आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पालखी मार्गावरील गावांना वित्त आयोगातून निधी खर्चाच्या सूचना

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- आषाढी एकदशी निमित्ताने जिल्ह्यात विविध संतांच्या पालखी सोहळ्यात लाखो वारकरी येतात. सर्वाधिक वारकऱ्यांचा समुदाय असणाऱ्या संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्यास इतर सहा संतांचा पालखी सोहळा जिल्ह्यातील ६३ गावांमध्ये विसावा, मुक्काम असतो. त्या गावांमध्ये स्वच्छता, पाणीपुरवठा व इतर आवश्यक सोयी-सुविधांसाठी शासनाकडून मिळणाऱ्या निधीपेक्षा जास्तीचा खर्च वित्त आयोगाच्या निधीतून करावा, अशा सूचना ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंचल पाटील यांनी केल्या. 

वारकऱ्यांची जास्त संख्या असलेल्या नऊ संतांच्या पालखी मार्गावरील ६३ गावांतील सरपंच, ग्रामसेवक, गटविकास अधिकारी, तालुका वैद्यकीय अधिकारी, पशुसंवर्धन अधिकाऱ्यांची एकत्रित आढावा बैठक सोमवारी जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झाली. अध्यक्ष संजय शिंदे यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारूड, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अर्जुन गुंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शीतलकुमार जाधव, पाणीपुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संजय कटकधोंड आदी उपस्थित होते. 


श्रीमती पाटील म्हणाल्या, "वारीच्या निमित्ताने पालखी मार्गावरील गावांमध्ये काही तासांचे एक आणखी मोठे गाव उभारते. विठुरायाच्या भक्तीच्या आेढीने निघालेल्या वारकऱ्यांची सेवा करण्याची संधी त्यानिमित्ताने गावकऱ्यांना मिळते. स्थानिक प्रशासनाने वारकऱ्यांसाठी आवश्यक ठोस सोयी-सुविधांची उभारणी करावी. गावकऱ्यांसह, वारकऱ्यांच्या आरोग्याची काळजी घ्यावी. सार्वजनिक जलस्त्रोत परिसराची स्वच्छता ठेवावी. दिंडी सोहळा पुढे गेल्यानंतर त्वरित गावामध्ये स्वच्छता मोहीम राबवून स्थानिकांच्या आरोग्याची विशेष खबरदारी घ्यावी." 


संत ज्ञानेश्वर व संत तुकाराम महाराज पालखी मार्गावरील मुक्कामाच्या गावांना चार लाख व विसावा असणाऱ्या गावांना दोन लाखांचे अनुदान मिळते. इतर पालखी मार्गावरील गावांना मुक्कामासाठी दोन व विसाव्यासाठी एक लाखाचे अनुदान आहे. अनुदानाचे पैसे ग्रामपंचायतीच्या खात्यावर दोन दिवसांमध्ये जमा होतील. त्यापेक्षाही जास्त निधीची गरज असल्यास १४ व्या वित्त आयोगाच्या निधीतून नियमानुसार ठरावीक प्रमाणात निधी खर्च करून त्याचा हिशेब सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. 


पालखी सोहळ्यापूर्वी होणार पंढरीत स्वच्छता मोहीम 
आषाढी एकादशीनिमित्त १७ जुलैला पालखी सोहळा जिल्ह्यात प्रवेश करणार आहे. त्यानिमित्ताने १६ जुलैला सर्व शासकीय, निमशासकीय यंत्रणांच्या मदतीने पंढरपूर शहरामध्ये सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. पंढरपूर शहरातील रस्ते,चौक, मंदिर परिसर, दर्शनबारी, चंद्रभागा नदीच्या परिसरात प्रामुख्याने स्वच्छता मोहीम राबवून आैषध फवारणी करण्यात येईल. आषाढी सोहळ्यानंतर पुन्हा स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भासले व सीईआे डॉ. भारूड यांची स्वच्छतेची संकल्पना असल्याचे श्रीमती पाटील यांनी सांगितले. 

बातम्या आणखी आहेत...