आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्लास्टिकऐवजी कागदी पिशवीतून देणार पंढरपूरच्या विठ्ठलाचा प्रसादाचा लाडू

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पंढरपूर- श्री विठ्ठल मंदिरात आता प्रसादाचे लाडू प्लास्टिकऐवजी कागदी पिशव्यांमधून दिले जाणार आहे. शिवाय, पंढरपुरातील पर्यटनवाढीसाठी मोबाइल अॅपही तयार करण्यात आला आहे. सोमवारी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. शिवाय,  मंदिर व परिसराच्या स्वच्छतेेचे कंत्राट देणे,  कर्मचाऱ्यांच्या प्रारूप ज्येष्ठता यादीला मान्यता देणे,  अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करण्याच्या विषयावरदेखील या वेळी चर्चा झाली. 


या बैठकीत २ कोटी ४८ लाखांच्या मंदिर व परिसराच्या स्वच्छतेसाठीच्या तांत्रिक निविदा खुल्या करण्यात आल्या. दाखल पाचपैकी सुप्रीम पॅसिलिटी मॅनेजमेंट, बीएसए कॉर्पोरेशन लि. आणि बीव्हीजी इंडिया लि. या तीन कंपन्यांच्या निविदा पात्र ठरल्या.  व्यवस्थापनाकडील २२७  कर्मचाऱ्यांच्या प्रारूप ज्येष्ठता यादीला मान्यता दिली. अंतिम सेवाज्येष्ठता यादी प्रसिद्ध करून प्रस्ताव आकृतिबंधासह राज्य सरकारला पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला. शहरात पाच ठिकाणी वॉटर एटीएम उभारण्यास  प्रशासकीय मान्यता दिली.

 
पर्यटनवाढीसाठीच्या अॅपमध्ये पंढरपूर शहरासह श्री विठ्ठल-रुक्मिणी देवस्थानचे महत्त्व, मंदिर समितीच्या योजना, भक्तनिवासाची माहिती, दिनक्रम, विश्वस्त मंडळ माहिती, संपर्क क्रमांक, अन्नछत्र, आॅनलाइन दर्शन व देणगी आदी स्वरूपाची माहिती उपलब्ध आहे. 

 

सोने, चांदीचे दागिने वितळवणार
श्री विठ्ठल-रुक्मिणीस दान स्वरूपात आलेले सुमारे २५ किलोपेक्षा जास्त  सोन्याचे, तर ८३० किलो चांदीचे दागिने आणि विविध वस्तू वितळवून ठेवण्याचा श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समिती विचार करत आहे. विविध प्रकारांतील असलेले हे दागिने हाताळणे समितीला अवघड होत झाले आहे. यासंदर्भात प्रस्ताव आला आहे. मात्र, त्यावर निर्णय झाला नाही. 

बातम्या आणखी आहेत...