आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फलमारी यांच्या पाठीमागे दशरथ गोप, महेश कोठे यांचा स्पष्ट अारोप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- 'पद्मशाली शिक्षण संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनीच सुरेश फलमारी यांना पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदासाठी पुढे केले. शिक्षण संस्थेतील गैरव्यवहार लपवण्यासाठी हा त्यांचा सारा आटापिटा होता. परंतु कायद्याने ज्ञाती संस्थेचा अध्यक्ष मीच आहे,' असा दावा महेश कोठे यांनी सोमवारी केला. 


ज्ञाती संस्थेची रविवारी वार्षिक सभा झाली. तीत कोठे यांच्यासह फलमारी यांनीही अध्यक्षपदावर दावा केला. दोन अध्यक्ष निवडले गेल्याने समाजबांधवांमध्ये संभ्रम निर्माण झाला. त्याबाबतचे स्पष्टीकरण देण्यासाठी त्यांनी पत्रकार परिषद घेतली. 


श्री. कोठे म्हणाले, "विश्वस्त आणि पंच समितीने माझ्या बाजूने कौल दिला. त्यामुळे कायद्यानुसार मीच अध्यक्ष आहे. फलमारी हे गोप यांचे प्यादे आहेत. त्यांना माझ्या विरोधातील इतर राजकीय शक्तींनीही फूस लावली. खरे पाहता, विश्वस्त आणि पंच समितीचा निर्णय त्यांनी मान्य करायला हवा. त्याच्या विरोधात जाऊन त्यांनी जे काही केले, ते आता संस्थेत खपवून घेणार नाही. संस्थेच्या बाहेरच त्यांना हवे ते करायला आमची हरकत नाही.


आता शिक्षण संस्था निवडणुकीची तयारी 
पुढील विधानसभा निवडणूक समोर ठेवून श्री. कोठे यांनी पद्मशाली ज्ञाती संस्थेच्या अध्यक्षपदावर दावा केला, शिवाय शिक्षण संस्थेच्या निवडणुकीचीही तयारी सुरू केली. मार्च २०१९ मध्ये शिक्षण संस्थेच्या विश्वस्त मंडळाची मुदत संपते. त्याच्या निवडणुकीसाठी श्री. कोठे यांनी कार्यकर्त्यांना कामालाही लावले. त्याची कुणकुण गोप यांना लागली. त्यानंतर ज्ञाती संस्थेच्या सभेत 'महाभारत' घडले. 


ते नैराश्येतून बोलले 
महेश कोठे यांना समाजातून प्रखर विरोध झाला, हे त्यांना सहन झालेले नाही. त्यामुळे नैराश्येतून त्यांनी माझ्यावरच नव्हे, तर शिक्षण संस्थेवरही आरोप केले. तब्बल सात वर्षे ते शिक्षण संस्थेचे अध्यक्ष होते. तेव्हा त्यांना संस्थेत भ्रष्टाचार दिसला नाही? फलमारी हे हाडाचे कार्यकर्ते. त्यांच्यात व माझ्यात वैयक्तिक मतभेद आहेत. परंतु त्यांना न्याय मिळण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी उभा आहे.
- दशरथ गोप, सचिव, शिक्षण संस्था 

बातम्या आणखी आहेत...