक्रार राजमाने यांनी दिली होती. परंतु, सोमवारी चौकशीदरम्यान त्यांनी मार्केट यार्ड ते शेळगी रोडकडे जाताना रक्कम काढून घेतल्याचे सांगितले. त्यांच्या या जबाबावरून जेल रोड पोलिस स्टेशनकडून हा गुन्हा जोडभावी पोलिसांकडे वर्ग करण्यात अाला.
चौकशीदरम्यान राजमाने यांनी दिलेल्या माहितीत बऱ्याच विसंगती असल्याने पोलिसांना सुगावा लागत नव्हता. नातेवाइकांच्या मते, मंगळवारच्या रात्री राजमाने घरीच होते. कुटुंबीयांसोबत जेवणही केले. मात्र, पहाटे ते घरातून कधी बाहेर पडले हे कुणालाच माहीत नव्हते.
गुन्हेगारांना शोधून काढावे; मुलाची आर्त हाक
वडिलांना मारहाण करून त्यांच्याकडील रक्कम पळवून नेण्यात आली. या घटनेचा पोलिसांनी योग्य तपास करून गुन्हेगारांना शोधून काढावे, अशी आर्त हाक राजमाने यांच्या मुलाने दिली आहे. तर, आपण या घटनेत काहीच केले नाही. आपण निर्दोष आहोत, असे ते काल रात्रीच अाम्हाला म्हणाले होते. पोलिसांनी शोध घेऊन खरा प्रकार उजेडात अाणावा, अशी मागणी राजमाने यांच्या पत्नीने केली आहे. मृत राजमाने हे कोरवलीचे रहिवासी असल्यामुळे त्यांच्यावर गावात अंत्यसंस्कार करण्यात अाले.
पोलिसांसमोर तपासाचे आव्हान
राजमाने हे तीन दिवसांपासून पोलिसांना चोरी झाल्याचे सांगत होते. आपल्याला मारहाण करून चोरट्यांनी रक्कम पळवून नेल्याचे ते सांगत होते. पोलिसही सर्व शक्यता गृहीत धरून समांतर पद्धतीने तपास करीत होते. मात्र, त्यांनी आत्महत्या केल्याने तपास करणारे पोलिसही चक्रावले अाहेत. त्यामुळे आता चोरीच्या गुन्ह्यासोबतच आत्महत्येचे कारणही शोधून काढण्याचे पोलिसांपुढे आव्हान आहे.
लुटीचा केला बनाव?
मारूती राजमाने यांनी पेट्रोल पंपावर जमा झालेली 5 लाख रुपयांची रोकड रविवारी मध्यरात्री सुमारास घेऊन जात असताना अज्ञात सहा जणांच्या टोळीने मारहाण करून रोकड लुटून नेल्याबाबत तक्रार दाखल केली होती.
चौकशीत उघडं पडलं पितळ...
मारुती राजमाने यांनी दिलेल्या तक्रारीवरुन जेलरोड पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिस आयुक्तांपासून सर्वच पोलिस अधिकार्यांनी हे प्रकरण चांगलेच गांभीर्याने घेत राजमाने यांची कसून चौकशी सुरु केली. चौकशीत राजमाने यांनी तीन वेळा घटनास्थळ बदलले. त्यामुळे संशयाची सुई राजमाने यांच्याच भोवती फिरु लागली.
राजमानेंच्या घरात सापडले 2 लाख रुपये...
घटनेच्या रात्री वरिष्ठ पोलिस अधिकार्यांनी राजमाने यांच्या घरातून सुमारे दोन लाखांची रोकड हस्तगत केली. ही रोकड कोणाची व कशी आली याचा तपास पोलिस यंत्रणा करीत होती. या रकमेतील काही रक्कम ही पेट्रोल पंपाचा भरणाच असल्याचेही सांगण्यात येते आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.