आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोलापूरच्या शेतकरी कुटुंबातील विठ्ठल हॉलीवूड चित्रपटात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर - संपूर्ण जगभरातील सिनेकलावंतांचे आकर्षण असलेल्या आणि एकदा तरी कामाची संधी मिळावी अशी चंदेरी दुनिया म्हणजे हॉलीवूड. अशा हॉलीवूड चित्रपटात काम करण्याची संधी सोलापूर जिल्ह्यातील पानगाव (ता. बार्शी) येथील शेतकऱ्याच्या मुलाला मिळाली आहे. लवकरच प्रदर्शित होणाऱ्या 'हॉटेल मुंबई' या हॉलीवूड चित्रपटात तो कसदार अभिनय करताना दिसणार आहे. विठ्ठल नागनाथ काळे असे त्या युवकाचे नाव असून साता समुद्रापार भरारी घेणाऱ्या विठ्ठलचे सर्वत्र कौतुक होत आहे.

 

ऑस्ट्रेलियन दिग्दर्शक अंथोनी यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या चित्रपटाची निर्मिती थंडर रोड पिक्चर्स या अमेरिकन संस्थेने केली आहे. सत्य घटनेवर हा चित्रपट आधारित अाहे. चित्रपटाचे छायाचित्रीकरण निक मॅथ्यू यांनी केले असून स्लमडॉग मिलेनियर फेम देव पटेल यांच्या साेबत या चित्रपटात विठ्ठलची पोलिस इन्स्पेक्टर ही महत्त्वाची भूमिका आहे. चित्रपटात अनुपम खेर, टिल्डा, आर्मी हॅमर, नाजनीन बोनियादीट अशा अनेक कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत. नुकतेच विठ्ठलने एक महिना ऑस्ट्रेलियात याचे चित्रीकरण केले आहे. हा चित्रपट येत्या काही महिन्यात जगभरात प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे छोट्याशा गावातून पुढे गेलेला एक उमदा कलावंत हा आपल्या कष्टामुळे जगभरात वेगळी ओळख घेऊन पुढे येणार आहे.


विठ्ठल काळे हा बार्शीच्या शिवाजी महाविद्यालयातून युवा महोत्सवात भरारी घेणारा उमदा कलावंत. अभिनयाची करिअर करण्यासाठी त्याने थेट पुणे गाठले. पुण्यात पत्रकारितेचा अभ्यास करत छोट्या-मोठ्या चित्रपटातून ऑडिशन देण्याचे काम तो करायला लागला आणि पाहता पाहता त्याच्या कष्टाचे चीज झाले. विठ्ठलने आजवर सैराट, सलाम, आजचा दिवस माझा, दुसरी गोष्ट, नीळकंठ मास्तर, डिस्को सन्या या चित्रपटात विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. येत्या काही काळात त्याचे जवळपास ४ चित्रपट प्रदर्शित होणार आहेत.

 

राक्षस चित्रपटातही विठ्ठल भूमिका
विठ्ठलने अनेक चित्रपटात काम केले असून नुकतेच या आठवड्यात प्रदर्शित झालेल्या ज्ञानेश झोटिंग दिग्दर्शित सई ताम्हणकर व शरद केळकर यांच्यासोबत राक्षस या चित्रपटात विठ्ठलने एका भल्या माणसाची म्हणजेच मदत करणाऱ्या 'परसू'ची भूमिका साकारली आहे.

 

'हॉटेल मुंबई'ने मी समृद्ध
हॉटेल मुंबई या चित्रपटाचा अनुभव खूपच वेगळा होता. हा चित्रपट जेव्हा जगभरात प्रसिद्ध होईल त्यातून मला नक्कीच चांगली पावती मिळेल आणि इतर कामांची संधी मिळेल अशी मला खात्री आहे.
- विठ्ठल काळे, अभिनेता

 

बातम्या आणखी आहेत...