आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बाजार समिती निवडणूक जाहीर; आजपासून घमासान; १ जुलैला मतदान, ३ जुलैला मतमोजणी

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- मतदार यादीच्या गुऱ्हाळानंतर सोलापूर बाजार समितीची निवडणूक सहकार प्राधिकरणाने जाहीर केली. बाजार समितीच्या १८ संचालक निवडीसाठी १ जुलै रोजी मतदान तर ३ जुलै रोजी मतमोजणी होणार आहे. यासाठी मंगळवारपासून उमेदवारी अर्ज स्वीकारण्यात येतील. २ जून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची अंतिम मुदत अाहे. ४ जून   रोजी छाननी तर १९ जून उमेदवारी अर्ज माघार घेण्याची अंतिम तारीख असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी ज्याेती पाटील यांनी दिली. 


नवीन कायद्यानुसार प्रथमच शेतकऱ्यास मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे. १५ संचालक शेतकरी मतदार संघातून, २ संचालक व्यापारी तर १ संचालक हमाल-तोलार मतदारसंघातून निवडला जाणार आहे. दक्षिण तहसील कार्यालयात सकाळी ११ ते ३ या वेळेत उमेदवारी अर्ज स्वीकारले जाणार आहेत. निवडणूक प्रक्रिया राबवण्यासाठी एक निवडणूक अधिकारी तर तीन सहायक निवडणूक अधिकारी नियुक्त केले आहेत. सहायक निवडणूक अधिकारी म्हणून तहसीलदार अमोल कदम, विनोद रणवरे व सहायक निबंधक बालाजी वाघमारे यांची नियुक्ती केली आहे. याशिवाय सहायक म्हणून नायब तहसीलदार, अव्वल कारकून व लिपिकांकडे जबाबदारी दिली आहे. 


बाजार समितीच्या माजी संचालकांवर अपहार प्रकरणी गुन्हे दाखल करण्यात आले. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले म्हणाले, गुन्हे दाखल झालेल्या इच्छुक उमेदवारांना सूचकामार्फत अर्ज सादर करता येतील. गुन्हा सिद्ध झाला असल्यास उमेदवारी दाखल करता येत नाही. 


अर्ज दोनशे रुपयांना, ५ हजार अनामत रक्कम 
उमेदवारी अर्जाची किंमत २०० रुपये आहे. खुल्या प्रवर्गातून अर्ज दाखल करण्यासाठी ५ हजार तर राखीव जागेतून अर्ज दाखल करताना १ हजार रुपये अनामत रक्कम भरावी लागणार आहे. उमेदवारी अर्ज भरताना चार जणांनाच निवडणूक अधिकाऱ्यांच्या कक्षात प्रवेश दिला जाईल. यामध्ये इच्छुक उमेदवार, सूचक, अनुमोदक व उमेदवार प्रतिनिधी यांचा समावेश असणार आहे. 

बातम्या आणखी आहेत...