आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मान्सून सुरू झाला पण कामाचा पत्ता नाही, २० मेची डेटलाइन कागदावरच

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोालापूर- मान्सूनपूर्व कामे २० मेच्या आत करणे आवश्यक असताना कामाचा पत्ता नाही. बुधवारी शहरात वादळी वाऱ्यासह पाऊस पडल्याने अनेक घरात पाणी शिरले, विजेच्या तारांवर फांद्या पडल्या त्यामुळे मान्सूनपूर्व कामे झाले नाहीत हे दिसून आले. 


पावसाळा सुरू होण्यापूर्वीच शहरात नाले सफाई, ड्रेनेज लाइनमधील गाळ काढणे, विद्युत तारांना अडथळा ठरणाऱ्या झाड्याच्या फांद्या तोडणे, ज्या भागात पावसाचे पाणी साचून घरात पाणी जाते तेथे पाणी निचरा करण्यासाठी योग्य उपाययोजना करणे, रस्त्यावरील आजोरा काढून पाणी जातील असे नियोजन करणेे, खड्डे दुरुस्ती, ड्रेनेजचे चेंबर उघडे राहून त्यात अपघात होणार नाही याची खबरदारी घेणे आवश्यक आहे. पण, प्रशासनाकडे अशी कोणतीही कामे झालेली नाहीत. 


शहरात या भागात समस्या 
शहरातील वसंत विहार, मडकीवस्ती, गणेश नगर भागातील पावसाळ्यात समस्या निर्माण होतात. त्या परिसरात असलेल्या नाल्यात पावसाचे पाणी आल्याने नागरिकांची तारांबळ उडते. तसे यापूर्वी घडलेले आहे. विजापूर रोडवरील अत्तार नगर, नम्रता सोसायटी, होटगी रोडवरील ब्रम्हदेव नगर, आंबेडकर नगर, मुलतानी बेकरी, काजल नगर, गजानन नगर, नवोदय सोसायटी, खमितकर अपार्टमेंट रेल्वे बोगदा, मोदी रेल्वे बोगदा या भागात पाणी साचते. याशिवाय जुना एम्प्लाॅयमेंट चौक, होटगी रोड, डी मार्ट, सत्तर फूट रोड, शिंदे चौक आदी भागात रस्त्यावर पाणी साचते. 


हे काम करणे आवश्यक 
पाण्याचा निचरा होण्यासाठी आजोरा काढणे, खड्डे प्रिमिक्सने बुजवून घेणे आवश्यक आहे, कारण पावसाळ्यात प्रिमिक्सने काम करता येत नाही. पक्के गटारी, वाढीव नाले, खुल्या गटारी, पावसाळ्यात नाल्यात पावसाचे पाणी भरून वाहणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. ड्रेनेज चर मान्सूनपूर्व करून घ्यावे, मॅनहोल कामे करावे, अर्धवट खड्डे खोदले असेल तर ते बुजवावे. झाडाच्या फांद्या तोडाव्यात, पाणी साचणाऱ्या भागात अतिक्रमण असेल तर ते महापालिकेने काढावे, धोकादायक इमारती पाडणे आणि नोटीस देणे, रस्ते काम करणे आवश्यक असताना यातील बहुतांश कामे झाले नाहीत. झोन कार्यालयाकडून कामे होणे अपेक्षित असताना पूर्णपणे कामे केले नाहीत. 


अग्निशामक दलाकडे अाहे रेस्क्यू वाहन 
अग्निशामक दलाकडे रेस्क्यू वाहन अाहे. भिंत पडली, झाड पडले अथवा अापत्कालीन स्थितीत जी मदत पाहिजे त्यासाठी विविध साहित्य त्या वाहनात अाहे. खास प्रशिक्षण घेतलेले २५ जवानांचा ताफा असल्याची माहिती अग्निशामक दलाचे अधीक्षक केदार अावटे यांनी दिली. 


आपत्ती नियोजन आराखडा तयार : अपर जिल्हाधिकारी 
ज्या गावांमध्ये आपत्ती येण्याचा अधिक धोका आहे, त्या गावामध्ये मदत पोहचविण्यासाठी प्रत्येक तालुक्यांचा आपत्ती नियोजन अाराखडा तयार करण्याचे आदेश अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे यांनी दिले आहेत. याशिवाय आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशिक्षण देण्यासाठी अनुभवी, संस्थांची निवड करण्यात येणार आहे. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने निविदाही प्रसिद्ध केली आहे. प्रत्येक महाविद्यालयात आपत्ती व्यवस्थापनांतर्गत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महावितरण, जिल्हा परिषद व बांधकाम विभाग यांनाही मान्सूनपूर्व कामे करण्याचे आदेश अपर जिल्हाधिकारी शिंदे यांनी दिले. 


रेल्वेची डेटलाइन २० मेपर्यंत 
रेल्वे विभागातील मान्सूनपूर्व केली जाणारी कामे अंतिम टप्प्यात आली आहे. २० मे ही कामांसाठी डेडलाइन ठरविण्यात आली. रेल्वे अंडर ब्रीजजवळच्या भिंतीतून दरड कोसळू नये म्हणून जाळी बसविणे, ट्रॅक शेजारच्या झाडांच्या फांद्या छाटणे, पुलांची तपासणी विशेष करून बोल्डरची तपासणी करणे, खडी वाहून गेल्यानंतर रेल्वे वाहतूक तत्काळ सुरू करता यावी याकरिता खडी पोत्यात घालून ठेवणे, आदी विविध कामे मान्सूनपूर्व कामात केली जातात. 


महावितरणकडून कामे सुरू 
पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेच्या मान्सूनपूर्व देखभाल व दुरुस्तीचे कामे मे महिन्याअखेर पूर्ण करण्याचे निर्देश प्रादेशिक संचालक संजय ताकसांडे यांनी दिले आहेत. तसेच सद्यस्थितीत किंवा येत्या पावसाळ्यात वीजपुरवठा खंडित झाल्यास तो तातडीने पूर्ववत करण्यासाठी युद्धपातळीवर उपाय करण्याची सूचना सुध्दा दिल्या. दिलेल्या वेळेच्या आत सर्व कामे पूर्ण होतील, असा विश्वास सोलापूरचे अधीक्षक अभियंता ज्ञानदेव पडळकर यांनी व्यक्त केला. 


जिल्हा परिषदेने केले साथीसाठी नियोजन 
जिल्ह्यातील सर्व ७७ प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये साथरोग नियंत्रणासाठी स्वतंत्र पथकाच्या सूचना दिल्या आहेत. आरोग्य केंद्रांमध्ये नियमित आैषधांचा पुरवठा, त्याचा आढावा घेण्यात येतो. पावसाळ्यात सार्वजनिक जलस्त्रोतांतील पाणी नमुने तपासणी करून स्थानिक प्रशासनास त्याबाबतच्या सूचना देण्यात येतात, असे जिल्हा परिषदेचे साथरोग नियंत्रण अधिकारी डॉ. राजीव कुलकर्णी यांनी सांगितले. 


सूचना दिल्या 
मान्सूनपूर्व कामे करण्यासाठी झोन कार्यालयास सांगण्यात आले. त्यांच्याकडून कामे सुरू आहेत. २० पर्यंत कामे करण्याची सूचना झोन अधिकाऱ्यांना दिली आहे. 
- लक्ष्मण चलवादी, मनपा नगर अभियंता 

बातम्या आणखी आहेत...