आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

2 वर्षाच्या सार्थकला अंगणात सोडून दांपत्याने स्वत:ला संपवले; कोवळ्या वयात मुले अनाथ

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उमरगा - मेटाकुटीला आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने एकीकडे कर्जमाफीची घोषणा केली. मात्र, लाभ न मिळालेले शेतकऱ्यांच्या आत्महत्या अजूनही थांबण्याचे नाव घेत नाहीत. नापिकी, कर्जबाजारीपणा, वडिलांचा दवाखान्याचा खर्च, अशा कारणामुळे दांपत्याने तरुण वयातच पेटवून घेऊन जीव संपवला. मात्र, परिणामी चार मुले कोवळ्या वयातच उघड्यावर आली. दरम्यान, बोरीच्या या दांपत्यावर सर्वात मोठ्या त्यांच्या ११ वर्षाच्या मुलाने मंगळवारी(दि.६) अंत्यसंस्कार केले.

 

बोरी येथील कस्तुरबाई व ज्ञानदेव केशव मदने यांचा एकुलता एक मुलगा सचिन मदने हा जेमतेम दहावीपर्यंत शिक्षण घेतलेला. त्याच्या लग्नानंतर पत्नी छबुबाई हिच्यासह आई-वडिलांपासून वेगळा राहत होता. ज्ञानदेव मदने यांनी गट क्रमांक १४० मधील साडेचार एकर जमीन सचिनच्या नावे केली होती. सचिन व छबुबाई यांना केशव (११), सुमित्रा (०९), समीक्षा (४), सार्थक (०२) अशी चार मुले. साडेचार एकर कोरडवाहू शेतजमिनीत उत्पन्न निघत नसल्याने सततची नापिकी यातून कुटुंबाचा उदरनिर्वाह चालविणे जिकरीचे होत चालल्याने सचिन मदने यांनी किल्लारी (ता. औसा) येथील स्टेट बँक ऑफ इंडिया शाखेतून सन २०१२ पीक कर्ज घेतले होते. स्वतःच्या साडेचार एकर शेत जमिनीत दोन हिस्से करून सचिनच्या नावे ९८ आर व पत्नी छबूबाई हिच्या नावे ८१ आर शेतजमीन केली होती. गेल्या तीन वर्षापासून होणारी नापिकी यामुळे बँकेचे कर्ज फेडणे जिकिरीचे होत चालल्याने पत्नी छबुबाई हिच्या नावे कर्ज घेण्याचा दोघांनी विचार केला, मात्र संयुक्त शेत जमिनीवर कर्ज यापूर्वीच घेतल्याने पत्नीच्या नावे कर्ज मंजूर होत नसल्याने घर कसे चालवावे, मुलांचे शिक्षण कसे करायचे यामुळे दोघांत लहानसान गोष्टीवरुन भांडण होत होते. गतवर्षी पाच पोते सोयाबीन निघाले होते, त्यात वडील आजारी असल्याने त्यांचा दवाखाना करून जवळपास साठ हजार रुपये खर्च झाला. त्यातच सोयाबीनची रक्कम संपून गेली. सद्यस्थितीत शेतात हरभरा पीक आहे तेही जेमतेम उत्पन्न निघेल असेच आहे. सततची नापिकी, मुलांचे शिक्षण, वडिलांच्या दवाखान्याचा खर्च हे सर्व करून घर कसे चालवायचे या आर्थिक विंवेचनेतून दोघांनी सोमवारी सकाळी स्वतःला पेटवून घेत जीवन संपविले.


वृद्ध आई-वडिलांसह चार मुले उघड्यावर
आर्थिक विंवचनेतून कुटुंबकर्त्या सचिन, छबुबाई या दोघांनी स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केल्याने वृध्द आई-वडील व चार मुले आता उघड्यावर पडली आहेत. मंगळवारी सकाळी आठ वाजता शोकाकुल वातावरणात सचिन, छबूबाई यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. याचा मंडळ अधिकारी पी.जी. कोकणे, तलाठी व्ही. व्ही. आवारी यांनी नातेवाईक व पंचांनी दिलेल्या माहितीवरून अडीच लाख रुपयांच्या कर्जाला कंटाळून दोघांनी जाळून घेऊन आत्महत्या केली असल्याची नोंद केली असून तपासानंतर वरिष्ठ विभागाकडे अहवाल सादर करण्यात येणार आहे.

 

बातम्या आणखी आहेत...