आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मेंदूमृत कृष्णाहरी बोम्मा यांचे यकृत, २ मूत्रपिंडासह डोळे दान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- एका अपघातात मेंदूमृत झालेल्या कृष्णाहरी बोम्मा यांच्या अवयवदानाची मोहीम गुरुवारी सकाळी श्री छत्रपती शिवाजी महाराज शासकीय सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल) यशस्वी झाली. यकृत, दोन मूत्रपिंड दान केल्याने तिघांना जीवनदान तर दोघांना दृष्टी मिळाली. 


पूर्व भागातील एका टेक्स्टाईलमध्ये सुपरवायझर म्हणून काम करणाऱ्या कृष्णाहरी बोम्मा (वय ४६) यांचा ५ जून रोजी रिक्षाची धडक बसून अपघात झाला. मेंदूला गंभीर दुखावत झाली. ते बेशुद्धावस्थेत होते. त्यांना सिव्हिलमध्ये उपचारासाठी दाखल केले. तज्ज्ञ डॉक्टरांच्या चमुने कृष्णाहरी यांना मेंदूमृत घोषित केले. त्यानंतर सिव्हिलमध्ये दुसऱ्यांदा ग्रीन कॉरिडॉर यशस्वीपणे पार पडले. अपघातानंतर श्री. बोम्मा यांना सिव्हिल रुग्णालयात दाखल केल्यावर त्यांच्या हृदयाचे कार्य नियमित सुरू राहण्यासाठी त्यांच्यावर उपचार सुरू होते. यानंतर कृष्णाहरी बोम्मा यांच्या इतर काही तपासण्या करण्यात आल्या. त्यांना ब्रेन हॅमरेज झाल्याचे निदान झाले. त्यांच्या मेंदूला रक्तपुरवठा होत नव्हता. त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. 

काहीतरी चमत्कार होईल आणि त्यांच्यात सुधारणा होईल, अशी आशा नातेवाईक आणि डॉक्टरांना होती. मात्र सुधारणा झाली नाही. त्यामुळे बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास एक तपासणी केली. त्यानंतर सायंकाळी साडेआठला तज्ज्ञांच्या समितीकडून तपासणी करून ब्रेनडेड घोषित करण्यात आले. त्यानंतर पालकांचे समुपदेशन करून अवयव दानाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली. कृष्णाहरी यांचे यकृत रुबी हॉस्पिटल पुणे येथे, एक मूत्रपिंड कुंभारी अश्विनी हॉस्पिटल व दुसरी अश्विनी सहकारी रुग्णालयात देण्यात आली. दोन डोळे सिव्हिल हॉस्पिटलला दान करण्यात आले. अवयवदानाची प्रक्रिया अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे व वैद्यकीय अधीक्षक डॉ. सतीन मेश्राम, डॉ. संतोष भोई व डॉ. राजेश चौगुले व डॉ. संदीप होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. 


मुलांसाठी आई-वडिलांची माया देत होते कृष्णाहरी
कृष्णाहरी यांच्या पत्नीचे सहा वर्षांपूर्वी निधन झाले. अक्षय व राहुल या दोन मुलांना आई व वडिलांची माया देण्याचे काम कृष्णाहरी करीत होते. ते एमआयडीसीमधील झंवर टेक्स्टाईलमध्ये सुपरवायझर म्हणून काम करीत होते. ५ जून रोजी त्यांच्यावर काळाने घाला घातला. चांगला व मनमिळाऊ स्वभाव होता. माझा भाऊ गेला. मात्र तो इतरांमध्ये अवयव दानाच्या माध्यमातून जिवंत राहील. याच हेतूने भावाच्या अवयवांचे दान करण्याचा निर्णय घेतला.
- यादगिरी बोम्मा, ब्रेनडेडचा भाऊ 


चळवळीला येत आहे गती 
अवयव दान चळवळीला गती येत आहे. सिव्हिलमध्ये दुसऱ्यांदा ग्रीन कॉरिडॉर यशस्वीपणे राबवण्यात आले. यामध्ये सर्व डॉक्टरांचा हातभार आहे. कृष्णाहारी यांचे हृदयही चांगले होते. चेन्नईवरून कॉल होता. मात्र ज्या व्यक्तीला गरज होती त्या व्यक्तीची झोनल ट्रान्सप्लांट कमिटीकडे नोंदणी नव्हती. त्यामुळे हृदय देता आले नाही.
- अधिष्ठाता डॉ. सुनील घाटे 

बातम्या आणखी आहेत...