आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठा मुलांना मोफत शिक्षण द्या, अन्यथा थेट मंत्रालयातच घुसणार; सरकारला २५ दिवसांची डेडलाइन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

तुळजापूर- येत्या २५ दिवसांत मराठा समाजाच्या मुलांना मोफत शिक्षणाची घोषणा केली नाही तर थेट मंत्रालयात घुसू, असा इशारा देत मराठा क्रांती मोर्चाचे दुसरे पर्व तुळजापुरात सुरू झाले. ५८ विक्रमी मूक मोर्चे काढल्यानंतर शुक्रवारी कुलस्वामिनी श्री तुळजाभवानीच्या दरबारात मोर्चाने मौन सोडले. येत्या २५ दिवसांत मराठा समाजाच्या मुलांना मोफत शिक्षणाची घोषणा सरकारने केली नाही तर थेट मंत्रालयात घुसू, असा इशारा या वेळी देण्यात आला. सरकारविरुद्ध प्रचंड घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून देवीच्या महाद्वारापर्यंत मोर्चा काढण्यात आला. 


महाद्वारासमोर संबळाचा कडकडाट करत पारंपरिक जागरण-गोंधळ घालून सरकारला सुबुद्धी दे, असे साकडे तुळजाभवानीला घालण्यात आले आणि आंदोलनास नव्याने प्रारंभ करण्यात आला. या मोर्चाच्या दुस ऱ्या पर्वात शुक्रवारी १ लाखावर समाजबांधव उपस्थित होते, असा दावा आयोजक आबासाहेब पाटील यांनी केला. तर पोलिसांनी ५ हजार लोक उपस्थित होते, असे सांगितले. मराठा समाजाला आरक्षण, शेतकऱ्यांना संरक्षण, शिक्षणासाठी सवलत, अॅट्राॅसिटी कायद्यात दुरुस्ती आदी मागण्या मोर्चेक ऱ्यांनी केल्या. 


मोर्चात रमेश केरे पाटील (औरंगाबाद), संजय सावंत (औरंगाबाद), सुनील मोरे (सोलापूर), महेश डोंगरे (पंढरपूर), रामभाऊ गायकवाड (सोलापूर), संतोष सुर्यराव ठाणे, शरद काटकर (सोलापूर), हणमंत पाटील (कोल्हापूर), युवराज सुर्यवंशी (मुंबई), सुनील नागणे, सज्जनराव साळुंके, किशोर पवार, कुमार टोले, जिवनराजे इंगळे, महेश गवळी, सतीश खोपडे, सागर इंगळे, नितीन पवार, अण्णासाहेब क्षीरसागर, अर्जुन साळुंके, धैर्यशील कापसे आदींनी पुढाकार घेतला. मराठा मोर्चा आंदोलनात आ. मधुकरराव चव्हाण, काँग्रेसचे जिल्हाअध्यक्ष अप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षा अर्चना पाटील, जिल्हा परिषद सदस्य महेंद्र धुरगुडे, नगराध्यक्ष चंद्रकांत कणे, तालुका खरेदी विक्री संघाचे चेअरमन शिवाजी बोधले, व्हा. चेअरमन बाळासाहेब भोसले आदींनी सहभाग नोंदवला.


चाबकाने फोडून काढा : जावळे
मराठ्यांच्या मुलांना शिक्षणासाठी सवलत नाही, जमीन संपली, आत्महत्या करून आपण संपत आलो पण मुख्यमंत्र्यांना जाग येत नाही. हे सरकार गेंड्याच्या कातडीचे असून यांना पोतराजाच्या चाबकाने फोडून काढा, असे आवाहन छावा संघटनेचे नानासाहेब जावळे-पाटील यांनी केले.


मुस्लिम बांधवांच्या वतीने पिण्याचे पाणी व नाष्टा
डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात मुस्लिम बांधवांच्या वतीने मोर्चात सहभागी मराठा बांधवांकरिता पिण्याचे पाणी व नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. संभाजी महाराज उद्यानासमोर पालिकेतील सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाष्ट्याची सोय करण्यात आली होती. तसेच शहरातील भवानी रोड, महाद्वार परिसर, आर्य चौक, कमानवेस, उस्मानाबाद रोड विविध ठिकाणी पाण्याचे जार ठेवण्यात आले होते.


तगडा पोलिस बंदोबस्त
मराठा क्रांती मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात तगडा पोलिस बंदोबस्त होता. जुन्या बसस्थानकापासून शहरात जाणारा रस्ता वाहतुकीसाठी बंद होता. खबरदारी म्हणून सोलापूर-उस्मानाबादकडे जाणारी वाहतूक बाह्य वळण रस्त्याने वळवली होती.


'समाज लढाईला सज्ज; यापुढे गोंधळाला सरकार जबाबदार' 
छत्रपती शिवाजी महाराज व राजमाता जिजाऊंचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सामाजिक बांधिलकी म्हणून तब्बल ५८ विक्रमी मूक मोर्चे काढले. मागण्यांची हजारो निवेदने दिली. वेळोवेळी सामंजस्याची भूमिका घेऊनही सरकार दखल घेत नसल्याने जगदंबेचा आशीर्वाद घेऊन मराठा समाज हक्काच्या लढाईला सज्ज झाला असून यापुढे महाराष्ट्रात जो गोंधळ होईल त्याला सरकार जबाबदार असेल, असे आबासाहेब पाटील यांनी या वेळी सुनावले. 


मराठा समाजाची हेल्पलाइन 
यापुढे मराठा समाजाचा, अांदाेलनाचा केवळ एकच नेता नसेल. राज्याची एक समिती असेल. तीच सर्व निर्णय घेईल. समाजाची हेल्पलाइन तयार करण्यात येणार असून याद्वारे गरीब मराठा मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी घेतली जाईल, असे आबासाहेब पाटील यांनी नमूद केले. 


देवीच्या चरणी निवेदन 
मराठा समाजाच्या मागण्यांसाठी जागरण गोंधळ आंदोलनानंतर तहसीलदार दिनेश झांपले निवेदन स्वीकारण्यासाठी मंदिरात आले होते. परंतु त्यांना निवेदन न देता अांदाेलकांनंी चार पानी मागण्यांचे निवेदन श्री तुळजाभवानीच्या चरणांवर ठेवून प्रशासनाचा निषेध केला. 


आरक्षणाबाबतचा अहवाल १४ ऑगस्टपर्यंत द्या : काेर्ट 
दीड वर्षापासून मराठा समाजाच्या सामाजिक व शैक्षणिक मागासलेपणाबाबतच्या सर्वेक्षणाचे काम मागासवर्ग आयोग करत आहे. यापेक्षा आणखी किती कालावधी देणार, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने राज्य सरकारला खडसावले. मराठा आरक्षणाबाबतचा अहवाल सादर करण्यासाठी सप्टेंबरअखेरपर्यंतची मुदत सरकारने मागितली होती. मात्र, त्यास नकार देत न्यायालयाने १४ ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्यास सांगितले. मराठा अारक्षणाची स्थगिती उठवण्यासाठी विनोद पाटील यांच्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू अाहे. जवळपास दीड वर्षापासून हे प्रकरण आयोगाकडे प्रलंबित असल्याने मराठा विद्यार्थ्यांचे नुकसान असल्याचे याचिकेत म्हटले अाहे. 

 

पुढील स्लाइड्‍सवर क्लिक करून पाहा... तुळजापुरात निघालेल्या मराठा मोर्चाचे फोटो..

बातम्या आणखी आहेत...