आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपातील भाजप कारभारास जनता वैतागलीय; खासदार अॅड. शरद बनसोडे यांचा घरचा आहेर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सोलापूर- महापालिकेत भाजपच्या कारभाराला जनता वैतागली आहे, अशी कबुली भाजपचे खासदार अॅड. शरद बनसोडे यांनी सोमवारी महापालिकेत पत्रकारंापुढे दिली. भाजपच्या काळात पाच दिवसांआड पाणीपुरवठा केला जात आहे, असे कारणही त्यांनी यावेळी नमूद केले. दुसरीकडे पक्षाच्या बैठकीत निरीक्षकांपुढे कार्यकर्त्यांनी कारभारावर प्रश्नांची सरबत्ती करत त्यांनीही घरचा आहेर दिला. 


अॅड. बनसोडे यांनी सोमवारी आयुक्त डॉ. अविनाश ढाकणे यांची भेट घेतली. त्यानंतर ते बोलत होते. महापालिकेच्या अंदाजपत्रकाविषयी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. 


महापालिकेत भाजपची सत्ता आली. पाच दिवसांआड पाणी देणार असू, तर जनता वैतागणारच. आता नागरिकांकडून जाब विचारला जात आहे. पडलेले पाऊस, उजनीतून सोडलेले पाणी पुरेसे असताना पाच दिवसांआड पाणीपुरवठा कसे काय? असा मुद्दा अड. बनसोडे यांनी उपस्थित केला. 


भाजपच्याच खासदाराने भाजप सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. महापालिकेत दीड वर्षांपूर्वी भाजपची सत्ता आली. त्यानंतर नगरसेवकांत सहकारमंत्री आणि पालकमंत्री असे दोन गट पडले आहेत. या गटबाजीचा दुष्परिणाम थेट महापालिकेच्या कामकाजावर पडत आहे. या दोन गटाची तोंडे दोन दिशांना असल्याने प्रशासनाला काम करणे अडचणीचे होत आहे. तर प्रशासनावर अंकुश ठेवणे पदाधिकाऱ्यांना कठीण जात आहे. या पार्श्वभूमीवर अॅड. बनसोडे यांनी भाष्य केल्याची चर्चा आहे. 


अायुक्तांचा बळीचा बकरा होऊ देणार नाही 
महापालिका आयुक्तांनी धाडसी निर्णय घेतले. त्यामुळे त्यांचे मनोधैर्य वाढवणे आमचे कर्तव्य आहे. स्मार्ट सिटीचीे कामे सुरू आहेत. आयुक्त त्याचे सीईओ आहेत. असे असताना ते मागील काही दिवसांपासून कार्यालयातून सायंकाळी सहा वाजता जातात असे कळाले. आयुक्तांचा बळीचा बकरा होऊ देणार नाही यांची काळजी घेईन. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या आरक्षित जागेवरील बंगला प्रकरणी आयुक्तांनी निर्णय घेतल्यामुळे हे सर्व सुरू आहे का? याबाबत विचारले असता, बनसोडे यांनी सहकारमंत्री देशमुख यांचे नाव घेणे टाळले. माझ्याकडे हुकमी एक्का आहे. योग्यवेळी वापर करेन, असेही खासदार बनसोडे म्हणाले. 


यन्नमना न्याय मिळायला हवा 
महापौर निवडीचे धोरण त्यावेळचे निरीक्षक कामगारमंत्री संभाजी निलंगेकर यांच्यासमाेर ठरले. शोभा बनशेट्टी आणि श्रीकांचना यन्नम यांना प्रत्येकी सव्वावर्ष महापौर पद देण्याचा निर्णय झाला. त्यामुळे यन्नम यांना न्याय मिळायला हवा. पक्षाचा शब्द सर्वांनी पाळला पाहिजे. महापौर बनशेट्टी यांनी राजीनामा द्यायला हवा, असे मत खा. बनसोडे यांनी व्यक्त केले. 


बोरामणी शक्य नाही 
बोरामणी विमानतळ येथे कार्गो शक्य नाही. मात्र, यासाठी सुशीलकुमार शिंंदे यांनी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्याकडे पाठपुरावा केला. या प्रश्नासाठी मी शिंदे यांच्यासोबत आहे. होटगी रोडवरील विमानतळ सुरू करावे. कंपनी आणि शासन तयार आहे. पण चिमणीचा प्रश्न मिटवा, असे खासदार, अॅड. बनसोडे म्हणाले. 


कार्यकर्ते म्हणाले, कोणत्या तोंडाने नागरिकांना कार्य सांगायचे? 
केंद्रातील भाजपच्या मोदी सरकारने चार वर्षे पूर्ण केली आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारच्या कार्याचा अहवाल जनतेपर्यंत पोहचवा, असा संदेश घेऊन आलेल्या पक्षाच्या निरीक्षक उमा खापरे यांनी सोमवारी शहर कार्यालयात कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मात्र, कार्यकर्त्यांनी कारभाराचे वाभाडे काढत त्यांना जाब विचारला. हा प्रकार सुमारे तासभर चालला. काँग्रेसच्या काळात तीन दिवसांआड पाणीपुरवठा होत होता, आमच्या कार्यकाळात पाच दिवसांआड होत आहे. त्यामुळे जनतेसमोर कसे जायचे? जनता आम्हाला जाब विचारतेय. घराघरांतूनच विरोध होतोय. महापालिकेतील भाजपमधील वादाचे कारण लोक विचारत आहेत. भाजप नेत्यामधील वाद मिटवा, असे कार्यकर्त्यांनी सूचवले. अंदाजपत्रकावेळी आम्हाला विश्वासात घेतले जात नाही, त्यामुळे आम्ही समर्थन कसे करायचे? असा प्रश्न नगरसेवक नागेश वल्याळ यांनी विचारला. यावेळी शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, शहर सरचिटणीस दत्तात्रय गणपा, अशोक यनगंटी, व्यंकटेश कोंडी, महापौर शोभा बनशेट्टी, नगरसेवक श्रीनिवास करली, संगीता जाधव, मेनका राठोड, अविनाश बोमड्याल आदी उपस्थित होते. पक्ष पातळीवर बैठक घेऊ, असे आश्वासन निरीक्षक खापरे दिले. 

बातम्या आणखी आहेत...