आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राजू शेट्टी- सदाभाऊ खाेत समर्थक उतरले हातघाईवर; सदा खाेतांच्या गाडीवर दगडफेक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

कुर्डुवाडी / सांगली- काही वर्षांपूर्वीपर्यंत एकमेकाचे जिवलग मित्र असलेले खासदार राजू शेट्टी व राज्यमंत्री सदाभाऊ खाेत यांचे संबंध अाता ताणले गेले अाहेत. याच दुराव्यातून स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी रिधाेरे (ता. माढा) येथे अालेले राज्यमंत्री खाेत यांना काळे झेंडे दाखवून त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. तसेच त्यांच्या गाडीवर गाजरे, तूर टाकून निषेध नाेंदवला. शेतकरी संघटनेचे नाव घेऊन राजकारण करणारे खाेत शेतमालाला हमीभाव मिळवून देण्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा या कार्यकर्त्यांचा अाराेप अाहे. दरम्यान, या हल्ल्याचे पडसाद सांगली जिल्ह्यातही उमटले. इस्लामपूर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यालयावर खाेत यांच्या रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी दगडफेक केली तसेच राजू शेट्टींच्या पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त केला.  


कुर्डुवाडी येथील साखर कारखाना सुरू होऊन  एक महिना झाला तरीही  ऊस उत्पादक शेतकऱ्यांना एफआरपीप्रमाणे दर मिळाला नाही. शेतीमालाला हमीभाव दिला गेला नाही.  मका हमीभाव खरेदीसाठी अॅानलाइन नोंदणी करूनही १४४ शेतकऱ्यांच्या अद्याप मका खरेदी केला नाही. फसव्या  कर्जमाफीबाबत खोत एकही शब्द बोलले नाहीत, अशा स्वाभिमानी शेतकरी संघटना कार्यकर्त्यांच्या तक्रारी अाहेत. शनिवारी दुपारी बारा वाजता रिधोरे (ता.माढा) येथे रयत क्रांती शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी खाेत यांची गाडी सत्कारासाठी थांबवली हाेती. याच वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडीचे अध्यक्ष बापू भीमराव गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांनी शेतकऱ्यांचे प्रश्न खाेतांकडे मांडण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांनी लक्ष न दिल्याने कार्यकर्त्यांनी खाेत यांची शासकीय गाडी लाेखंडी पाइपने फाेडली, दगडफेकही केली. पाेलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत खाेत यांची तिथून सुटका केली. 

 

पायाखालची वाळू सरकल्याने हल्ले  
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पायाखालची वाळू सरकली आहे. यामुळे ते अशा प्रकारचे हल्ले करीत आहेत. मी अशा हल्ल्यांना घाबरत नाही. शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी माझे प्राण गेले तरी चालतील. शेतकऱ्यांचे प्रश्न सरकारदरबारी ताठ मानेने मांडणार आहे. ज्यांना काही करायचे आहे त्यांना करू द्यावे.  
- सदाभाऊ खोत, पणन व कृषी राज्यमंत्री  

 

...तर राज्यातील प्रत्येक मंत्र्याच्या वाट्याला दगड  
हा हल्ला व्यक्तिद्वेषातून नव्हे, तर शेतकऱ्यांच्या रोषांचे प्रत्यंतर आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सुटले नाही तर राज्यातील प्रत्येक मंत्र्याच्या वाट्याला असे दगड येतील. शेतकऱ्यांचे प्रश्न आ वासून उभे असताना कोणी सरकारचे गुणगान गात असेल तर अशा मंत्र्याचे स्वागत कसे करायचे?  
- राजू शेट्टी, अध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना.

 

पुढील स्लाइड्सवर क्लिक करून पाहा... संबंधित फोटो...

बातम्या आणखी आहेत...